→ तालुक्याच्या ‘राजें’चे राजेपण राष्ट्रवादी आणि भाजपातसुध्दा
→ मोदी दौऱ्याच्या तारखेकडे लक्ष ‘पहले आप’… चा येवू शकतो प्रत्यय
→ मोहिते-पाटील पॅटर्न राबवू शकतात अनगरकर
Mohol: Rejected leadership, now just waiting for BJP entry Rajan Patil Politics Balraje Ajinkyarana
सोलापूर/ शिवाजी भोसले
शरद पवार हेच आमचा पक्ष … शरद पवारांच्या विचारांचे आम्ही पाईक… शरद पवारांचा विचार हाच आमचा विचार… शरद पवारांच्या विचाराचा आमचा मोहोळ तालुका… शरद पवार आमचा श्वास… असे छातीठोकपणे सांगणाऱ्या अनगरकर पाटील परिवाराने बारामतीकरांचे नेतृत्व नाकारल्याचे आता स्पष्टपणे जाणवत आहे.
मोहोळ शहरासह तालुक्याच्या अन्य काही भागात अनगरकर पाटलांच्यासंदर्भात जी डिजिटल दिसत आहेत, त्यावरती शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील यांच्या छबींशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ चिन्ह असे काहीच प्रिंट केलेल दिसत नाही. बारामतीकरांना गॉडफादर समजल्या जाणाऱ्या अनगरकरांनी आपल्या संबंधीच्या डिजिटल बॅनरवरून बारामतीकर नेते आणि राष्ट्रवादीचे चिन्ह गायब केले आहे.
विशेषत्वे, अनगर ग्रामपंचायत तसेच पाटील परिवाराचे निवासस्थान, लोकनेते कारखाना आदी ठिकाणी बारामतीकर नेतेमंडळींच्या असलेल्या छबी अनगरकर पाटील यांनी बाजूला केल्याच्या चर्चेचे ‘मोहोळ’ या तालुक्यात उठले आहे.
गॉडफादर समजल्या जाणाऱ्या बारामतीकर पवार काका-पुतण्याच्या छबी बाजूला केल्याने पाटील परिवाराने बारामतीकरांचे नेतृत्व नाकारल्याचे आता उघड झाले आहे. बारामतीकरांचे नेतृत्व नाकारल्यानंतर प्रश्न उरतो, तो इतर पर्यायाचा. हा धागा लक्षात घेता, खुद्द अनगरकर पाटील परिवार समर्थक, हितचिंतक, तालुक्यातील कार्यकर्त यांना उत्सुकता आहे, ती आपल्या नेते मंडळींच्या भाजप प्रवेशाची देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काही कार्यक्रम घेण्याचे नियोजन करण्यात येत आहे, या खास कार्यक्रमात मोदींच्या हस्ते भाजपाचे उपरणे गळ्यात घालून घेण्याचे अनगरकर पाटील यांचे नियोजन आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तशा प्रकारचे नियोजन करत आहेत, अशी माहिती ‘सुराज्य’ ला मिळाली आहे.
● राजे पुढे… कार्यसम्राट पाठीशी….
अकलूजच्या मोहिते पाटलांचा भाजप प्रवेश पॅटर्न अनगरकर पाटलांच्याबाबतीत राबला जावू शकतो, तशी चर्चादेखील फडणवीस यांच्याकडे झाल्याचे कळते. मोहिते पाटील – परिवारापैकी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी अगोदर भाजपाचे उपरणे गळ्यात घालत प्रवेश केला. तदनंतर ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील हे या पक्षात डेरेदाखल झाले.
त्याप्रमाणे अनगरकर पाटील परिवाराचे नेते आणि कार्यसम्राट राजन पाटील हे मागे पाठिशी राहतील. सुरुवातीला बाळराजे उर्फ विक्रांत पाटील आणि अजिंक्यराणा पाटील हे भाजपात प्रवेश करतील, अशी शक्यता वाटते. बाळराजे आणि अजिंक्यराणा यांच्या भाजप प्रवेशाबद्दल राजन पाटील यांच्याकडे कोणी विचारणा केली तर, ‘पोरांनी ऐकलं नाही, मी नको म्हणत होतो भाजप प्रवेश, नवी पिढी आता ऐकत नाही मी आहे तिथेच आहे’ असे राजन पाटील भाजप प्रवेशावरून ठोकून देतील असा अंदाज राजकीय विश्लेषकांचा आहे.
