सोलापूर – रेल्वे स्थानक परिसरात थांबलेल्या मालगाडीवर चढून सेल्फी घेत असताना विद्युत तारेचा शॉक बसल्याने जखमी झालेला मुकसित मुजाहीद जमादार (वय १६ रा.सिद्धेश्वर पेठ सोलापूर) हा शासकीय रुग्णालयात उपचार घेताना सोमवारी पहाटेच्या सुमारास मरण पावला. Taking a selfie on the train cost the life of a young man, died during treatment
रविवारी (ता.28 ) दुपारच्या सुमारास तो रेल्वे स्थानकातील बाळे साईडच्या कॅबिन जवळ थांबलेल्या एका मालगाडीवर चढून मोबाईलने सेल्फी घेत होता. त्यावेळी विद्युत तारेच्या स्पर्श झाल्याने तो खाली कोसळून भाजला होता. त्याला गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो पहाटे मरण पावला.
मयत जमादार याच्या पश्चात आई वडील, दोन भाऊ, आणि दोन बहिणी असा परिवार आहे. त्याने अकरावी इयतेत प्रवेश घेतला होता. या घटनेची नोंद रेल्वे पोलिसात झाली. सहाय्यक फौजदार चव्हाण पुढील तपास करीत आहेत.
□ दुचाकीचा अपघात; जावई ठार, सासरे जखमी
सोलापूर – दुचाकीला पाठीमागून दुसरी दुचाकी धडकल्याने पहिल्या दुचाकीवरील जावई ठार तर सासरे जखमी झाले. हा अपघात हैदराबाद महामार्गावरील मुळेगाव पेट्रोल पंपाजवळ सोमवारी (ता.29) दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडला.
किशोर वसंत खडके (वय ४९ रा.मित्रनगर शेळगी) असे मयताचे नाव आहे.तर लिंबण्णा शरणप्पा हलसगी (वय ७० रा. बोरामणी ता.दक्षिण सोलापूर) हे जखमी झाले.किशोर खडके हे दुपारच्या सुमारास आपले सासरे लिंबण्णा हलसगी यांच्या सोबत बोरामणी येथे निघाले होते.
मुळेगाव येथील पेट्रोल पंपाजवळ पाठीमागून वेगाने आलेल्या दुचाकीच्या धडकल्याने दोघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता त्यापैकी किशोर खडके हे उपचारापूर्वीच मयत झाले. मयत खडके हे मार्केट यार्डात चहा विक्री तयारी करतात. त्यांच्या पश्चात पत्नी असा परिवार आहे. या अपघाताची नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ बेगमपूर येथे कोयत्याने मारहाण सख्खे भाऊ जखमी
सोलापूर – पूर्वीच्या भांडणावरून कोयता आणि काठीने केलेल्या मारहाणीत देविदास बलभीम माने (वय ५० रा.बेगमपूर ता. मोहोळ) आणि त्यांचा भाऊ हणमंत माने (वय ४३) असे दोघेजण जखमी झाले. ही घटना सोमवारी (ता.29) सकाळच्या सुमारास माने यांच्या शेतात घडली.
त्यांना तानाजी शिवाजी डोके, त्याचा भाऊ सतीश डोके, सुवर्ण डोके आणि अर्चना डोके या चौघांनी मारहाण केली. जखमींना कामती येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे .
□ बस अपघातामधील जखमी महिलेचा मृत्यू
रेल्वे स्टेशन जवळील मैदानाजवळ एसटीमधून उतरत असताना खाली पडून जखमी झालेल्या खैरून सिराज शेख (वय ३५ रा. वानकरवस्ती, देगाव) या शासकीय रुग्णालयात उपचार घेताना सोमवारी पहाटे मयत झाल्या.
त्या २५ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास कर्नाटक बसमधून सोलापुरात आल्या होत्या. बसमधून उतरत असताना हा प्रकार घडला. त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार करून शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या अपघाताची नोंद सदर बाजार पोलिसात झाली आहे.