□ माळशिरस तालुक्यातील तिरवंडी येथील घटना
□ सरकारने आर्थिक मदतीत वाढ करण्याची शेतकऱ्याची मागणी
सोलापूर – लम्पी आजाराने पशुपालकांची चिंता वाढवलेली असतानाच सोलापूर जिल्यातील माळशिरस तालुक्यातील तिरवंडी येथील शेतकऱ्याच्या एका बैलाचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. Malshiras, the first victim of lumpy skin in Solapur district, demands an increase in government aid
जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असून प्रशासनाकडून खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. असे असले तरी तिरवंडी (ता. माळशिरस) येथील हिंदुराव तुकाराम वाघमोडे यांच्या एका बैलाचा लम्पीमुळे मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. 21) घडली आहे.
लम्पीमुळे जनावरांचा मृत्यू झाल्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे. जिल्ह्यातील २४ गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव झाला असून सध्या ४८ लम्पीबाधित जनावारांवर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ७२ गाय आणि बैल व एक म्हैस अशा ७३ जनावारांना लम्पीची लागण झाली होती. त्यापैकी २३ गाय व १ म्हैस, अशी एकूण २४ जनावारे बरी झाली प्र:स्थितीत ४८ गाय आहेत. सद्य: लम्पीबाधित आहेत. आतापर्यंत ४२ हजार ८९१ जनावारांना लसीकरण झाले आहे.
जिल्ह्यासाठी सध्या लम्पी लसचे १ लाख ८८ हजार ६०९ डोस उपलब्ध आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत माळशिरस तालुक्यात ४९, सांगोला तालुक्यात ११, उत्तर सोलापूर तालुक्यात ४, माढा तालुक्यात ५, मंगळवेढा तालुक्यात १, पंढरपूर तालुक्यात २ व बार्शी तालुक्यात १ लम्पी बाधित जनावरे आढळली आहेत.
लम्पीच्या प्रादुर्भावामुळे पशुपालक चिंतेत असून शासनाने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. पशुधन वाचविण्याचे पशुपालकांच्या समोर एक मोठे आव्हान उभे असून शेतकरी धास्तावला आहे. बैल हा शेतकऱ्यांचा निष्ठावान साथीदार असून बैलाला कुटुंबातील एक घटक मानून शेतकरी त्याची निगा राखत असतो पण आता हा जनावरांना लम्पी स्किन’ सुरु झाल्यामुळे आपली जनावरे वाचविण्यासाठी शेतकरी धडपडू लागला आहे. त्यासोबत प्रशासन आणि पशु वैद्यकीय विभाग देखील कामाला लागला आहे, अशा परिस्थितीत सोलापूर जिल्ह्यात लम्पीचा पहिला बळी गेला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
राज्याबरोबर सोलापूर जिल्ह्यातही या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असताना सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील तिरवंडी येथील हिंदुराव तुकाराम वाघमोडे यांच्या एका बैलाचा मृत्यू झाला असून या आजाराने बैलाचा मृत्यू होण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.
या घटनेमुळे शेतकऱ्यांची चिंता आता वाढली असून प्रशासनापुढे असलेले आव्हान देखील आता वाढताना दिसू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून या आजाराचा प्रादुर्भाव सोलापूर जिल्ह्यात दिसून येत होता परंतु अशी घटना मात्र घडलेली नव्हती.
□ सरकारने मदतीत वाढ केली पाहिजे
जिवापाड जपलेला बैल मागच्या आठवड्यात अचानक आजारी पडला होता.अंगावर मोठ मोठ्या गाठी आल्या होत्या. डोळ्यातून सतत पाणी येत होते म्हणून डॉक्टराकडून मागील पाच सह दिवसापासून उपचार सुरू होते.परंतु परवा रात्री अचानक बैल गेला.
“आज तो विकला असता तर ६० ते ७० हजार रूपये आले असते. परंतु सरकारकडून फक्त २५ हजार मिळतील, असे डॉक्टरांनी सांगितले आहे. पण यात वाढ करून कमीत कमी ७० हजार रूपये तरी मदत मिळाली पाहिजे. सरकारकडून आठवड्याभरात मदत मिळणे गरजेचे आहे. लवकर नाही मिळाली तर शेती पडीक ठेवावी लागेल. कारण एका बैलावर शेती करू शकत नाही”
हिंदुराव तुकाराम वाघमोडे
– शेतकरी, तिरवंडी (ता.माळशिरस)
□ मदतीसाठी अहवाल पाठविला आहे
तालुक्यात १ लाख ४६ हजार जनावरे आहेत. त्यापैकी ३० हजार ६३ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाली आहेत. तर उर्वरित जनावरांना सरसकट लसीकरण करण्याचे काम गतीने सुरू आहे. तालुक्यात एकूण ७६ जनावरे बाधित होती. त्यापैकी २९ जनावरे बरी झाली आहेत व बाकीच्या जनावरांवर उपचार सुरु आहेत.संबंधित शेतकऱ्यांच्या बैलावर उपचार सुरूच होतो. परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. नियमानुसार त्या बैलाचा पंचनामा व इतर बाबीची पुर्तता करून त्या शेतकऱ्यांला शासन नियमानुसार मदत मिळण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे अहवाल पाठविला आहे.