तर दुसरीकडे तोंडावर बोलणारे, स्पष्टवादी विचारसरणीच्या स्वभावाचे राजन पाटील हे सुपुत्रांना घेवून थेट बेधडकपणे भाजपात प्रवेश करतील, असेही सांगितले जाते. या सगळ्या शक्यता असल्या तरी अनगरकर पाटील परिवाराच्या भाजप प्रवेशाचे नेमके काय होणार ? याचे उत्तर मिळण्यासाठी थोडा वेळ जावू द्यावा लागणार आहे सगळे पत्ते नक्की ओपन होतील हे मात्र नक्की आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 पंढरपूरकरांना करून भकास; नको पंढरीचा विकास
पंढरपूर : वाराणसी कॉरीडॉरप्रमाणे पंढरीत देखील चौफाळा ते महाव्दार घाट या रस्त्याचे दोनशे फूट रुंदीकरण करण्याचे नियोजन अधिकारी पातळीवर सुरू असल्याचा आरोप येथील व्यापारी व नागरिकांनी केला. याला विरोध दर्शविण्यासाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर परिसरात काल बंद पाळून निषेध नोंदवला.
यावेळी प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये नागरिकांची घरे किंवा दुकाने पाडून विकास करण्यास विरोध दर्शविण्यात आला आहे. आषाढी एकादशीस श्री विठ्ठल रूक्मिणीच्या शासकीय महापूजेस आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीर्थक्षेत्र पंढरीचा सर्वकष विकास करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.
याचाच एकभाग म्हणून जिल्हाधिकारी यांच्या पथकाने वाराणसी कॉरीडॉरीची पाहणी केली आहे. तसेच पंढरपूर येथे देखील याच पध्दतीने श्री विठ्ठल मंदिर परिसरात दोनशे फूट रुंदीकरणाचा प्रस्ताव तयार केला असल्याची सध्या येथे जोरदार चर्चा सुुुुरू आहे. याला विरोध करण्यासाठी चौफाळा ते महाद्वार रस्त्यावरील दुकानदार व नागरिकांनी बंंद पाळून प्रस्तावित आराखड्यास विरोध दर्शविला.
येथील नागरिकांंनी स्थानिकांची घरे किंवा दुकाने न पाडता विकास करावा, अशी मागणी केली आहे. यापूर्वी १९८२ साली मंदिर परिसरात रस्ता रूंदीकरण झाले असून त्यावेळी विस्थापित झालेल्या अनेक नागरिकांचे पुर्नवसन झाले नसल्याचे उदाहरण देण्यात आले. तसेच पंढरपूर येथे आजपर्यंत तीनवेळा रूंदीकरण करण्यात आले आहे. यामुळे रूंदीकरणास विरोध दर्शविण्यात आला.
दरम्यान काल बुधवारी सकाळपासूनच मंदिर परिसरातील एकही दुकाने उघडण्यात आले नाही. सकाळी अकरा वाजता व्यापारी, नागरिकांनी पश्चिमव्दार येथे ठिय्या आंदोलन करून भजन केले. मंदिर परिसरातील सर्वच दुकाने बंद असल्याने भाविकांना कुंकू, बुक्का व प्रसादाचे साहित्य खरेदी करता आले नाही.
या आंदोलनात वारकरी पाईक संघाचे रामकृष्ण महाराज वीर, माजी नगरसेवक अनिल अभंगराव, ऋषिकेश उत्पात, शैलेश बडवे, भागवत बडवे, व्यापारी संघाचे प्रभाकर कौलवार, कौस्तुभ गुंडेवार, अरूण कोळी, मनसेचे संतोष कवडे, शिंदे गट शिवसेनेचे सुमित शिंदे, पंढरपूर अर्बन बँकेचे संचालक सोमनाथ होरणे, हिंदू महासभेचे विवेक बेणारे, बाळकृष्ण डिंगरे, संजय झव्हेरी, राहुल परचंडे, राजेश उराडे, सागर खंडागळे, रोहित पारसवार आदी सहभागी झाले होते.
□ या आहेत मागण्या
यावेळी सर्वांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनामध्ये मंदिर समितीचा ज्ञानेश्वर दर्शन न पाडता तेथे समितीचे प्रशासकीय कार्यालय व व्हीआयपी प्रतिक्षालय करावे, मंदिर परिसरात चारचाकी प्रमाणे दुचाकी वाहनांना देखील बंदी करावी, हा परिसर अतिक्रमणमुक्त करावा व नो हॉकर्स जाहीर करून याची अंमलबजावण करावी, स्थानिकांच्या वाहनासाठी वाहनतळ करावे आदी मागण्या करण्यात आल्या.