□ अभिजित पाटलांनी अखेर अस्त्र उपसले, विठ्ठल परिवाराला ठणकावले
पंढरपूर : ऊस उत्पादकांचा मोठा विश्वास प्राप्त करून सोलापूरसह इतर जिल्ह्यांमधील साखर कारखान्यांवर हुकूमत प्राप्त केलेले पंढरपूरचे उद्योगपती अभिजित पाटील यांनी सोमवारी पंढरीत आल्या आल्या सत्याचे अस्त्र उपसले. यात भाजप नेत्यांनीही अभिजीत पाटील हेही एक दिवस भाजपमध्ये येतील, असा अंदाज व्यक्त केला. Abhijit Patil one day in BJP Praveen Darekar Pandharpur sugar factory entrepreneur
अभिजित पाटील म्हणाले, आपल्या घरावर व संस्थांवर पडलेल्या धाडी या राजकीय द्वेषापोटी पडल्या असून विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरु होऊ नये अशी इच्छा असणाऱ्यांनी आपल्यावर हे कारस्थान रचले. त्यांचीही घरे काचेची आहेत. त्यांनी एक दगड मारला आता आमचे दोन्ही हात मोकळे असतील, आम्ही आता दोन्ही हातांनी दगड मारु, असा खणखणीत इशारा पाटील यांनी दिल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे.
विठ्ठल परिवारावर पाटील यांनी थेट हल्ला चढवल्याने सहकार क्षेत्रात नवा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता दिसते. सत्याला मरण नसते, असे म्हणतात, त्यानुसार पाटील यांनी सारे सत्य लोकांपुढे मांडले. माझ्यावर धाडी टाकायला लावणाऱ्यांचीही घरे काचेचीच आहेत. मी आता दोन्ही हातांनी दगड मारेन. आयकर विभागाच्या छाप्यात काहीच गैर आढळले नाही. धाडीनंतर पाटील यांनी सोमवारी पंढरपुरात प्रसार माध्यमांशी पहिल्यांदा दिलखुलासपणे संवाद साधला. या चौकशीतून काहीच साध्य झाले नसल्याचा खुलासाही त्यांनी केला.
गेल्याच महिन्यात गुरसाळे येथील विठ्ठल साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक झाली होती. त्यात अभिजित पाटील यांच्या पॅनेलने विठ्ठल परिवाराचे प्रमुख भगिरथ भालके यांच्या पॅनलेचा धुव्वा उडवत विठ्ठलची सत्ता प्राप्त केली.
विठ्ठलच्या अध्यक्षपदी पाटील यांचीच बिनविरोध निवड झाली. पाटील यांनी ज्या ज्या कारखान्यांमध्ये पाऊल टाकले ते सर्व कारखाने सुस्थितीत चालत आहे. धाराशिवसारख्या कारखान्यात त्यांनी मोठी मेहनत घेऊन ऑक्सिजनचा प्रकल्प उभा केला. त्यांच्या या कामाची सर्वस्तरातून प्रशंसा झाली होती.
कारण उस्मानाबादसह सोलापूर जिल्ह्यात ऑक्सिजनचा कोरोना काळात तुटवडा निर्माण झाला होता. पाटील यांची सहकारी संस्थांमध्ये काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती आहे. आयकर खात्याच्या धाडी पडल्यानंतर सहकार क्षेत्रात थोडा संभ्रम निर्माण झाला होता. यामागे राजकीय षडयंत्र असण्याची शक्यताही जाणकारांनी व्यक्त केलेली होती. अखेर पाटील यांनीच सत्याचे कथन केल्याने हा संभ्रम दूर झाला.
● भाजप यात्रेत सहभाग, अनेकाच्या भुवया उंचावल्या
गेले चार दिवस अभिजित पाटील यांचे पंढरपूरचे कार्यालय, घर आणि त्यांच्या ताब्यात असणाऱ्या उस्मानाबाद, लोहा-नांदेड, चांदवड-नाशिक, सांगोला इथल्या चार कारखान्यांवर एकाच दिवशी आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. याशिवाय त्यांचे संचालक असणाऱ्या एकावर कोल्हापूर जिल्हातील अर्जुनवाड इथेही या धाडी पडल्या.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
त्यांना रविवारी (ता. 28) रात्री उस्मानाबाद जिल्ह्यातील चोराखली इथल्या कारखान्यावर नेण्यात आले होते. पाटील सोमवारी सकाळी पंढरपूरमध्ये आले आणि आल्या आल्या विधानपरिषदेमधील भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यासोबत तिरंगा यात्रेत सहभागी झाल्याने सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. दरेकर अध्यक्ष असणाऱ्या मुंबई डीसीसी बँकेने अभिजित पाटील यांच्या कारखान्यास ७० कोटीचे शॉर्ट लोन घेतले असल्याने त्यांच्या भेटीकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. दरेकर यांनी पाटील यांच्या आयकर खात्याने धाडी टाकलेल्या कार्यालयात येऊन चहापानाचा आस्वाद घेतला.
