सोलापूर : सोलापूर राज्यात लम्पी या रोगाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच सोलापूर जिल्ह्यातही हा रोग आता येऊन थडकला आहे. माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी या गावात तीन जनावरांना लम्पी या चर्मरोगाची लागण झाली असून पशुपालकांत भीतीचे वातावरण आहे. तर येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा परिषदेचा पशुसंवर्धन विभाग सतर्क झाला आहे. In Solapur district, three animals are infected with lumpy disease
जनावरांना ताप येणे, भूक मंदावणे, नाकातून व डोळ्यातून पाणी येणे, दूध उत्पादन कमी होणे, तसेच अंगावर गाठी येणे ही लक्षणे दिसून आल्यास पशुपालकांनी लवकर जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखवून योग्य ते उपचार करावेत. तसेच जनावरांचे गोठे स्वच्छ ठेवावेत तसेच डास, गोचीड, गोमाशा, चिलटे यांच्या बंदोबस्तासाठी किटकनाशक फवारणी करावी. हा रोग संसर्गजन्य असल्याने या रोगाचा फैलाव होऊ नये याची दक्षता पशुपालकांनी घ्यावी, असे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे यांनी म्हटले आहे.
सध्या लम्पी या चर्मरोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढत असून फैलाव अनेक जिल्ह्यांमध्ये आहे. मात्र, या रोगाची लक्षणे सोलापुरातील जनावरांमध्ये आजपर्यंत दिसून आली नव्हती. मात्र नुकत्याच आलेल्या अहवालात माळशिरस तालुक्यातील शिंगोर्णी या गावातील तीन जनावरांना याची लागण झाल्याचे दिसून आले आहे. शिंगोर्णी गावातील दोन गायी व एक म्हैस अशा तीन जनावरांमध्ये या रोगाची लक्षणे दिसल्यानंतर त्यांचे नमुने ३ सप्टेंबर रोजी पुणे येथे पाठविले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
त्याचा अहवाल ५ सप्टेंबर रोजी प्राप्त झाल्यानंतर या तिन्ही जनावरांना लम्पी रोगाची लागण झाल्याचे सिद्ध झाले. सध्या जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने शासनाकडे गोटपॉक्स या डोसची मागणी केली आहे.
प्रत्येक तालुक्याला दहा हजार प्रमाणे अकरा तालुक्यांसाठी एक लाख दहा हजार डोसची मागणी करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. सध्या अकरा हजार पाचशे डोस उपलब्ध झाले असून हा रोग संसर्गजन्य असल्याने त्याचा प्रादुर्भाव इतर जनावरांना होऊ नये यासाठी हे सर्व डोस माळशिरस तालुक्यासाठी पाठविण्यात आले आहेत.
□ आजाराची लक्षणे
जनावरांना ताप येणे, भूक मंदावणे, नाकातून, डोळ्यातून स्त्राव येणे, अंगावर दहा ते पंधरा एम.एम. आकाराच्या गाठी तयार होणे, दूध उत्पादनात घट होणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत.
“पशुपालकानी जनावरांचे गोठे स्वच्छं राखावेत. डास, गोचीड, माशा, चिलटे यांना प्रतिबंधकरण्यासाठी कीटकनाशक फवारणी करावी. जेणेकरून लंपी आजाराला प्रतिबंध करण्यास मदत होईल”
नवनाथ नरळे – जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी