पंढरपूर – उजनी व वीर धरणामधून सोडण्यात येत असलेल्या विसर्गामुळे पंढरपूर येथे भीमा नदीची पाणी पातळी वाढत आहे. येथील व्यासनारायण झोपडपट्टीमधील तीस कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान वीरचा विसर्ग 28 हजाराने कमी करण्यात आला असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. Migration of families in the Chandrabhaga basin; 93 thousand cusecs of discharge is flowing from Pandharpur
मागील दोन आठवड्यापासून पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे त्या भागातील सर्व धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. आज शनिवारी सायंकाळी सहा वाजे पर्यंत उजनीतून भीमा नदीमध्ये ९३ हजाराचा विसर्ग सोडण्यात येत होता. तर वीरचा विसर्ग शुक्रवारी मध्य रात्री पर्यंत ४३ हजार क्युसेक होता, तो शनिवारी सकाळी कमी करण्यात आला. सायंकाळी सहा पर्यंत वीर मधून १५ हजार ९११ क्युसेक पाणी सोडणे सुरू होते. उजनी व वीरचे पाणी संगमपासून एकत्रित पंढरपूरमध्ये येते. यामुळे पंढरीत भीमा नदी सायंकाळी सहा वाजता जवळपास १ लाख क्युसेकने वाहत होती.
दरम्यान काल शुक्रवारी दोन्ही धरणातून सोडलेल्या पाण्याचा विसर्ग पंढरीत दाखल होत असल्याने पाण्याची पातळी वाढणार आहे. सदर पाणी नदी काठच्या व्यासनारायण झोपडपट्टी मध्ये येत असल्याने येथील ३० कुटुंबांचे उपजिल्हा रूग्णालयाजवळील रायगड भवन येथे स्थलांतर करण्यात आले आहे. नगरपालिका प्रशासन तसेच स्थानिक नगरसेवक विक्रम शिरसट यांनी येथील नागरिकांची भेट घेवून घरे सोडण्याचे आवाहन केले.
आज शनिवारी सकाळपासूनच या नागरिकांनी घरातील सामान गोळा करून मठामध्ये आश्रय घेतला. या ठिकाणी प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्यासह पोलीस निरीक्षक अरूण पवार, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर यांनी भेट देवून पाहणी केली. तसेच नदी काठच्या झोपडपट्टीमधील नागरिकांनी घरात राहू नये, असे आवाहन केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ दौंडचा विसर्ग वाढला
पुणे जिल्ह्यातील पावसाचे पाणी व उजनीच्या वरील धरणातून विसर्ग सुरूच असल्याने दौंड येथे सायंकाळी सहा वाजता १ लाख ३८ हजार क्युसेकने पाणी येत होते. हे पाणी थेट उजनी धरणामध्येच येते. उजनीतून सायंकाळी सहा वाजता ९४ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत होते. दौंडचा मोठा विसर्ग पाहता उजनी मधून एक लाखाहून अधिक क्युसेक पाणी सोडले जाणार असल्याचा अंदाज आहे. वीर धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग 28 हजाराने कमी करण्यात आल्याने आता उजनीमधून भीमा नदीमध्ये विसर्ग वाढणार आहे.
आता उजनी व वीरच्या पाण्याने निरा व भीमा नदी दुथडी भरून वाहात आहेत. नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून नृसिंहपूर संगमच्या पुढे सोलापूर जिल्ह्यात भीमा आता पूरसदृश्य स्थितीत वाहण्यास सुरूवात होणार आहे.
यामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी शिरू शकते. सध्या भीमाकाठच्या शेतकर्यांचे लक्ष उजनी व वीरच्या विसर्गांकडे आहेे. पंढरपूरमध्ये ही नदीकाठी असणार्या वसाहतींमध्ये एक लाख दहा हजार क्युसेकचा विसर्ग मिळाल्यास पाणी शिरते. हे पाहता नगरपरिषद व स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी या वसाहतींमधील नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यास सुरूवात केली आहे.
भीमाकाठी अतिदक्षता सध्या उजनी व वीरमधून सोडण्यात येणार्या पाण्यात सतत वाढ होत असल्याने नद्यांची पाणी पातळी वाढत आहे. भीमेला पूरसदृश्य स्थिती निर्माण होणार असल्याने पंढरपूरसारखी शहर व सखल भागात जास्त खबरदारी घेतली जात आहे. नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पंढरपूरमध्ये प्रशासनाने खबरदारीच्या उपाय योजना आखल्या आहेत. संभाव्य पाणी येवू शकणार्या वसाहती रिकाम्या केल्या जात आहेत. यासाठी नगरपरिषदेचे कर्मचारी व अधिकारी काम करत आहेत.