मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना एक चॅलेंज दिले आहे. चीन अरुणाचल, लडाखमध्ये घुसलं आहे. जा ना ती जमीन घेऊन दाखवा. आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू, असे ते म्हणाले. कशाला पाहिजे हे गद्दार? हे माझे सैनिक आहेत, हे तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचतील जर तुम्ही पाकव्याप्त काश्मीर जिंकून दाखवलात तर, असेही त्यांनी म्हटले. Uddhav Thackeray gave challenge to Amit Shah in Dussehra Mela Mumbai Shivaji Park
दसरा मेळावानिमित्त शिवाजी पार्कवरून त्यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. उदधव ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली. गद्दारी, हिंदुत्व, महागाई अशा विविध मुद्द्यांवरुन त्यांनी चौफेर हल्लाबोल केला.
देशातील लोकशाही जिवंत राहते कि नाही हा प्रश्न सध्या निर्माण झाला असल्याचे म्हटले. कारण देशात दुसरे कोणते पक्ष शिल्लक राहणार नाहीत. शिवसेना संपत चालल्याचा दावा काहींनी केला. मात्र या निमित्ताने मी तुम्हाला सावधानतेचा इशारा देतोय. याचा अर्थ देश हुकुमशाहीकडे चालला आहे. देशात पुन्हा गुलामगिरी येऊ शकते. तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, जे जे देशप्रेमी असतील, त्यांनी एकत्र येऊन देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याची गरज आहे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
कोंबडीचोरावर, बाप चोरांवर या मेळाव्यावर जास्त बोलायचं नाही. या व्यासपीठाला एक अर्थ आहे, पावित्र्य आहे. ही सगळी लोकं आपल्यासाठी आले आहेत. शिव्या देणं खूप सोपं असतं, पण विचार देणं फार कठीण असतं. मी ती परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करतो. आता यांच्या (शिंदे-फडणवीस) सरकारला १०० दिवस होत आहेत. त्यातले ९० दिवस दिल्लीलाच गेले असतील. तिथे मुजरा करायला. दिल्लीत मुजरा आणि गल्लीत गोंधळ, अशीच यांची स्थिती झाली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ उपमुख्यमंत्री फडणवीसांना टोला
देवेंद्र फडणवीसांना कायदा चांगला कळतो. हा टोमणा नाही. त्यांना कायद्यातलं चांगलं कळतं. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. जाताना बोलून गेले होते की मी पुन्हा येईन. दीड दिवस आले. दीड दिवसात विसर्जन झालं. मनावर दगड ठेवून उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा आले. मी खरं बोलतोय. मी कुठे टोमणा मारतोय. आता ते म्हणतायत कायद्याच्या चौकटीत बोला, नाहीतर कायदा आपलं काम करेल.
देवेंद्रजी, तुम्ही गृहमंत्री आहात. पण आम्हाला सगळ्यांना कायदा कळतो. कायदा सगळ्यांनी पाळायला हवा. आम्ही कायदा पाळायचा आणि तुम्ही ही डुकरं पाळायची, हे नाही चालणार. काय कायद्याच्या चौकटीत बोलायचं? मिंधे गटाचे आमदार तिथे गेले. कुणी गोळीबार करतो, कुणी चुन चुन के मारेंगेची भाषा करतो. हा तुमचा कायदा असेल तर तो आम्ही जाळून टाकू. आमच्यापैकी कुणी बोललं, तर त्याला उचलून आत टाकता. तुम्ही कुठल्या पद्धतीने कायदा चालवताय? तुमचा कायदा तुमच्या मांडीवर कुरवाळत बसा.
□ मोहन भागवतांना राष्ट्रपती करा, तुम्ही ऐकलं नाही
सरसंघचालक मोहन भागवत मध्यंतरी मशिदीत जाऊन आले. काय त्यांनी हिंदुत्व सोडलं? का मिंधे गटानं नमाज पढायला सुरुवात केली? मोहन भागवत संवाद करायला गेले होते. तेव्हा मुसलमानांनीच सांगितले की, मोहन भागवत हे राष्ट्रपिता आहेत. आम्ही सांगितले मोहन भागवतांना राष्ट्रपती करा, तुम्ही ऐकलं नाही.
आता मुसलमानांनी सांगितले की ते राष्ट्रपिता आहेत. ते मुसलमानांसोबत बोलायला गेले तर त्यांचं राष्ट्रकार्य सुरू आहे, पण आम्ही काँग्रेससोबत गेलो तर हिंदुत्व सोडलं. कुठले धागेदोरे कशाशी जोडतात.
● तेजस ठाकरे यांची जादू
शिवसेनेच्या मेळाव्यावेळी व्यासपीठावर ठाकरेंना पाठिंबा असणारे सर्व जुने शिवसैनिक उपस्थित होते. त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील व्यासपीठावर होते. पण रश्मी ठाकरे आणि तेजस ठाकरे हे व्यासपीठाखाली पहिल्या रांगेत बसले होते. शिवसेनेनं दसरा मेळाव्याची प्रसिद्धी करताना प्रसिद्ध केलेल्या पोस्टरवर तेजस ठाकरेंचा देखील फोटो लावला होता. त्यामुळं खरंतर तेजस यांना लॉन्च केलं जाईल असंही बोललं जात होतं, पण तसं झालं नाही.
मात्र, तेजस ठाकरेंची जादू यावेळी पहायला मिळाली. मेळाव्याला आलेल्या तरुणांनी तेजस यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. या तरुणांच्या विनंतीलाही त्यांनी प्रसिसाद दिला आणि त्यांच्यासोबत फोटो काढले. त्यांच्या या कृतीमुळं सर्वसामान्य तरुणांमध्ये मिसळणारा ठाकरे घरातील व्यक्ती म्हणूनही त्याची प्रतिमा तयार होण्यास मदत होऊ शकेल.
● उद्धव ठाकरे म्हणाले…
• अजुनही डॉक्टरांनी मला वाकण्याची परवानगी दिलेली नाहीय. पण तुमच्यासमोर नतमस्तक झाल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही
• यावेळचा रावण वेगळा आहे, आतापर्यंत 10 तोंडांचा रावण होता, आता 50 खोक्यांचा बोकासूर आहे.
• गद्दारीचा शिक्का पुसण्याचा प्रयत्न केला तरी पुसला जाणार नाही
• तुम्हाला गद्दारच म्हणणार, मंत्रीपदे काही काळापुरती आहेत.
● उद्धव ठाकरेंनी बॉम्ब फोडला
• अमित शाह म्हणाले असं काही ठरलं नव्हत. मी माझ्या आई वडीलांची शपथ घेऊन सांगतो. मुख्यमंत्रीपद अडीच वर्ष ठरले होते. शिवरायांच्या साक्षीने सांगतो.. मग आता जे केलं हे तेव्हा का केलं नाही? शिवसेना संपवायचे त्यांचे प्रयत्न होते.
• भाजपाने पाठीत वार केला, म्हणून त्यांना धडा शिकविण्यासाठी मी महाविकास आघाडी केली होती..
• शिवसेना एकनिष्ठ शिवसैनिकांची, एका जरी शिवसैनिकाने सांगितलं तरी शिवसेना सोडून जाईन.