● महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाने काढला आदेश !
सोलापूर : सोलापूर महापालिकेच्या आस्थापनेवरील नगर अभियंता संदिप कारंजे यांची सोलापूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर निवडीने नियुक्ती करण्यात असल्याचा शासन आदेश आज काढण्यात आला आहे. निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. Appointment of Sandeep Karanje as Additional Commissioner; Junior Engineer to Additional Commissioner Travel Solapur Municipality
महाराष्ट्र शासन नगरविकास विभागाचे उप सचिव अनिरुध्द जेवळीकर यांच्या स्वाक्षरीने हा शासन आदेश बुधवारी ( दि.१४ डिसेंबर) काढण्यात आला आहे. महानगरपालिकांमध्ये अतिरिक्त आयुक्त या पदावर निवडीने नियुक्तीसाठी कार्यपद्धती विहीत करण्यात आली. सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर शासन निर्णय दि. २८ डिसेंबर २०२१ नुसार आकृतीबंधात अतिरिक्त आयुक्तांची २ पदे मंजूर असून त्यापैकी १ पद महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यामधुन निवडीने भरण्याची तरतुद दि.६ जानेवारी २०१५ रोजीच्या शासन निर्णयामध्ये नमूद आहे. त्यानुसार ही निवड करण्यात आली आहे.
या संदर्भात प्रशासक तथा आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांच्याकडून दि.२३ सप्टेंबर २०२२ रोजीच्या प्राप्त झालेल्या प्रस्तावास अनुसरुन तसेच अतिरिक्त आयुक्त पदावर निवडीने नियुक्तीसाठी गठीत केलेल्या शासन स्तरावरील निवड समितीची शिफारस विचारात घेण्यात आली. निवड समितीची ही बैठक दि.१ डिसेंबर २०२२ रोजी झाली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम ३९ अ तसेच कलम ४५ अन्वये शासनास असलेल्या अधिकारास अनुसरून सोलापूर महानगरपालिकेच्या नगर अभियंता या पदी कार्यरत असलेले संदिप कारंजे यांची सोलापूर महापालिकेच्या “अतिरिक्त आयुक्त” या पदावर निवडीने पदस्थापना करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. नगर अभियंता संदिप भिमाशंकर कारंजे हे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम ४५ अंतर्गत सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर कार्यरत असलेले एकमेव अधिकारी असल्याने अतिरिक्त आयुक्त पदाच्या निवडीसाठी त्यांचा विचार करण्यात आला आहे.
सोलापूर महापालिका आयुक्त यांनी संदिप कारंजे यांना अतिरिक्त आयुक्त या पदावर तात्काळ रुजु करून घ्यावे. संदिप कारंजे यांनी अतिरिक्त आयुक्त सोलापूर महानगरपालिका या पदाचा कार्यभार तात्काळ स्वीकारावा. तसेच महापालिका आयुक्त यांनी याबाबतचा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा, असे शासन आदेशात म्हटले आहे.
● कनिष्ठ अभियंता ते अतिरिक्त आयुक्त
सध्या नगर अभियंता असलेले संदीप कारंजे हे सोलापूर महापालिकेत सन 1995 मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून सेवेत रुजू झाले. सन 2005 मध्ये ते सहाय्यक अभियंता झाले. तर सन 2018 मध्ये त्यांच्यावर पदोन्नतीने नगर अभियंता महत्त्वाच्या पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. सोलापूर महापालिकेत कनिष्ठ अभियंता ते अतिरिक्त आयुक्त वाटचाल उल्लेखनीय आहे. चांगल्या सेवेबद्दल त्यांना यापूर्वी उत्कृष्ट अभियंता पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. लोकाभिमुख, अभ्यासू आणि अनुभवी अधिकारी म्हणून ते सर्वपरिचित आहेत.