सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या परिवहन विभागाचे 2017 ते 2018 पासूनचे ऑडिट करण्यासाठी पाच जणांचे पथक सोलापुरात दाखल झाले आहे, अशी माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली. Audit of Transport Initiative begins; A team of five people entered Solapur Municipality
सोलापूर महापालिकेच्या परिवहन विभागाचे गेल्या चार ते पाच वर्षांपासून ऑडिट नसल्याची बाब आयुक्तांना निदर्शनास आली होती. त्यानंतर हे ऑडिट सुरू करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. यामध्ये परिवहन विभागातील सर्व दप्तर इतर जमाखर्चाचा हिशोब यासह विविध विभागांचे ऑडिट होणार आहे.
“आमदनी अठन्नी और खर्चा रुपय्या !” अशा परिस्थितीत अडकलेल्या सोलापूर महापालिकेच्या परिवहन उपक्रमाचा खर्च कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. महापालिका प्रशासनाने गेल्या दोन वर्षात कामचुकार, बेशिस्त कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. आतापर्यंत दीर्घकाळ गैरहजर असणाऱ्या २१ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात असलेल्या महापालिकेतील परिवहन उपक्रमाला उर्जितावस्था देण्यासाठी प्रशासनाकडून आटोकाट प्रयत्न करण्यात आले आहेत. वरचेवर विविध कारणास्तव मनपा बस सेवा ही तोट्यातच चालत असून परिवहन उपक्रम पुरता डबघाईला आला आहे.
दरम्यान या उपक्रमात डिझेल घोटाळा यासह विविध अनियमितता असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे काही जणांवर कारवाईचा बडगाही उचलण्यात आला आहे. या ऑडिट नंतर आता त्या उपक्रमाचे आर्थिक पोस्टमार्टम होणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ ५४ मीटर बाह्य रस्त्यावरील बाधित होणाऱ्या ४४ कुटुंबांचे स्थलांतर !
¤ महापालिका प्रशासनाकडून दोन ठिकाणी पुनर्वसनाचे नियोजन !
सोलापूर : छत्रपती संभाजी महाराज चौकापासून अवंती नगर पुढे जाणाऱ्या ५४ मीटर बाह्यवळण रस्त्याच्या कामातील बाधित ४४ कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचा अंतिम निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला असल्याची माहिती महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.
दरम्यान, आणखी काही संमती न दिलेल्या कुटुंबांसाठी देखील त्यांच्या पुनर्वासनासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही आयुक्त पी. शिवशंकर यांनी सांगितले. 54 मीटर बाह्य वळण रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून रखडले असून यासाठी महापालिका प्रशासनाकडून सतत प्रयत्न सुरू होते.
यामध्ये बाधित होणाऱ्या घरांच्या लोकांशी अनेक वेळा चर्चा सुनावणी आणि पुनर्वसनासंदर्भात ही निर्णय घेण्यात आला होता मात्र काही कारणावरून पुढील प्रक्रिया ही थांबली होती. ५४ मीटर बाह्य वळण रस्त्यासाठी देशमुख प्लॉट, हांडे प्लॉट आणि देशमुख- पाटील वस्ती येथील सुमारे ५० हून अधिक घरे बाधित होणार होती. यावर प्रारंभीच्या काळात मोठा प्रश्न देखील उपस्थित झाला होता.
मात्र महापालिका प्रशासनाने सातबारा उतारा असलेल्या घरांच्या पुनर्वसनाची जबाबदारीही घेतली होती. या संदर्भात तेथील नागरिकांबरोबर अनेक बैठका देखील पार पडल्या. अखेर या प्रकरणात घेतलेल्या निर्णयानुसार पुनर्वसन ची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे.
यामध्ये देशमुख प्लॉट येथील सातबारा उतारा असलेल्या ९ जणांचे पुनर्वसन तेथीलच रेल्वे ट्रॅक जवळ असलेल्या महापालिकेच्या जागेत करण्यात आले आहे. यासाठी त्यांनी संमती दर्शविली असून उर्वरित इतरांच्या ही पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचबरोबर हांडे प्लॉटमधील २५ कुटुंब आणि देशमुख पाटील वस्तीमधील १० जण अशा ३५ जणांचे पुनर्वसन महापालिकेच्या जागेत असलेल्या लेप्रसी कॉलनीत करण्यात येणार आहे. या संदर्भात त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या असून नोटिसांची कार्यवाही देखील पूर्ण झाली आहे.
30 ऑक्टोबरपर्यंत या सर्व ४४ कुटुंबांची स्थलांतर प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून यापुढे ५४ मीटर रस्त्याच्या बाधित ठिकाणी अडथळा ठरतील त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शिवशंकर यांनी दिली. महापालिका प्रशासनाच्या या यशस्वी कार्यवाहीमुळे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचे काम पूर्ण होऊन वाहतूक देखील शहराबाहेरून मार्गी लागेल अशी आशा आता व्यक्त केली जात आहे.