सोलापूर / अजित उंब्रजकर
राज्यातील महाआघाडीची सत्ता पायउतार होऊन शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपचे सरकार आल्यानंतर राज्याच्या राजकारणात पक्षांतराचे मोठे पेव फुटले आहे. यामधून सोलापूर शहरही सुटू शकलेले नाही. सत्तांतरापूर्वी राष्ट्रवादीमध्ये जाण्यास इच्छुक असलेले अनेकजण आता सध्या वेट ॲन्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. Ananddada…Which flag to take Anand Chandanshive politics Solapur
अशीच परिस्थिती आता महापालिकेच्या राजकारणातील लक्षवेधी नेते आनंद (दादा) चंदनशिवे यांची झाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीत ते कोणत्या पक्षाचा झेंडा हातात घेणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागून राहिले आहे.
सोलापूर महापालिकेच्या राजकारणात आनंद चंदनशिवे एक महत्त्वाचे नेते मानले जातात. बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून २००७ मध्ये चंदनशिवे यांनी प्रथम महापालिकेत प्रवेश केला. पक्ष कोणताही असो, स्वतःच्या ताकदीवर महापालिकेत विजयी होणारे चंदनशिवे हे काही मोजक्या नेत्यामधील आहेत.
सत्ताधारी, विरोधकांशी हातमिळवणी करून प्रभागातील विकासकामे करण्याचा त्यांचा हातखंडा आहे. याचा लाभ प्रत्येक निवडणुकीत त्यांना झाला. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत त्यांच्या नगरसेवकांची संख्या दोनवरून चार झाली. लोकसभा निवडणुकीनंतर ते वंचित बहुजन आघाडीकडे वळले. त्यांनी वंचितकडून विधानसभा निवडणूक ही लढवली यामध्ये त्यांनी शहर उत्तर मधून २७ हजार पेक्षा जास्त मते मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मात्र त्यानंतर वंचित बरोबर त्यांचे काय बिनसले माहीत नाही, त्यांनी तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सहकाऱ्याने राष्ट्रवादीचा रस्ता धरला. त्यांच्या माध्यमातून चंदनशिवे यांनी आपल्या प्रभागात कोट्यवधींची विकास कामे आणली.
आनंद चंदनशिवे यांनी राष्ट्रवादी पक्षाकडे तब्बल आठ ते दहा जागांची मागणी केली होती. त्याला अनेक जणांचा विरोधही होता. मात्र या जागा आपल्याला हमखास मिळणार असे चंदनशिवे ठासून सांगत होते. मात्र जून महिन्यात राज्यातील महाआघाडीचे सत्ता गेली आणि शिंदे गट आणि भाजपचे सरकार आले. त्यामुळे चंदनशिवे यांचे नेते दत्ता भरणे यांचे पालकमंत्री पदही गेले. त्यामुळे चंदनशिवे यांचा राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा निर्णय सध्यातरी पेंडिंग पडला आहे.
मध्यंतरी चंदनशिवे यांना काँग्रेसचे नेते चेतन नरोटे यांनी पक्षात येण्याची ऑफर दिली होती. त्यांनी चंदनशिवे यांना १५ ते २० जागा देण्याचे कबूलही केले होते. मात्र चंदनशिवे यांनी त्यावर कोणतीही टिपणी केली नव्हती.
□ निर्णयाकडे समर्थकांचे लागले लक्ष
महापालिका निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. आता सध्यस्थितीत आनंद चंदनशिवे यांच्यासमोर राष्ट्रवादीमध्ये जायचे की, अन्य कोणत्या पक्षात जायचे की परत स्वगृही वंचितमध्ये परतायचे असे प्रश्न उभे आहेत. वंचित अथवा काँग्रेसमध्ये चंदनशिवे गेल्यास त्यांना शहर उत्तरमधून विधानसभेला उमेदवारी मिळवण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीमध्ये गेल्यास ती शक्यता फार कमी आहे. त्यामुळे चंदनशिवे काय निर्णय घेतात याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे.