पंढरपूर : विठ्ठल मंदिरामध्ये भजन कीर्तनावर बंदी आणणाऱ्या कार्यकारी अधिकारी तथा प्रांताधिकारी गजानन गुरव यांना आता शासनाने चांगलाच झटका दिला आहे. गुरव यांच्याकडून मंदिरे समितीचा कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार आता काढून त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अतिरिक्त जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्याकडे पदभार देण्यात आला आहे. Pandharpur: Removal of Gajanan Gurav from the post of Executive Officer of Temple Committee
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या मंदिरामध्ये दिनांक १६ सप्टेंबर, १७ सप्टेंबर आणि १८ सप्टेंबर रोजी वर्धा येथील विनोद बुवा जाधव यांचा नामजप सप्ताह होता. त्या सप्ताह मध्ये १८ सप्टेंबर रोजी गजानन गुरव यांनी हा सप्ताह मधूनच थांबवत मंदिरामध्ये भजन कीर्तनात बंदी असल्याचे सांगितले. यानंतर विठ्ठल मंदिरामध्ये भजन कीर्तन करायचे नाही तर काय करायचे असा सवाल पुढे आला होता.
यावरून मोठा वादंग देखील निर्माण झाला. त्यानंतर गजानन गुरव यांनी भजन कीर्तनाच्या बंदीचा आपलाच आदेश अंगलट येत असल्याचे लक्षात आल्यावर राज्य गुप्तवार्ता विभागाचा अहवालच फोडला आणि चक्क काही तथाकथित पुढाऱ्यांना तसेच वारकरी सांप्रदायिक महाराज मंडळींना राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशानेच आपण भजन कीर्तनावर बंदी आणल्याचे सांगितले. विशेष म्हणजे राज्य गुप्तवार्ता विभागाचा अहवाल हा मंदिराच्या सुरक्षेसाठी असतो.
मात्र स्वतः च्या अंगलट आल्यानंतर हा सुरक्षेचा महत्त्वपूर्ण अहवाल कार्यकारी अधिकाऱ्यांनी फोडला. दैनिक सुराज्यने याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. यानंतर महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या सहसचिव असणाऱ्या डॉ. माधव वीर यांच्या आदेशाने गजानन गुरव यांना कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार काढून टाकण्यात आला तर सोलापूर जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी जाधव यांच्याकडे आता मंदिरे समितीचा कार्यभार असणार आहे.
कार्यकारी अधिकाऱ्यांनी गोपनीय अहवाल फोडला आणि आपले भजन कीर्तन बंदीचा प्रकरण अंगलट आल्याचा आवाज ‘सुराज्य’ने उठवला होता. या बातमीच्या परिणाम थेट मुंबईच्या मंत्रालयापर्यंत जाऊन गाजला आणि यानंतरच आता शासनाने गुरव यांच्याकडून मंदिरे समितीचा कार्यभार काढून घेतला आहे.
“हे हिंदुत्वाचे सरकार आहे इथे भक्तांचाच आवाज ऐकला जाईल आणि देव-धर्मावर अन्याय करणाऱ्यांवर कारवाईच होईल. पांडुरंगाच्या मंदिरातून मुजोर अधिकाऱ्याला हटविण्याची आमची मागणी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शतशः आभार”
– आचार्य तुषार भोसले
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ झाली होती निलंबनाची मागणी
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात भजन व किर्तन करण्यास कोणाच्या आदेशाने बंदी घालण्यात आली याचा खुलासा करावा तसेच वारकऱ्यांच्या भावना दुखवल्यामुळे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी माफी मागावी सोबतच मंदिर समिती बरखास्त करण्याची मागणी वारकरी पाईक संघाने निवेदनाव्दारे केली होती.
याबाबत वारकरी पाईक संघाचे अध्यक्ष विठ्ठल महाराज चवरे, प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण महाराज वीर यांनी प्रांताधिकारी यांना निवेदन दिले आहे. मागील चार दिवसापासून श्री विठ्ठल मंदिरात भजन, किर्तनास परवानगी नाकारल्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. वारकरी संप्रदायासह सर्वस्तरातून याचा निषेध व्यक्त होताच कार्यकारी अधिकारी गुरव यांनी आदेश मागे घेतला.
दरम्यान या प्रकरणी वारकरी पाईक संघाने गुरव यांची भेट घेवून आपली नाराजी व्यक्त केली. मंदिरात भजन व किर्तनास मनाई करण्याचा ठराव मंदिर समितीने केला होता का असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. असा ठराव समितीने केला असेल तर वारकरी विरोधात निर्णय घेणारी मंदिर समिती बरखास्त करावी यासाठी आंदोलन करणार असल्याचे वीर महाराज यांनी सांगितले.
तसेच प्रशासनाने मनमनाई पध्दतीने असे निर्णय घेवून वारकर्यांच्या भावना दुखावल्या आहेत. यामुळे त्यांनी लेखी दिलगिरी व्यक्त करावी, अशी मागणी केली होती. माफी न मागितल्यास कार्यकारी अधिकारी यांचे निलंबन करावे, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचा इशारा चवरे महाराज यांनी यावेळी दिला होता. दरम्यान मंदिर समितीकडून मंदिरात भजनास परवानगी देताना देखील भेदभाव केला जात असल्याचा आरोप देखील संघटनेने केला आहे.
भजन, कीर्तन मनाईचा आदेश मागे घेतला का याची तपासणी करण्यासाठी गुरूवारी वारकरी पाईक संघाच्या वतीने दुपारी चार ते सहा सभामंडप येथे भजन करण्यात आले होते. यास विविध महाराज मंडळी उपस्थित होते.