सुमारे ९३ वर्षे सोलापूरकरांच्या सेवेत असणारी ‘लक्ष्मी’ अखेर शांत झाली. चंचल लक्ष्मीला शांत करण्याचे धाडस ज्या सोलापूरकरांच्या अंगी दिसून आले, त्यांचे कौतुकच करायला हवे ना ? आपल्या चंचलतेचा गर्व असणारी लक्ष्मी शांत करून या तथाकथित धाडसी सोलापूरकरांनी लक्ष्मीला आपले गुण दाखवून दिलेले आहेत.. Social block: Finally ‘Lakshmi’ calmed down Laxmibank Solapur meaning
स्वातंत्र्याचा संग्राम असो, दुसरे महायुद्ध असो, स्वातंत्र्यानंतरचा भारत असो, १९७२ चा दुष्काळ असो. देशाच्या अर्थकारणात झालेले आमूलाग्र बदल असोत नाहीतर नोटबंदी, या व अशा अनेक संकटांना तोंड देत लक्ष्मी कार्यरत होती. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाप्रमाणे ती आपला संसार थाटून आणि सांभाळून होती.
शहरातील तत्कालीन नामवंत प्रामाणिक व्यक्तींनी लक्ष्मीची प्रतिष्ठापना केलेली होती. अर्थातच ही सारी मंडळी प्रामुख्याने ब्राह्मण समाजाची होती हे सांगावेच लागेल. कारण अनेक उत्तमोत्तम संस्था ब्राह्मणांनी स्थापन केल्या आहेत. नंतर अनेक कारणाने ज्यामध्ये राजकीय आणि त्याला विसरून येणारी जातीची समीकरणे सुध्दा आहेत, या व अशा संस्थावरील ब्राह्मणांचे नियंत्रण संपलेले होते. अर्थात हा एक स्वतंत्र विषय आहे. त्यावर कधीतरी भाष्य करू, असो.
सर्वसामान्यांना आपली वाटणारी लक्ष्मी सहकारी बँक उत्तरार्धातील संचालकांच्या कारभारामुळे आज अस्तंगत पावलेली दिसते आहे. कायद्याच्या चौकटीचा विचार केला तर तिला पुनर्जिवीत करता येईल असे म्हणतात. पण यासाठी पुढाकार घेणार कोण? हा एक मोठा प्रश्न उपस्थित झालेला आहे. कारण मागील संपूर्ण वर्षभरात लक्ष्मी सहकारी बँक नव्या उभारीने सुरू व्हावी यासाठी कोणी काही फार मोठे प्रयत्न केल्याचे दिसून येत नाहीत.
एक थकीत कर्जदार यासाठी पुढाकार घेत होता. पण तो प्रामाणिक नसल्यामुळे आणि स्वतःचे पैसे परत करण्याची वृत्ती नसल्यामुळे, त्याचे नेतृत्व कोणी स्वीकारले नाही आणि ते स्वीकारण्यासाठीही नव्हते. म्हणून लक्ष्मी बँकेच्या पुनर्जीवनाबाबत नवा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. काळाच्या उदरात काय घडले आहे त्याचा प्राथमिक अंदाज येत आहे पण ही बँक नव्याने उभारी घ्यावी, अशीच सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे.
या लक्ष्मीने अनेकांना अंगावर खांद्यावर घेऊन खेळवलेले आहे. लहानाचे मोठे केलेले आहे. वेळोवेळी आपल्या सहवासाने जमेल त्याचे, जमेल तेवढे आयुष्य समृद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. चार-पाच पिढ्यांची सेवा या लक्ष्मीने केली आहे, असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे होणार नाही. कर्जदारांनी कर्ज नियमाप्रमाणे आणि वेळेत परत केले नाही. म्हणून लक्ष्मीला शांत व्हावे लागलेले आहे. खरंतर हे कर्जदार लक्ष्मी सहकारी बँकेचे सभासद दुसऱ्या अर्थाने आपण त्याला मालकच म्हणतो ना? याच मालकांनी आपलं घर विकून खाण्याचे धंदे केले आहेत, असेच आता म्हणावयाची वेळ आलेली आहे. ‘कुऱ्हाडीचा दांडा होतास काळ’ असे जे म्हणतात, ते सर्व सहकारी बँकांच्या बाबतीमध्ये खरे होताना दिसत आहे. ही दुर्दैवाची गोष्ट आहे.
