● प्रत्येक खासदाराचे प्रगती पुस्तक राहिले कोरेच
सोलापूर / दीपक शेळके : आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपने चालू केली आहे. यासाठी मोर्चे बांधणी सुरू असल्याचे पहायला मिळते. त्यादृष्टीने भाजपाने संघटना बांधणीची जबाबदारी मंत्र्यांवर देत मिशन लोकसभा चालू केले आहे. भाजप लोकसभेला भाकरी फिरवणार असल्याची चर्चा असून नव्या उमेदवारांचा शोध चालू असल्याची खात्रीलायक माहिती आहे. Solapur. Will BJP turn bread in the Lok Sabha? MP Jaisiddheshwar Mahaswamy is searching for new candidates
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा विचार करता प्रत्येक वेळी भाजपा नवा उमेदवार देत नवा प्रयोग केला मात्र प्रत्येक खासदाराचे प्रगती पुस्तक कोरेच राहिल्याने प्रत्येक वेळी भाजपाने भाकरी फिरवत लोकसभा मतदारसंघ ताब्यात ठेवला आहे. यंदा देखील भाजपा लोकसभेसाठी नव्या उमेदवाराच्या शोधात आहे. त्यामुळे यंदाही भाजपा लोकसभेसाठी भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहे.
२००९ मध्ये लोकसभेसाठी सिनेअभिनेता ॲड. शरद बनसोडे यांना भाजपने उमेदवारी दिली. मात्र, सुशीलकुमार शिंदे यांच्यापुढे बनसोडे यांचा निभाव लागला नाही. काँग्रेसने बाजी मारत मतदारसंघ ताब्यात ठेवला मात्र २०१४ मध्ये भाजपने पुन्हा ॲड. बनसोडे यांना पुन्हा संधी देत उमेदवारी दिली. भाजपा शिवसेनेची त्यावेळेला युती होती. त्यातून स्थानिक पातळीवर नेते मंडळींमध्ये मतभेद होते. त्यामुळे कैसे जितेगा भाई कैसे जितेगा.. . . अशी टीका बनसोडे यांच्यावर केली गेली.
मात्र देशात असलेल्या मोदी लाटेचा देशातील अनेक मतदार संघातील फायदा उमेदवारांना जसा झाला, तसा फायदा ॲड. बनसोडे यांना झाला. मोदी लाटेत ते संसदेवर स्वार झाले. विजयश्री प्राप्त केली मात्र पाच वर्षांच्या कारकिर्दीत मोदींच्या समोर ॲड. बनसोडे यांचे प्रगती पुस्तक कोरे राहिले. पाच वर्षात ठोस काम दिसले नाही.
त्यामुळे त्यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवत २०१९ मध्ये मात्र भाजपने उमेदवाराची भाकरी फिरवत अॅड. बनसोडे यांचा पत्ता कट केला आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने आ. विजयकुमार देशमुख यांनी डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे नाव पुढे आणत त्यांना संधी दिली. काँग्रेसने पुन्हा सुशीलकुमार शिंदे यांना मैदानात उतरवले मात्र या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूर लोकसभा निवडणूक लढवली. परिणामी आंबेडकर यांच्या उमेदवारीने काँग्रेसची मते विभागली गेली आणि याचा फटका काँग्रेसचे उमेदवार शिंदे यांना बसला. तिरंगी लढतीत डॉ. महास्वामी यांनी बाजी मारली. मात्र भाजपाला हे यश पचवता आले नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

खासदार महास्वामी यांचा जातीचा दाखल बनावट असल्याने भाजपाची मोठी बदनामी झाली. सध्या शहरात विमान सेवेचा प्रश्न गंभीर झाला. आंदोलन व आरोप प्रत्यारोप केले जात आहे. वास्तविक पाहता विमान सेवेची जबबादारी खासदारांची आहे. मात्र विमान सेवेबाबत कोणतेही भाष्य केले नाही. केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून संसदेमध्ये सोलापूरच्या विमानसेवेचा प्रश्न उपस्थित करून विमानसेवेसाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना नको ती विधाने केली गेली. त्यामुळे भाजपाला महास्वामी डोईजड झाले असल्याची चर्चा आहे. परिणामी महास्वामींचे देखील प्रगती पुस्तक मोदी यांच्या समोर कोरेच राहिले आहे. त्यामुळे यंदा भाजप लोकसभेची भाकरी फिरवत नव्या उमेदवारांच्या शोधात आहे.
● माझी नाळ काँग्रेसशी…
भाजपकडून लोकसभेला आमदार प्रणिती शिंदे उमेदवार राहणार असल्याची चर्चा आहे. मात्र दिशाभूल करण्यासाठी मुद्दामहून अशा वावड्या उठविल्याचे स्पष्ट करीत आपली नाळ काँग्रेसशी जुळलेली असल्याने आपण काँग्रेसशी एकनिष्ठ आहोत तसेच कोणत्याही परिस्थितीत आपण काँग्रेस सोडणार नसल्याचे सांगतल्याने चर्चेला पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे आ. शिंदे यांचा विषय संपल्याने भाजप नव्या उमेदवारांच्या शोधात आहे.
● भाजपाला विजय सोप्पा नाही
सलग दोन वर्ष भाजपाच्या विजयामुळे सोलापूर लोकसभा हा भाजपाचा बालेकिल्ला वाटत असला तरी भाजपाला यंदा विजय सोपा नाही. त्याची कारणे तशीच आहेत. लोकसभा मतदारसंघातील शहर उत्तर विधानसभा, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर मतदार संघात मोठ्या प्रमाणात लिंगायत समाज आहे.
सध्या श्री सिध्देश्वर साखर कारखान्याच्या चिमणीचा विषय गाजत आहे. सध्या राज्यामध्ये भाजपाची सत्ता आहे. चिमणीचा विषय निकाली काढून विमान सेवा चालू करण्याचे मोठे आव्हान भाजपासमोर आहे. अन्यथा लोकसभा निवडणुकीत हा लिंगायत समाज धडा शिकवण्याची शक्यता आहे. त्याचे पडसाद विधानसभा निवडणुकतही उमटण्याची शक्यता आहे.
● काँग्रेसकडून पुन्हा शिंदे ?
गेल्या काही दिवसांपासून राजकारणापासून दूर असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत आमदार कन्या प्रणिती शिंदे यांच्यासह उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. राज्यातील असंख्य कार्यकर्त्यांना सोबत घेत सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या
वयाचा विचार न करता यात्रेत सहभागी होऊन १०-१५ किलोमीटरचे अंतर पायी चालत शारीरिक क्षमतेबरोबरच राजकीय प्रबळता सिध्द करून दाखविली आहे. त्यामुळे काँग्रेसकडून पुन्हा सुशीलकुमार शिंदेच उमेदवार असल्याची चर्चा आहे.