□ अभिजित पाटील चुकीचे करतील असे वाटत नाही : दरेकर
अभिजित पाटील हे एक चांगले उद्योजक असून ते चांगले काम करत आहेत. त्यांनी काही चुकीचे केले असेल असे मला वाटत नाही, अशा शब्दात भाजपाचे नेते आ. प्रवीण दरेकर यांनी पाटील यांची बाजू घेत आयकर विभागाने केलेल्या त्यांच्या चौकशीवर प्रतिक्रिया दिली. ते पंढरपूरला आले असता पाटील यांच्या कार्यालयात आले होते.
यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील, भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर, डॉ बी पी रोंगे सर यांच्यासह अनेकजण उपस्थित होते. गेले चार दिवस पाटील यांची आयकर विभागाने चौकशी केली होती. दरम्यान सोमवारी (ता. 29)दरेकर हे पंढरीत कार्यक्रमाच्या निमित्ताने आले असता त्यांनी अभिजित पाटील यांच्या कार्यालयाला भेट दिली.
याबाबत पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, एखादा मराठी उद्योजक पुढे येत असेल तर त्याची उमेद वाढविली पाहिजे. आयकरच्या चौकशीत काय झाले आहे याची मला माहिती नाही. परंतु यामुळे एखाद्याला नाउमेद करून बाजूला टाकणे योग्य नाही. मला वाटत नाही यात काही असेल ती एखाद्यावेळेस चौकशी किंवा कोणाची तरी तक्रार असू शकेल. याबाबतची योग्य ती उत्तर ते देतील. अभिजित पाटील हे चांगले व्यावसायिक आहेत तसेच माझे मित्र ही आहेत. मी आणि मुंबई बँक सतत त्यांच्या पाठीशी राहिलो आहोत.
दरम्यान पाटील हे भापजामध्ये प्रवेश करणार का? यावर बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले, भाजपात सगळेच येतच आहेत. यामुळे अभिजित पाटील हे ही एक ना एक दिवस भाजपात येतील. मी त्यांच्या पाठीशी कायम असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
□ ‘हा’ हेलपाटा मोठा करून गेला
पंढरपूर आयकर खात्याची कारवाई हा तपासाचा भाग असल्याचे पाटील यांनी सांगितले पण, ही कारवाई राजकीय द्वेषातून झाल्याचे दिसून येते. विरोधकांनी सोशल मीडियावर कॉमेंट्स केल्यामुळे त्याला राजकीय रंग असल्याचे स्पष्ट झाले होते. विठ्ठल सहकारी साखर कारखाना सुरू होऊ नये म्हणून माझ्या विरोधकांनी आयकर विभागाकडे तक्रारी केल्या.
मात्र त्यामध्ये काही सापडले नाही, मला रोखण्याच्या विरोधकांचा डाव मी हाणून पाडला, असे पाटील यांनी बोलताना सांगितले. सलग चार दिवस सुरू असलेल्या चौकशीमुळे पाटील यांच्या विषयी पंढरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सहानभूती निर्माण झाली आहे.
अनेकांनी आपले देव पाण्यात ठेवून पाटील यांच्यामागे लागलेल्या चौकशीतून ‘आबा’ लवकर बाहेर पडावेत, अशी प्रार्थना अनेकांनी केली. एकंदरीत आयकरच्या करवाईमध्ये काहीही निष्पन्न न झाल्यामुळे पाटील त्यांची प्रतिमा आणखी मोठी झाली.
□ जप्त केलेली रोकड परत केली
आमच्या सर्व कारखाने आणि इतर व्यवसायात खात्याला १ कोटी १२ लाखांची रोकड सापडली होती. मात्र ही सर्व रोकड रेकॉर्डवर असल्याने त्यांनी ती जप्त केलेली रक्कम देखील आम्हाला परत दिली. महिलांच्या स्त्री धनात असलेले ५० ते ६० तोळे सोनेही आयकर विभागाने हिशोब बघून परत दिले. व्यवहारात ज्या काही त्रुटी आढळल्या आहेत, त्याची कागदपत्रे येत्या पंधरा दिवसात देण्याच्या सूचना आयकर विभागाने दिल्या. या चार दिवसात पाटील त्यांचे बंधू अमर पाटील, कारखान्याचे संचालक, सभासद आणि कर्मचारी अशा १०० लोकांची चौकशी आयकर विभागाने केली, अशी सारी माहिती त्यांनी सांगितली.