□ दक्षिण सोलापुरात शाखा वाढीसाठी होणार प्रयत्न
सोलापूर – सोलापूर जिल्हा दूध उत्पादक सहकारी संघाच्या तज्ज्ञ संचालकपदी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी संचालक सुरेश हसापुरे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर दक्षिण सोलापूर तालुक्यात दुधाचे संकलन वाढण्यासाठी नव्या शाखा सुरू होतील, असे हसापुरे यांनी सांगितले. Selection of Suresh Hasapure as Expert Director of Solapur District Milk Sangh
सहा महिन्यांपूर्वी दूध संघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच नेत्यांनी एकत्रितपणे प्रयत्न केले होते. त्यामध्ये सुरेश हसापुरे यांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार दिलीप सोपल, सिद्धाराम म्हेत्रे, राजन पाटील, दिलीप माने, प्रशांत परिचारक, दीपक साळुंखे, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे, सांगोल्याचे चंद्रकांत देशमुख, मंगळवेढ्याचे बबनराव अवताडे, करमाळ्याच्या रश्मी बागल या सर्वच नेत्यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले होते.
मात्र ओबीसी संचालकपदासाठी राजन पाटील हे आग्रही राहिल्यामुळे नेत्यांच्या सांगण्यानुसार हसापुरे यांनी माघार घेतली होती. त्या बदल्यात हसापुरे यांना तज्ज्ञ संचालक म्हणून घेण्याचा शब्द बबनदादा शिंदे, संजयमामा शिंदे आणि राजन पाटील यांनी दिला होता. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्या सून उमेदवार असल्याने निवडणूक लागली खरी मात्र नेत्यांच्या एकजूटीमुळे सर्व जागांवर उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले होते. त्यानंतर हसापूरे यांची तज्ज्ञ संचालकपदी निवड होण्यासाठी माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी वारंवार पाठपुरावा केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
नवनियुक्त संचालक मंडळ सत्तेवर आल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनंतर आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, माजी आमदार राजन पाटील यांनी दिलेला शब्द पाळत हसापूरे यांची दूध संघाच्या संचालकपदी निवड केली. या निवडीनंतर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे, माजीमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी हसापुरे यांचे अभिनंदन केले आहे.
विधान परिषद, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा परिषद अध्यक्षपद, सोलापूर बाजार समिती, जिल्हा दूध संघ या जिल्ह्याच्या महत्त्वाच्या निवडणुकीत मास्टरमाईंड भूमिका बजावणारे हसापुरे हे पदांपासून वंचित होते. शेवटी जिल्हा दूध संघाच्या संचालकपदावर त्यांना संधी मिळाल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यात दूध संस्था कमी आहेत. मात्र तालुक्यात संस्था वाढीसाठी आजपर्यंत ठोस प्रयत्न झाले नाहीत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाचा सर्वसामान्य शेतकऱ्यांना जसा लाभ मिळवून दिला, त्याप्रमाणे तालुक्यात दूध संस्था वाढवून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती भक्कम करण्याचा प्रयत्न राहील, असे हसापुरे यांनी सांगितले.
सुरेश हसापुरे यांनी यापूर्वी जिल्हा मध्यवर्ती बँक, बाजार समितीचे उपसभापतीपद, जिल्हा परिषद सदस्य या पदांच्या माध्यमातून एका आमदारापेक्षा जास्त निधी मिळवून दक्षिण सोलापूर तालुक्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान दिले आहे.