सोलापूर : शहराच्या सुमारे १३ लाख लोकांची जीवनदायिनी समजल्या जाणाऱ्या उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिन्याचे काम थांबवण्यात आले आहे. याबाबत आ. सुभाष देशमुख आणि आ. प्रणिती शिंदे यांनी चालू हिवाळी अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे सांगितले. MLA Deshmukh-Shinde will raise his voice regarding the work of Solapur double water channel
२०१७ मध्ये ६५० कोटींच्या उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिनीला मंजुरी देण्यात आली. अनेक अडचणीचा मार्ग काढत दुहेरी जलवाहिनीचे काम सुरू झाले. सुरूवातीला मक्ता दिलेल्या पोचमपाड कंपनीने हे काम अर्धवट अवस्थेत सोडले. त्यानंतर महाविकास आघाडीने नव्याने दुहेरी जलवाहिनीचे टेंडर काढत या कामाचा मक्ता कोल्हापूरच्या लक्ष्मी कंपनीला दिला. त्यानंतर कंपनीला वर्क ऑर्डर ही देण्यात आली. त्यामुळे हे काम सुरू होईल, असे वाटत असतानाच स्मार्टसिटीचे तत्कालिन सीईओ ढेंगळे-पाटील यांच्या आदेशानुसार २४ नोव्हेंबर रोजीच काम थांबवण्यात आले.
त्यामुळे या जलवाहिनींच्या कामाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान याबाबत आता आ. सुभाष देशमुख आणि आ. प्रणिती शिंदे यांनी ही योजना शहराच्या दृष्टीने महत्वाची असून याबाबत आपण चालू नागपूर अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे सांगितले.
■ दुहेरी जलवाहिनीचे काम होणे गरजेचे, आवाज उठवू : आ. देशमुख
सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याकरिता आवश्यक असलेल्या उजनी ते सोलापूर (दुहेरी) समांतर जलवाहिनीचे काम थांबविले आहे. हे काम कोणत्या कारणास्तव थांबवण्यात आले, याबाबत आपण चालू अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले.
दुहेरी जलवाहिनीचा प्रकल्प सोलापूर शहरवासियांकरिता अत्यंत महत्वाचा आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सोलापूरकरांना दोन, तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. मुळात ही योजना भाजपच्या काळात मंजूर झाली आहे. ही योजना पूर्ण झाल्यास सोलापूरकरांना दररोज पाणी पुरवठा होणार आहे. त्यामुळे हे काम तातडीने होणे गरजेचे आहे. याबाबत आपण नागापूर अधिवेशनात निश्चित आवाज उठवणार असल्याचे आ. देशमुख यांनी सांगितले.
■ अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार : आ. शिंदे
समांतर जलवाहिनीचा प्रकल्प सोलापूर शहरवासियांकरिता अत्यंत महत्वाचा असून तो तातडीने पूर्ण केला पाहिजे. हे काम सुरू करावे, याबाबत आपण अधिवेशनात बोलणार आहोत, असे आ. प्रणिती शिंदे म्हणाल्या. या जलवाहिनीचे काम थांबविण्याकरीता कोणत्याही न्यायालयाने स्थगिती अथवा सूचना दिलेल्या नसल्याबाबतची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हे काम थांबविण्याची गरज नसताना देखील वेळकाढूपणा चालू आहे. काम थांबविणे म्हणजे शहराच्या विकासाकामांमध्ये अडथळा आणला जात आहे. आता अधिवेशन सुरू झाले आहे, आपण याप्रश्नी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार आहोत, असे आ. शिंदे म्हणाल्या.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》सुराज्य डिजिटलने उचलला विषय
दुहेरी जलवाहिनीचे काम थांबवल्यानंतरही लोकप्रतिनिधी व नेते गप्प का ?
□ शहरवासीयांमधून संतप्त सवाल !
