□ त्या पिडीत महिलेचे जबाब नोंदवताच, अन्य पिडीत महिला तक्रार देण्यास पुढे आल्या
सोलापूर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महापौर मनोहर सपाटे यांच्याविरोधात एका पीडित विधवा शिक्षिकेने अत्याचाराची फिर्याद दाखल केल्यानंतर आणखी काही महिलांनी मराठा क्रांती मोर्चाकडे अश्रू ढाळत सपाटेंचे कारनामे सांगत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिल्याचे कळते. Ex-Mayor of Solapur Nationalist, the weed of torture cases followed Manohar Saptane
शिवाय या महिलांनी सपाटे यांच्याविरोधात अत्याचाराच्या तक्रारी दाखल करण्याची मानसिकता दाखवल्याची माहिती समोर आली असून सपाटेंवर सध्या दाखल झालेल्या प्रकरणात पिडीत विधवा शिक्षिकेचे जबाब नोंदवल्यानंतर अत्याचाराला बळी गेलेल्या अन्य महिला पोलिसांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे समजते.
दरम्यान सपाटेंच्या विरोधात सध्या दाखल असलेला अत्याचाराचा गुन्हा आणि त्यानंतर चार महिलांची गुन्हे दाखल करण्याची दाखवलेली तयारी ही प्राप्त परिस्थिती लक्षात घेता सपार्टेवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे सपाटे यांच्या विरोधात पिडीत महिलेने जी फिर्याद दिली आहे, त्या फिर्यादीमध्ये जे तक्रारीचे मुद्दे नमूद केले आहेत, तशाच प्रकारच्या अत्याचाराचे मुद्दे अन्य महिलांनी मराठा क्रांती मोर्चाकडे उपस्थित केल्याची चर्चा आहे. इच्छेविरुध्द शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडून लैगिंक शोषण करणे, धमकी देऊन पैसे घेणे, शाळेत नोकरीवरून काढण्याची धमकी देणे असाच प्रकार सपाटे यांनी केल्याचे या महिलांनी सांगितल्याची चर्चा आहे.
तक्रार देण्यासाठी ज्या महिलांनी मानसिकता दाखवली आहे, त्यापैकी दोन शिक्षिका या सेवेतून निवृत्त झाल्या आहेत, तर दोन शिक्षिका सध्या कार्यरत आहे, अशीही माहिती समोर येत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ पोलिसांना गुंगारा
सपाटे यांचा शोध लागेनासा झाल्याचे पोलीस सांगत आहेत. सपाटेंच्या शोध मोहिमेवर असलेल्या पोलिसांच्या पथकाने पहिल्यांदा कोल्हापूर पिंजून काढले. सपाटे हे कोल्हापुरातून पुण्याकडे सरकल्याची माहिती मिळाल्यानंतर हे पथक पुण्यात असून सपाटेंचा तिथे कसून शोध सुरु आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली.
□ पोलिसांचे वाढले टेंन्शन
अत्याचार केलेल्या सपाटेंना अटक होऊन त्यांच्यावर कारवाई नाही झाल्यास, महात्मा गांधी जयंती दिवसी २ ऑक्टोबरला आत्मदहन करण्याचा इशारा संबंधित पिडीत महिलेने दिला आहे. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर अटकेसाठी सपाटे यांचा शोध लागत नसल्यामुळे पोलिसांचे टेन्शन वाढले आहे.
कोणत्याही परिस्थितीत २ तारखेपूर्वी सपाटेंना ताब्यात घ्या, अशा सूचना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिल्या आहेत शिवाय या पिडीत महिलेला आत्मदहानाचे टोकाचे पाऊल उचलू नये, यासाठी या महिलेच्या घरी पोलीस बंदोबस्त तैनात करून या महिलेवर निगराणी ठेवायची की ? पोलीस ठाण्यात आणून त्या महिलेवर लक्ष ठेवायचे यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांकडे चर्चा झाली आहे.
तसेच सपाटे यांना कोणत्याही परिस्थितीत आम्ही अटक करू, असे आश्वासन देत त्या महिलेस आत्मदहनापासून परावृत्त करायचे हा देखील पर्याय पोलिसांकडून काढला जाण्याची शक्यता आहे. त्या पिडीत महिलेच्या संदर्भात तिन्ही पर्याय अजमावून पाहिले जातील, असेही सांगण्यात आले.
□ पोलिसांच्या सॉफ्ट कार्नरसाठी पोलिसांवर वजन कोणाकडून आणायचे ?
‘अटकपूर्व जामीनची आम्ही तयार करतोय, पोलिसांनी अटकेसाठी ताण काढू नये, प्रकरण ‘ढिलाईने घ्यावे’ असा पोलिसांना निरोप आणायचा आहे. पण तो नेमका कोणाचा आणायचा ? कोणाचा फोन आल्यानंतर पोलीस ताण काढणार नाहीत, सेटिंग करतील या संदर्भात सपाटे परिवारात विचार मंथन सुरु आहे, असे कळते.
प्राप्त परिस्थितीत, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार तसेच अजित पवार, जयंत पाटील हे प्रकरण अंगाशी लावून घेतील का? सेटिंगसाठी पोलिसांना फोन करतील का? याचाही अंदाज या परिवारात घेतला जात असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले. अटकपूर्व जामीन अर्ज आणि एकूणच दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने, वकील पत्र घ्यावे, अशी विनंती ॲड. मिलिंद थोबडे यांच्याकडे करण्यात आली असून ते या प्रकरणात सपाटेंचे वकील असतील, असेही सांगण्यात आले.
□ महिलांनी घेतली पदाधिकाऱ्यांची भेट
चार महिला मराठा क्रांती मोर्चा पदाधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. सपाटे यांनी ‘त्या’ पिढीत महिलेवर अत्याचार केला, त्याप्रमाणेच आम्हीदेखील अत्याचाराचे बळी ठरलो आहोत, असे सांगत, अन्याय झालेल्या त्या महिला आम्हाला संरक्षण द्या, ते दिल्यास आम्ही पोलिसात गुन्हे दाखल करू, आमची मानसिकता झाली आहे, असे त्या अन्यायग्रस्त महिला आमच्याशी बोलताना म्हणाल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या एका पदाधिकाऱ्याने दिली.