सोलापूर : सोलापूर मधल्या सिंधी, गुजराती समाजांनी माझ्यावर खूप प्रेम केले. सर्व समाजाने मला नेहमीच पाठिंबा दिला. पण विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर काँग्रेसमध्ये मला कारस्थान करून मुख्यमंत्री पदावरून दूर केले आणि आंध्र प्रदेशात राज्यपाल म्हणून पाठवले, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचा स्वपक्षीय नेत्यांवर नाव न घेता आरोप केला आहे. I was intrigued and removed from the post of Chief Minister; Former Union Minister Sushilkumar Shinde’s accusations against independent party leaders
महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळातर्फे अध्यक्ष डॉ. हेमराज शहा यांच्या हस्ते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भारत गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी राजीव प्रधान, किशोर चांडक, केशव रांभिया, विजय पटेल, नयन जोशी यांचा महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, मला संधी मिळत गेली तसे मी काम करत गेलो. आपली परिस्थिती कशीही असू द्या, काम मन लावून करायला हवे. सोलापूरकरांमुळे हे मी करु शकलो. त्यांच्यामुळेच मी मोठा झालो. म्हणून हा पुरस्कार मी सोलापूरकरांना अर्पण करत असल्याचे म्हटले.
उद्योजक बिपीनभाई पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. गुजराती मित्रमंडळाचे सचिव जयेश पटेल यांनी स्वागत, तर मुकेश मेहता यांनी प्रास्ताविक केले. डॉ. हेमराज शहा यांनी मंडळाच्या कार्याविषयी माहिती दिली. अध्यक्ष जयप्रकाश पारेख यांनी मंडळाचे कार्यक्रम व दिशा याविषयी मनोगत व्यक्त केले. अक्षय जव्हेरी, मितेश पंचमिया, धर्मेश राडिया, प्रज्ञा ठक्कर, कौशिक शाह यांनी परिचय करुन दिला. संदीप जव्हेरी यांनी सूत्रसंचालन, तर राजेश शहा यांनी आभार मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कांती पटेल, कौशिक शाह, अमित पटेल, नीलेश पटेल, अतुल पटेल, मयुर जगानी, अंकित धरमसी, कौशल रामभिया, कौशल पांचमिया, केविन पटेल आदींनी परिश्रम घेतले.
□ गुजराती समाजाचे कौतुक
सोलापुरात गुजराती समाजाची संख्या . कमी असली तरी ते विचारांचे पक्के आहेत. या संस्थेमध्ये कोणतीही निवडणूक होत नाही. गरजूंसाठी फूल ना फुलाची पाकळी देणारा समाज आहे. गुजराती, मारवाडी, सिंधी -समाजाची मेहनतीवर श्रध्दा असल्याने महाराष्ट्रासह देशभरात यशस्वी झालेले आहेत. सोलापुरातील या समाजांनी गरिबीशी टक्कर देत, कठिण परिस्थितीवर मात करीत वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. बाहेरून आलेले असले तरी सोलापूरला कर्मभूमी मानून स्वतःच्या पायावर उभे राहिले आहेत ही कौतुकास्पद बाब आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले.
□ जावयामुळे गुजराती समाजाला दोन टक्के दिले आरक्षण
सुशीलकुमार शिंदे हे मुख्यमंत्री असताना गुजराती समाजाला दोन टक्के आरक्षण देण्यात आले. या आरक्षणाबाबत आता सुशीलकुमार शिंदे यांनी मोठा खुलासा केला आहे. माझा जावई गुजराती आहे. माझ्या जावयामुळे मी गुजराती समाजाला आरक्षण दिल्याचं शिंदे यांनी मिश्कील टिप्पणीही केली. जावयाला सांभाळायचे म्हटल्यावर हे सगळे करावेच लागते, असेही ते यावेळी म्हणाले आहेत.
सुशीलकुमार शिंदे यांनी आरक्षणाबाबत केलेल्या या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आले आहे. तसेच लोकांना आता मी केलेल्या या कामाचा विसर पडल्याचेही शिंदे यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना शिंदे यांनी स्वपक्षालाच घरचा आहेर दिला आहे. पक्षातील लोकांनीच मला कारस्थान करून मुख्यमंत्रीपदावरू काढले, मात्र त्यांचा त्यानंतर कायमच पराभव झाला असं शिंदे यांनी म्हटलं आहे.
□ सुशीलकुमार शिंदे यांच्याविषयी थोडक्यात
सुशीलकुमार शिंदे हे 16 जानेवारी 2003 ते 1 नोव्हेंबर 2004 या कालावधीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या नेतृत्वात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला यश मिळाले होते. त्यानंतर त्यांच्या ऐवजी विलासराव देशमुख यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदी नेमण्यात आले.
सुशीलकुमार शिंदे 2004 ते 2006 या कालावधीत आंध्र प्रदेशचे राज्यपाल होते. त्यानंतर ते केंद्रीय गृहमंत्रीदेखील झाले. त्यांनी साडेसहा वर्ष केंद्रीय ऊर्जा मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला होता. सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसच्या लोकसभा नेतेपदीदेखील होते. सुशीलकुमार शिंदे हे काँग्रेसचे निष्ठावंत नेते म्हणून ओळखले जातात. गांधी कुटुंबीयांच्या जवळील नेते समजले जातात.