□ प्रथमेश म्हेत्रे यांच्या याचिकेमुळे होणार बदल..!
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी बाजार समितीवरील संचालक मंडळाची मुदतवाढ रद्द करून त्या ठिकाणी अशासकीय व्यक्तींचे प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्याचा प्रस्ताव अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिला होता. या प्रस्तावावर फडणवीसांनी ‘कार्यवाही करावी’ अशी शिफारस करून तो प्रस्ताव पणन विभागाकडे पाठविला होता. या प्रस्तावावर सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी उच्च न्यायालयात याचिकेद्वारे धाव घेतली होती. झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने फडणवीसांची ती शिफारस अमान्य केली आहे. Akkalkot. High Court’s shock to Fadnavis; The recommendation on MLA Kalyanshetty’s proposal was rejected
दरम्यान, राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला राज्यातील मुदत संपलेल्या बाजार समितींच्या निवडणुका घेण्यासंदर्भात ७ सप्टेंबरपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. प्राधिकरणाने सहा सप्टेंबर रोजीच बाजार समित्यांसाठी निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी येत्या १६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तोपर्यंत बाजार समितीमधील अशासकीय प्रशासक मंडळ नेमण्याच्या हस्तक्षेपाला चाप बसला आहे.
माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रेंचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या दुधनी बाजार समितीवर त्यांचे पुतणे प्रथमेश म्हेत्रे सभापती आहेत. या समितीच्या संचालक मंडळाची मुदत २२ डिसेंबर २०२१ रोजी संपली आहे. सरकारने मे २०२२ मध्ये राज्यातील सर्वच बाजार समित्यांच्या संचालक मंडळांना २२ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दुधनी बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदतवाढ रद्द करून त्या ठिकाणी मोतीराम राठोड यांना सभापती व सातलिंगप्पा परमशेट्टी यांना उपसभापती करून या मंडळात जयशेखर पाटील, मलकण्णा कोगणूर, दयानंद बमनळ्ळी, मदगोंडा पुजारी, चनय्या पुजारी यांचा प्रशासकीय सदस्य म्हणून समावेश करावा, असा प्रस्ताव आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाने तयार केला.
या प्रस्तावावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी कार्यवाही करावी, असा शेरा लिहित हे पत्र पणन विभागाकडे पाठविले. या पत्राचा आधार घेत सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली.
न्यायालयाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा हस्तक्षेप अमान्य करत या बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ नियुक्तीस तूर्तास नकार दर्शविला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ नोव्हेंबरला उच्च न्यायालयात होणार असून सध्या तरी या न्यायालयातील लढाईत आमदार कल्याणशेट्टीच्या पुढे माजी मंत्री म्हेत्रे व सभापती म्हेत्रे यांनी एक पाऊल पुढे टाकल्याचे चित्र आहे. यात म्हेत्रे यांच्याकडून ॲड. अभिजीत कुलकर्णी यांनी काम पाहिले.
□ म्हेत्रेंच्या याचिकेमुळे राज्यातील बाजार समितींच्या निवडणुका जाहीर
राज्यातील जवळपास २८३ बाजार समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग सभापती प्रथमेश म्हेत्रे यांच्या याचिकेमुळे मोकळा झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील दुधनी, कुर्डूवाडी, मोहोळ, सांगोला, अकलूज व अक्कलकोट या सहा बाजार समित्यांची निवडणूकीची प्रक्रिया राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने जाहीर केली आहे. या सहा बाजार समित्यांची निवडणूक जुन्या पद्धतीने होणार आहे. या सहा समित्यांच्या निवडणुकीसाठी शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळणार नसल्याचे सध्या तरी स्पष्ट झाले आहे.