सोलापूर : सोलापूर शहराच्या सुमारे 13 लाख लोकांची जीवनदायिनी समजल्या जाणार्या उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिन्याचे काम थांबवण्यात आले आहे. तरीही सोलापूर शहरातील खासदार, आमदार, माजी नगरसेवक व नेते या विषयावर गप्प का आहेत, असा संतप्त सवाल शहरवासीयांमधून उपस्थित होत आहे. त्यामुळे सोलापूरला कोणी वाली आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
सोलापूरला 20-22 वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सुरूवात झाली. त्यात वाढ होत गेली आता शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. गेल्या अनेक निवडणुकांमध्ये सत्ताधारी व विरोधी पक्षांनी आपापल्या जाहीरनाम्यात दररोज पाणीपुरवठा करण्याचे आश्वासन देत निवडणुका लढवल्या. मात्र प्रत्येक वेळी सोलापूरकरांची घोर निराशा झाली. त्यासाठी म्हणावा तेवढा प्रयत्न त्या त्या काळातील सत्ताधार्यांकडून झाला नाही.
2017 मध्ये महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर 650 कोटींच्या उजनी- सोलापूर दुहेरी जलवाहिनीला मंजुरी देण्यात आली. अनेक अडचणीचा मार्ग काढत दुहेरी जलवाहिनीचा मक्ता पोचमपाड कंपनीला देण्यात आला. या ना त्या कारणाने या कंपनीने काम पूर्ण करण्यास विलंब केला. त्यातच कोरोना महामारी लॉकडाऊनचे निमित्तही झाले. महापालिका प्रशासनान पोचमपाड कंपनीला विलंब झाला म्हणून दंड आकारला , टर्मिनेटही केले. त्यानंतर मक्ताही रद्द करण्यात आला.
त्यानंतर महाविकास आघाडीने नव्याने दुहेरी जलवाहिनीचे टेंडर काढत या कामाचा मक्ता कोल्हापूरच्या लक्ष्मी कंपनीला देण्यात आला. ही टेंडर प्रक्रियाही प्रलंबित राहून उलट सुलट चर्चेला वाव मिळाला. त्यानंतर अखेर लक्ष्मी या कंपनीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर कंपनीला वर्कऑर्डर ही देण्यात आली. दरम्यानच्या काळात सोलापूर स्मार्ट सिटी कार्पोरेशनचे तत्कालिन सीईओ ढेंगळे-पाटील यांनी वर्क ऑर्डर दिल्यानंतर काही दिवसातच हे काम सुरू झाल्याचे स्पष्ट केले होते.
या दुहेरी जलवाहिनीच्या पाईपलाईनची साईड बदलून ती दुसर्या बाजूने करण्याचा निर्णय झाला आणि त्याचं सर्वेक्षणही सुरू झाल्याची माहिती ढेंगळे-पाटील यांनी दिली होती. मात्र काही दिवसातच नाट्यमय घडामोडीनंतर ढेंगळे पाटील यांना कार्यमुक्त करण्यात आले. अशातच नुकतीच स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन ची बैठक पार पडली. त्यानंतर महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी दुसर्या दिवशीच पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात उजनी जलवाहिनीचे तत्कालिन सीईओ ढेंगळे-पाटील यांच्या आदेशानुसार 24 नोव्हेंबर रोजीच काम थांबवण्यात आल्याचे स्पष्ट केले.
दुहेरी जलवाहिनीचे काम थांबवल्याची बातमी सर्वत्र वार्यासारखी पसरली असे असतानाही सोलापूर शहरातील खासदार, आमदार, माजी नगरसेवक व तसेच विविध कारणांनी आंदोलन करणारे नेते हे गप्प का आहेत, असा सवाल सोलापूरकरांमधून उपस्थित होत आहे.
अनेक अडथळ्यांची शर्यत पार करून या जलवाहिनीचे काम आता कुठे मार्गी लागेल असं वाटत असतानाच हे काम का थांबवण्यात आले, यासंदर्भात अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित होत आहेत. सोलापूरचे कारभारी मानल्या जाणार्या लोकप्रतिनिधींनी या संदर्भात आवाज उठवावा आणि हे दुहेरी जलवाहिनीच काम मार्गी लावावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
□ लोकप्रतिनिधी अधिवेशन आवाज उठवणार का ?
सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. सोलापुरातील आ. विजयकुमार देशमुख, आ. सुभाष देशमुख आणि आ. प्रणिती शिंदे हे तिघे अधिवेशनात सोलापूरच्या जिव्हाळ्याचा प्रश्न उपस्थित करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.