□ धडाकेबाज निर्णयाची जिल्ह्याला अपेक्षा
सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील यांचा जिल्ह्याचा पहिला दौरा निश्चित झाला आहे. पालकमंत्री झाल्यानंतर ते सोलापूरला पहिल्यांदाच येत आहेत. आल्या आल्या ते महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत श्री विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत. उद्या सोमवारी (ता.3 ) पंढरपूर येथे मुक्कामी राहाणार असल्याचे वृत्त आहे. Solapur. Guardian Minister Radhakrishna Vikhe – Patil to stay in Pandharpur tomorrow, Solapur planning meeting
दुस-यादिवशी मंगळवारी सकाळी 9 वाजता ते श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत. सकाळी साडे दहा वाजता त्यांचे सोलापूर येथे आगमन होणार आहे. छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, चार हुतात्मा स्मारक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतील, त्यानंतर सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेतील. पुढे नियोजन भवनात जनावरांच्या लम्पि आजाराबाबत आढावा बैठक नंतर मुख्यमंत्री सडक योजनेची आढावा बैठक घेणार आहेत. तसेच पंढरपूर विकास आराखडा सादरीकरण व बैठक होणार आहे.
शिंदे गट प्रणीत शिवसेना आणि भाजप युतीमधील पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर पहिल्यांदाच येत असून पालकमंत्रीपदाचे सिंहासन सांभाळताना, सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी धडाकेबाज विकासाभिमुख निर्णय घेणार की चलती का नाम गाडी याप्रमाणे लाल फितीमधील नोकरशहांकडून सुरू असलेला आहे तो कारभार पुढे रेटणारे धोरण राबवणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अहमदनगरचे आमदार आणि ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची धुरा देण्यात आली आहे. दरम्यान उद्या सोमवारी ते जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक बोलवली आहे. पालकमंत्र्यांविना जिल्ह्यातील विकास कामांचे जे निर्णय प्रलंबित राहिले आहेत, त्या निर्णयांना नव्या पालकमंत्र्यांकडून कितपत न्याय दिला जातो याकडे लक्ष लागून आहे.
राज्यामधील तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सोलापूर जिल्ह्यातील विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समितीला ५२७ कोटींचा निधी मंजूर करून दिला होता. तथापि, तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मंजूर करून दिलेल्या निधीवर कुरघोडी करून राजकारण करण्याचा प्रयत्न शिंदे – फडणवीस यांच्याकडून झाला. विद्यमान सरकारने ५२७ कोटींच्या निधीला ब्रेक लावला आहे. त्यातून विकास कामांना खो बसला आहे. हा अडलेला निधी विकास कामांसाठी मार्गस्थ होण्यासाठी नव्या पालकमंत्र्यांची सकारात्मक भूमिका असणे महत्त्वाचे मानले जात आहे.
● … तर नवे पालकमंत्री ठरू शकतात रोषाचे धनी
शिंदे – फडणवीस नेतृत्वाने राधाकृष्ण विखे – पाटील यांच्या रूपाने गेटकेन पार्सल पालकमंत्री दिला आहे. जिल्ह्याच्या भूमिपुत्राला या पदावर संधी न दिल्यामुळे जिल्ह्यात या निवडीवरून नाराजी आहे. अशातच नव्या पालकमंत्र्यांनी वेगळ्या राजकारणातून विकास कामांना आडकाठी आणली, विशेष करून ५२७ कोटींच्या अडलेल्या निधीचा मार्ग मोकळा न केल्यास पालकमंत्री विखे-पाटील आणखीन रोषाचे धनी ठरू शकतात.