सोलापूर : धमकी आली तरी तब्बल ८० वर्षांचा जाणता राजा मैदानात उतरलाच. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या बाबतीत हे घडलंय. पवारांना कुर्डूवाडी दौऱ्यावर जाऊ नका, असा धमकीचा फोन आला होता, तथापि या धमकीला भीक न घालता डेरिंगबाज आणि ‘पाॅवर’बाज शरद पवारांनी इथला दौरा केलाच. Sharad Pawar’s Kurduwadi trip to ‘Power’ even after threats Abhijit Patil Nationalist trip
माढा तालुका पंचायत समितीचे पहिले सभापती तसेच विधानसभेचे माजी आमदार स्व. विठ्ठलराव शिंदे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी शरद पवार यांचा दौरा होता. या दरम्यान सकाळी दौऱ्याला जाऊ नका, असा धमकीचा फोन आल्याचे वृत्त आहे.
कुर्डूवाडीला येऊ नका, अशा आशयाचा कॉल पण थांबतील ते पवार कसले, ते कुर्डूवाडीला गेलेच, धमकीचा फोन करणारी व्यक्ती कोण आहे? त्याने ही धमकी का दिली? याची माहिती सध्या समोर येऊ शकलेली नाही, पोलिस त्याची चौकशी करतायेत. पण शरद पवार यांनी धमकीला भीक न घालता आपला नियोजित कुर्डूवाडी दौरा पूर्ण केला.
माढा तालुका पंचायत समितीचे पहिले सभापती तसेच विधानसभेचे माजी आमदार स्व. विठ्ठलराव शिंदे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यासाठी शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
शरद पवार यांच्या हस्ते पुतळ्याचं उद्घाटन झालं. आमदार बबनदादा शिंदे आणि आमदार संजयमामा शिंदे या दोन्ही बंधूंकडून सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. माढा तालुक्यात बबनदादा शिंदे आणि संजय शिंदे यांचं मोठे वर्चस्व आहे. सध्या ते भाजप नेत्यांच्या संपर्कात होते पण ऐनवेळी त्यांनी शरद पवार यांना कार्यक्रमाला बोलाविल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे.
शरद पवार यांना लोकनेते म्हणून ओळखले जाते. कायम लोकांच्या गराड्यात राहणं पवार पसंत करतात. आतापर्यंत अनेक वेळा पवारांना अशा धमक्या आल्या. पण पवारांनी पर्वा न करता किंबहुना धमकीला भीक न घालता आपले नियोजित दौरे पूर्ण केले, तसा आजचा दौराही त्यांनी पूर्ण केला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ शरद पवारांच्या गाडीत बसून अभिजित पाटील यांचा राष्ट्रवादीच्या दिशेने प्रवास
पंढरपूर : टेंभुर्णी येथील एका कार्यक्रमांमध्ये शरद पवार आणि अभिजीत पाटील यांची भेट झाली. कार्यक्रम झाल्यानंतर शरद पवारांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटलांना गाडीत बसण्याचा सल्ला दिला. त्यांनी तो मानत शरद पवारांच्या गाडीत बसून पुढील प्रवासाला गेले.
नुकतेच ईडीच्या छापेमारीने चर्चेत आलेले अभिजीत पाटील हे शरद पवार यांच्या गाडीत बसले आणि गाडी पुण्याकडे मार्गस्थ झाली. या सर्व प्रकारामुळे शरद पवार अभिजीत पाटील यांच्याशी कोणत्या गोष्टीवर चर्चा करणार याची चर्चा रंगली आहे. टेंभुर्णीपासून येवतपर्यंत या दोघांमध्ये प्रदीर्घ अशी चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
येणाऱ्या काळात अभिजीत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील या चर्चेला आता उधाण आले आहे. कारण स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर तालुक्यात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली आहे. अभिजीत पाटील यांनी आपल्या कर्तृत्वावर सहा साखर कारखाने व्यवस्थित चालवून दाखवले आहेत. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत विजय मिळवून अभिजीत पाटील यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. विठ्ठलचे गेल्या दोन वर्षांपूर्वीचे उसाचे बिल अभिजीत पाटलांनी दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.
पंढरपूर तालुक्यातील नेतृत्वाची पोकळी अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून भरून निघेल, असे शरद पवारांना वाटत असल्यामुळे त्यांनी अभिजीत पाटलांना सोबत घेऊन आज प्रवास केल्याचे बोलले जात आहे. आता हा प्रवास राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशापर्यंत सुरू राहील.