सोलापूर/ अजित उंब्रजकर : घर फिरले की घराचे वासेही फिरतात ही म्हण अगदी तंतोतंत सोलापूर शहर राष्ट्रवादीला लागू होत आहे. सत्ता असताना जोमात असलेली राष्ट्रवादीला काँग्रेस सत्ता नसताना आता कोमात गेल्याचे चित्र दिसत आहे. सत्ता असताना अनेक नेते राष्ट्रवादीला प्रवेश यासाठी इच्छुक होते. सद्य परिस्थितीत राष्ट्रवादीत जाण्यासाठी इच्छुक असलेले महेश कोठे, आनंद चंदनशिवे यांच्यासारखे अनेक नेत्यांनी सध्या वेट अॅन्ड वॉचची भूमिका होते. घेतल्याचे दिसून येत आहे. Nationalists who came into power went into a coma after the transfer of power, Solapur Mahesh Kothe Anand Chandanshive
महाराष्ट्रात महाआघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीला सत्तेत आल्यानंतर दोन अडीच वर्षासाठी पक्षाला संपूर्ण राज्यात चांगले दिवस आले. सोलापूर शहरातही तशीच परिस्थिती दिसून आली. महापालिका निवडणुकीत डझनभरच्या आसपास नगरसेवक निवडून येणाऱ्या राष्ट्रवादीला सुगीचे दिवस आले. त्यामुळे दस्तुरखुद्द, पक्षाचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी सोलापुरात लक्ष घातले.
पवार यांनी सोलापूर महापालिकेत राष्ट्रवादीचा महापौर बसवण्याचे स्वप्न पाहिले होते. सोलापुरात मेळावा घेऊन याबाबत घोषणाही केली. त्यानंतर राष्ट्रवादीमध्ये अनेक दिग्गजांचा ओढा वाढल्याने पवारांचे स्वप्न खरे होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. माजी महापौर महेश कोठे, आनंद चंदनशिवे, तौफिक शेख, सुधीर खरटमल यांच्यासह अनेक नेते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छुक होते.
तत्कालिन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विविध निधी देऊन अनेक नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना पक्षात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. खा. शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे आदींनी सोलापूर शहरात दौरे ही करून राष्ट्रवादी मजबूत करण्याचा प्रयत्न केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
इतर पक्षातील नगरसेवकांना निधीचे आमिष दाखवत स्वतःकडे ओढण्याचा प्रयत्नही केला. राष्ट्रवादीने महेश कोठे यांच्या माध्यमातून शिवसेना आणि काँग्रेसमधील नेते फोडण्यावर भर दिला. याला काही प्रमाणात यशही आले. सेनेचे दहा ते पंधरा, काँग्रेसचे ५ आणि एमआयएमचे ६ असे मिळून २५ ते ३० नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात आले. त्यांचा प्रवेशाचा कार्यक्रमही ठरला. सर्व काही सुरळीत असताना जून महिन्यामध्ये महाराष्ट्रात सत्तांतर झाले त्यानंतर भाजप आणि सेनेची (शिंदे गट ) सत्ता आली तर काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना सत्तेच्या बाहेर पडली.
अचानक महाराष्ट्रात झालेल्या सत्ता बदलानंतर मात्र घड्याळाचे काटे उलटे फिरल्याचे दिसून येत आहे. सत्तांतर झाल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणाऱ्यांचा ओढा थांबला आहे. तौफिक शेख हे मात्र याला अपवाद ठरले. त्यांनी आपल्या समर्थकांसह आपला प्रवेश पक्का करत शरद पवारांचा विश्वास
शाबूत ठेवला. मात्र इतर नेत्यांचे प्रवेश मात्र रखडले.
सत्तातंरानंतर जे राष्ट्रवादीच्या संपर्कात होते अशा काही प्रमुख माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचा रस्ता धरला आहे. तर अनेकांनी वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतली आहे. याशिवाय खुद्द राष्ट्रवादीमधीलही शेकडो पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा राजीनामा देत शिंदे गटाचा रस्ता धरला आहे.
या पदाधिकाऱ्यांनी पक्षातीलच नेत्यांवर आरोप सुरू केले आहेत. त्यामुळे मध्यंतरी वर्षभराच्या काळात जोमात आलेली राष्ट्रवादी काँग्रेस कोमात गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे शरद पवारांनी महापौर बसवण्याचे पाहिलेले स्वप्न स्वप्न राहण्याची शक्यता सध्या तरी राजकीय परिस्थितीवरून दिसत आहे.
□ वेट अॅन्ड वॉचची भूमिका
माजी महापौर महेश कोठे, आनंद चंदनशिवे हे प्रमुख दोन नेते राष्ट्रवादीमध्ये जाण्यास इच्छुक होते. कोठे यांनी तर इतर पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांना फोडून राष्ट्रवादीत आणले. आनंद चंदनशिवे यांनीही माजी पालकमंत्री दत्ता भरणे यांच्या माध्यमातून मोठा निधी आणला होता. या दोघांच्या प्रवेशाची सर्वांनाच उत्सुकता होती. मात्र सत्तांतर झाल्यानंतर या दोघांनीही सध्या वेट अॅन्ड वॉचची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. आगामी काळात कोठे आणि चंदनशिवे कोणता झेंडा हाती घेणार याची चर्चा मात्र महापालिकेतील कट्ट्यावर रोज होत आहे.