□ व्ही.एन.आर जातीची लागवड
सोलापूर – सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील शेटफळ येथील दत्तात्रय लबडे या शेतकऱ्याचा पेरू केरळ बाजारपेठेत विकला जात असून एक किलोला 85 रूपये दर मिळत आहे. यावर्षी त्यांना दोन एकर पेरूपासून सतरा लाख रूपयांपेक्षा जादा उत्पन्न अपेक्षित आहे. Solapur farmer’s guava in Kerala market; 85 rupees per kg for Peru
शेतकरी आपल्या शेतीमध्ये नेहमीच वेगवेगळे प्रयोग करीत असतो. करमाळा येथील दत्तात्रय रामदास लबडे यांनी चार वर्षांपूर्वी आपल्या शेतामध्ये मध्य प्रदेशातील नर्सरीमधून रोपे आणून दोन एकर व्ही.एन.आर जातीच्या पेरूची लागवड केली आहे. आतापर्यंत त्यांनी भरघोस उत्पादन मिळवत दोन पिके घेतली आहेत. सध्या त्यांनी तिसऱ्यांदा आपल्या बागेतील पेरूची काढणी सुरू केली आहे. दोन एकरामध्ये 20 टन पेरूची विक्री करत आतापर्यंत सरासरी सत्तर रूपयाचा दर मिळवत चौदा लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे.
आणखी दहा टनापर्यंत उत्पादन अपेक्षित असून सध्या त्यांच्या पेरूला केरळ येथील बाजारपेठेत चांगली मागणी असल्याने ते एका व्यापाऱ्याच्या मध्यस्थीने पेरू केरळ येथील बाजारपेठेत पाठवत आहेत. केरळला सध्या प्रतिकिलो 85 रुपये प्रमाणे दर मिळत आहे. या वर्षी त्यांना दोन एकर पेरू पिकापासून तेवीस लाखापेक्षा जादा रुपयाचे उत्पन्न अपेक्षित आहे. प्रगतशील बागातदार म्हणून ओळख असलेल्या दत्तात्रेय लबडे यांनी आजपर्यंत आपल्या शेतात ऊस, केळी, कलिंगड, शतावरी याचे भरघोस उत्पादन घेतले आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सध्या गावातील शेतकरी गटशेतीच्या माध्यमातून केळीबरोबरच पेरू पिकाचाही प्रयोग करत आहेत. आतापर्यंत पुणे, मुंबई, दिल्ली बाजारपेठेत या गावातील पेरू पाठवला जात होता. परंतु लबडे यांनी प्रथमच यावर्षी केरळ राज्यांमध्ये आपला पेरू पाठवण्यास सुरुवात केली. त्यांना दरही चांगला मिळत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे .
पेरू बागेत केलेल्या योग्य नियोजनामुळे मिलीबगसारख्या रोगांपासून त्यांची बाग दूर ठेवण्यात त्यांना यश मिळाले आहे. फळ खराब होऊ नये म्हणून त्यांनी क्रॉप कव्हर व प्लॅस्टिक बॅगचा वापर केला आहे. यामुळे कोणत्याही रोगापासून पेरूचे संरक्षण तर झालेच असून पिकाची गुणवत्ता व दर्जा हे चांगला राखण्यात त्यांना मदत झाली आहे. सध्या त्यांची पेरूशेती या परिसरातील इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे. आपल्या शेतीमध्ये माहितीसाठी आलेल्या इतर शेतकऱ्यांना ते आवर्जून या पिकातील बारकावे समजावून सांगतात.
“माझ्या दोन एकर क्षेत्रामध्ये मी पेरूचे पीक घेतले आहे. मागील दोन वर्षात कोरोनामुळे उत्पादन चांगले मिळूनही माझ्यासह अनेक शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळू शकले नाही. यामुळे वेगळे पीक घेण्यात आपण चुकलो तर नाहीना अशी शंका येत होती. मात्र यावर्षी दरही चांगला मिळत असल्याने जादा उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.”
दत्तात्रय लबडे ( पेरू उत्पादक शेतकरी, शेटफळ ता.करमाळा )