अक्कलकोट – अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे दुपारी पावणे चारच्या सुमारास वीज पडून पाच जण जखमी झाल्याची घटना शेतामध्ये घडली आहे. त्यांना अक्कलकोटच्या स्वामी समर्थ हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. Akkalkot. Five injured by lightning; three seriously wounded
यात तिघेजण गंभीर जखमी झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. शिवाजी पंढरी शिंदे (वय ७५), सुमित गुरप्पा कलशेट्टी (वय- १३), गुरप्पा सुभाष कलशेट्टी (वय – ४०), संभाजी शिवाजी मोरे (वय – ३४), अंबिका गुरप्पा कलशेट्टी (वय – १३ ) अशी जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अचानक पावसाला सुरुवात झाली. जखमी बादोला रोडकडे असलेल्या शेतामध्ये काम करत होते. यानंतर पावसाला सुरुवात होताच एका कढईच्या खाली ते पाच जण दबून बसले होते.
यावेळी अचानक साडेतीन वाजण्याच्या सुमारास वीज कडाडली आणि ती वीज अंगावर पडून पाच जण जखमी झाले. याची माहिती आजूबाजूच्या शेतकऱ्यांना कळताच तातडीने त्यांनी नातेवाईकांना बोलावून अक्कलकोटला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ही घटना समजताच तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी ग्रामसेवक तसेच तलाठी चोरमुले यांना घटनेचा पंचनामा करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान या घटनेची माहिती समजताच माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे, सरपंच व्यंकट मोरे, चुंगी सरपंच राजू चव्हाण, तंटामुक्त अध्यक्ष केशव मोरे यांच्यासह अनेकांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली आणि डॉक्टरांशी चर्चा केली. या घटनेबाबत प्रशासनाकडूनही योग्य ती कार्यवाही तातडीने सुरू करण्यात आली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ दोरीने गळा आवळून खुनाचा प्रयत्न; चौघांना ३ वर्षे सक्त मजुरीची शिक्षा
सोलापूर – विकत घेतलेली जमीन परत करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून राजकुमार सारणे (रा.जुळे सोलापूर) यांचा दिवसा दोरीने गळा आवळून खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून गोविंद तोलाराम राठोड (वय३३ रा.मुळेगाव तांडा) श्याम उर्फ शामराव शंकर चव्हाण (वय ४८) त्याची दोन मुले सचिन आणि सागर शामराव चव्हाण (सर्व रा.आचेगाव ता. दक्षिण सोलापूर) यांना ३ वर्षे सक्त मजुरी आणि प्रत्येकी १ हजार रुपये दंड अशी शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही.एच. पाटवदकर यांनी सुनावली.
६ ऑक्टोबर २०१५ रोजी सकाळच्या सुमारास राजकुमार लक्ष्मण सारणे (वय ३७ रा.सुभाषनगर, जुळे सोलापूर) हे त्यांच्या घरात होते. त्यावेळी या चौघे आरोपीनी त्यांना खरेदी केलेली जमीन आम्हाला परत विकत दे असे म्हणत त्यांना मारहाण केली. त्यांनी नकार देताच गोविंद राठोड याने तुला आत्ताच खलास करून सर्व प्रकरण संपवून टाकतो. असे म्हणत सोबत आणलेली काथ्याची दोरी सारणे यांच्या गळ्यात घातली. तर अन्य तिघांनी त्यांचे हात पाय धरून दोरी आवळली.
त्यावेळी संजय हत्तुरे ( जखमीचे भाचे) यांनी आणि (कामगार) रवी कणमस यांनी सारणे यांना फासातून सोडवून त्यांना त्वरित दुचाकीवरून शासकीय रुग्णालयात बेशुद्ध अवस्थेत दाखल केले. त्यानंतर या घटनेची फिर्याद संजय बाबुराव हत्तुरे (रा.जुळे सोलापूर) यांनी विजापूर नाका पोलिसात दाखल केली. त्याप्रमाणे पोलिसांनी दोन महिलासह ६ जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
या प्रकरणाचा तपास तत्कालीन फौजदार आर.डी. उशिरे यांनी करून आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या खटल्यात सरकारतर्फे ८ साक्षीदार तपासण्यात आले. मूळ फिर्यादी आणि जखमी यांची साक्ष तसेच सरकार पक्षाने मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने चौघांना ३ वर्ष जन्मठेपेशी शिक्षा सुनावली. या खटल्यातत सरकारतर्फे अॅड. प्रदीपसिंग राजपूत, मूळ फिर्यादीतर्फे अॅड. म्हात्रे तर आरोपीच्या वतीने अॅड. प्रशांत देशमुख आणि अॅड. गणेश पवार यांनी काम पाहिले .