दशरथ नागनाथ नारायणकर (वय-३५, रा. गंगाई केकडे नगर) असं खून झालेल्या युवकाचे नाव असून तो त्या परिसरात ऑनलाइन मटका घेत असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृत नारायणकर हे केकडे नगरमधील आपले नातेवाईक असलेल्या कोकणे यांच्या घरी भाड्याने गेल्या तीन महिन्यापासून राहत होता.
यापूर्वी तो डोंबरजवळगे (ता. अक्कलकोट) येथे राहत असल्याची माहिती आहे. त्यां ठिकाणी त्याची शेती आहे. उपजीविकेकरता तो पत्नीसह शहरात आला होता. त्याला एक मुलगी आहे. आज बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांना मोबाईलवरून कोणाचा तरी फोन आला. त्यानंतर तो घराबाहेर गेला. त्याचवेळी अनोळखी व्यक्तीने त्यांचा गळा आवळून धारधार शस्त्राने गळा कापून खून केला.
दरम्यान त्यांची पत्नी घराबाहेर गेलेला पती अजून कसा आला नाही, हे पाहाण्यासाठी बाहेर आली असता, तिचा पती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आलं. पत्नीने आक्रोश करताच ही माहिती साऱ्या परिसरात कळाली. त्या ठिकाणी एकच गर्दी झाली. नागरिकांनी ही खबर एमआयडीसी पोलीस ठाण्याला दिली. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच पोलीस उपायुक्त प्रीती टिमरे, पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर, आदिनी त्या ठिकाणी घटनास्थळी भेट दिली.
शवविच्छेदनासाठी प्रेत सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. मृत दशरथ नारायणकर यांच्या पत्नीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी तसेच रहिवाशांनी एकच गर्दी केली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ पत्नीने केला होता आरोपीला पकडण्याचा प्रयत्न
पत्नी अरूणाने घाबरून आरडा ओरड केली. त्यावेळी एक अनोळखी इसम मागील दरवाजाजवळ हातात दोरी घेऊन बसलेला आढळला. अरुणा नारायणकर यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. आरोपीच्या हातातील लोखंडी कडे पकडून त्यांनी आरडाओरड केली.
त्यांच्या आवाजाने वरच्या मजल्यावर राहणारे त्यांचे मामा(रखमाजी कोकणे) हे खाली येऊन आतून बंद असलेल दरवाजा वाजवू लागले. तेव्हा आरोपीने अरुणा यांच्या हाताला चावा घेण्याचा प्रयत्न करीत हात सोडवून मागच्या दरवाजातून पसार झाला. कोकणे यांनी त्या इसमाचा पाठलाग केला. मात्र तो अंधाराच्या दिशेने गायब झाला. हा प्रकार घडल्यानंतर कोकणे यांनी याची माहिती पोलिसांना कळविली.
या घटनेची फिर्याद मयताची पत्नी अरुणा नारायणकर (वय २९) यांनी एमआयडीसी पोलिसात दाखल केली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ३० ते ३५ वयोगटातील, अंगात काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि त्याच रंगाची पॅन्ट नेसलेल्या अनोळखी इसमाविरुद्ध विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजन माने करीत आहेत.
○ हा खून पोलिसांना चक्रावून टाकणारा
हा खून कशासाठी झाला असावा याचे कारण मात्र गुलदस्त्यात असून, मध्यरात्रीच्या सुमारास झालेला हा खून पोलिसांना चक्रावून टाकणारा आहे. नेमक्या कोणत्या कारणाकरिता हा खून झाला. खून करणाऱ्यांनी नेमकी मध्यरात्रीची का वेळ निवडली, असे एक ना अनेक कंगोरे पोलीस आपल्या तपासात शोधत आहेत.
□ लक्ष्मीदहिवडी येथे काठीने बदडून दात पाडले; पती आणि दीराविरुद्ध गुन्हा
मंगळवेढा – लक्ष्मीदहिवडी येथील चाळीस धोंडा येथे झोपेत असलेल्या विवाहितेस विनाकारण काठीने बेदम मारहाण करून तिच्या तोंडातील दात पाडले. ही घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणात मंगळवेढाच्या पोलिसांनी जखमीचा पती आणि दीराविरुद्ध गुन्हा दाखल केला.
यासंदर्भात बालिका सिद्धाराम सलगर (वय २५) या जखमी विवाहितेने मंगळवेढा पोलिसात फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी तिचा पती सिद्धाराम बीरा सलगर आणि त्याचा भाऊ तुकाराम सलगर या दोघाविरुद्ध गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल केला. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास बालिका सलगर ही घरात झोपली होती.
मध्यरात्रीच्या सुमारास दोघे घरात येऊन तिला विनाकारण शिवीगाळ आणि धमकी देत होते. तुम्ही शिवीगाळ करू नका असे म्हणाले असता सिद्धाराम सलगर याने तिला काठी तसेच कातडी पट्ट्याने बेदम मारहाण केली. त्यावेळी तिच्या तोंडातील दात पडले. अशी नोंद मंगळवेढा पोलिसात झाली आहे.