या लक्ष्मीने अनेकांचे आयुष्यात मोठा आर्थिक हातभार लावलेला आहे. पण आपलेच खिसे भरण्याच्या व्यक्तींच्या लोकात या बँकेचे नियंत्रण गेल्यामुळे आज लक्ष्मीला शांत व्हावे लागलेले आहे. एक गोष्ट विशेषत्वाने नमूद करावीशी वाटते. या संदर्भात जेव्हा जेव्हा आम्ही भाष्य करतो तेव्हा तेव्हा अनेकांना आपल्या भावना दुखावल्या गेल्याची आठवण होते. पण या सर्वांनी पुन्हा एकदा शांत चित्ताने पुढे जे काही विचार आम्ही मांडत आहोत, त्यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे.
सोलापूर शहरातील पूर्व भाग खरंतर उद्यमशील लोकांचा भाग. लक्ष्मीच्या वास्तव्याने आणि चलनवलनाने समृद्ध झालेला भाग. या लक्ष्मीने त्यांना एवढे भरभरून दिले की, पूर्व भागातून आता सोन्याचा धूर निघायचाच काय तो शिल्लक राहिलेला आहे, असे म्हणावयाची वेळ आलेली होती. मात्र, याच पूर्व भागातील नेत्यांच्या नेतृत्वाखालील सहकारी बँकांनी आपला जीव गमावलेला आहे असे दिसते आहे. याला काय म्हणायचे ?
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
साधारणतः ३० वर्षापूर्वी लक्ष्मी सहकारी बँकेचे लेखापरीक्षण करण्याचा योग आमच्या आयुष्यात आलेला होता. बँकेस नावे ठेवावीत असे काही नव्हते. बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षात तज्ञ संचालक या भूमिकेतून या बँकेची एक वर्ष सेवा करण्याची संधी आम्हांला मिळालेली होती. सोबत जोडलेला छायाचित्र, हे त्यावर्षी बँकेने भेट दिलेल्या लक्ष्मीच्या चांदीच्या मूर्तीचे छायाचित्र आहे. आज याच मूर्तीकडे बघत असताना मन सुन्न झालेले आहे आणि डोळे पाणावलेले.
अजून एक गोष्ट नमूद करावयाची आहे. आम्हीही आज बँकेच्या थकीत कर्जदाराच्या यादीतील एक सभासद आहोत. ज्या तारणाच्या आधारावर कर्ज घेतलेले होते ते तारण विकून बँकेने आमच्याकडील कर्जाची वसुली करावी, ते विकले जाईल याची पूर्णपणे आम्ही खात्री देतो, असे बँकेस गेली अनेक वर्षे आम्ही बँकेस सांगत आलेलो होतो व आहोत. अगदी आज जे प्रशासक नेमलेले आहेत त्यांनाही आम्ही भेटून हे सांगितलेले आहे. मात्र यास मोडता घातला जात आहे, तो बँकेच्या वकिलाकडूनच असे काहीसे सध्याचे चित्र आहे.
आम्ही स्पष्टपणे, स्वच्छपणे आणि प्रामाणिकपणे सांगत आहोत, बँकेची संपूर्ण थकबाकी देण्यास आम्ही बांधील आहोत. ती दिल्याशिवाय आम्हांसही शांत झोप लागणारी नाही. मात्र बँकेच्या गेल्या काही वर्षाच्या व्यवस्थापनाने आणि आत्ताच्या प्रशासकीय यंत्रणेतील व्यवस्थापनाने जी काही धोरणे स्वीकारलेली आहेत, तीच बँकेच्या थकीत कर्जाच्या वसुलीच्या आड येत आहेत हे नक्की.
आम्हांस बँकेच्या कर्जदारांची यादी पाहण्यास मिळालेली आहे. यातील बरेच जण अनेक दशके आणि एक दोन पिढ्या बँकेचे कर्जदार आहेत असे सकृतदर्शनी दिसते आहे. ही नावे प्रशासक जाहीर का करत नाहीत? हा मोठा प्रश्न आहे. धन दांडगे ज्यांना म्हणतात अशी काही नावे यात असावीत, असा संशय घेण्यास जागा आहे.
लक्ष्मी सहकारी बँकेच्या आजच्या स्थितीवरती नेमके काय भाष्य करावे ? या विचाराने मनात थैमान घातलेले आहे. अर्थातच या विचारांना पोरकटपणाने भरकटू देणे आमच्या वृत्तीला, स्वभावाला आणि आजपर्यंतच्या कार्याला साजेसे नाही. म्हणूनच यावर यापुढे जे काही भाष्य करावयाचे आहे ते सर्व परिस्थितीचा, वस्तुस्थितीचा आणि कायद्याचा अभ्यास करून करावे, असे आमचे मन आम्हांस सांगत आहे. मनाचे ऐकले पाहिजे.
● श्रीनिवास वैद्य, सोलापूर