सोलापूर : ‘उजनी’ बॅकवॉटरच्या कुशीत दडलेल्या करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचा भोंगा तीन वर्षांनी रविवारी (ता. 25) वाजला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गव्हाणीत उसाची मोळी टाकून यंदाच्या गाळपाचा शुभारंभ करण्यात आला. Adinath sugar factory’s ‘Ukhlibare’ carmel was blown on the noses of Baramatikars
महाविकास आघाडीच्या सत्तेच्या काळात जबरदस्त पॉवर वापरून या कारखान्याचे खाजगीकरण करण्याचा डाव बारामतीकरांनी आखला होता. परंतु माजी आमदार नारायण आबा पाटील यांनी तो हाणून पाडला. बारामतीकरांच्या शेपटीवर पाय ठेवण्याची हिम्मत सहसा कुणी करत नाही पण आबांनी हे डेरिंग करून दाखवले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे वडे प्रस्थ असणारे तथा पवार फॅमिलीतील लाडके असलेले आ. रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोच्या घशात हा कारखाना टाकण्याचा प्लॅन होता परंतु आबांनी रक्ताचे पाणी करून श्री आदिनाथला बारामतीकरांच्या पंजाखालून बाहेर काढले. बारामतीकरांच्या नाकावर टिच्चून आबांनी या कारखान्याचा ‘उखळीबार’ अखेर उडवून दाखवला. आबांनी राजकीय ताकत दाखवून दिल्याने करमाळा तालुक्यातील पुढील राजकीय समीकरणांविषयी सहकार क्षेत्रात उत्सुकता निर्माण झाली आहे.
उजनी धरणातील बॅकवॉटरचे वरदान या तालुक्याला लाभले आहे. करमाळा तालुक्याने आज फळफळावळ उत्पादनात आघाडी घेतली असली तरी बऱ्याच वर्षांपासून या भूमीत ऊस पिकवला जातो. आपल्या शेतकरी बांधवाना आपल्या हक्काचा कारखाना असावा म्हणून आदिनाथ कारखाना उभा केला.
पुढे या कारखान्याला राजकीय शहकाटशहाचे ग्रहण लागले आणि तो काळोखात गेला. २०१९ मध्ये शिखर बँकेच्या कर्जापोटी तो बंद पडला. त्यानंतर बारामतीकरांची त्यावर ‘नजर’ पडली. ३० ते ३५ कोटींची उभारणी कशी करायची? ही चिंता सतावत होती. सभासदांकडून इतकी रक्कम उभारणे शक्यच नव्हते आदिनाथचा हा कमकुवतपणा लक्षात येवून बारामतीकरांनी हा कारखाना बारामती ॲग्रोच्या ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू ठेवल्या. त्यातच २०१९ नंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर बारामतीकरांना आयतीच ‘पॉवर’ मिळाली. त्यातूनच त्यांनी आदिनाथवर जाळे टाकले.
हा कारखाना बारामती ॲग्रोला देण्याचा ठराव केला गेला. नारायणआबांनी थेट विरोध केला गेला आणि कारखाना भाडेतत्वावर देण्याची प्रक्रिया हाणून पाडण्यासाठी त्यांनी कंबर कसली. आदिनाथ ताब्यात घेण्यासाठी सुरवातीला वेळ काढूपणा केलेल्या बारामती अँग्रोने कारखाना ताब्यात घेण्यासाठी जोर लावायला सुरुवात केली आणि सत्तापरिवर्तन झाले. शिंदे – फडणवीस सरकार आले. हे सत्तांतर आबांच्या पथ्यावर पडले. तेव्हा ऍक्शन मोडमध्ये येत त्यांनी राजकीय ताकद दाखवत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, मंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्या माध्यमातून बारामती ऍग्रोला कारखाना भाडेतत्त्वावर देण्यापासून रोखण्यात त्यांनी यश मिळवले.
कारखाना ताब्यात येण्याच्या दिवशीच आबांनी थेट एक कोटी बँकेच्या खात्यात भरले आणि कारखाना ताब्यात घेण्यासाठी आलेले बँकेचे कर्मचारी व बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांना कारखाना ताब्यात घेण्यापासून रोखले. विशेष म्हणजे आबांनी स्वतः कारखान्यावर जाऊन ही प्रक्रिया थांबवली. आठ दिवस मुंबईत ठाण मांडून आवश्यक निर्णय करून घेतले. न्यायालयाच्या माध्यमातून बागल गटाच्या नेत्या रश्मी (दीदी) बागल यांनी तर शासकीय पातळीवर आबांनी आदिनाथची बाजू लावून धरली.
■ बारामतीकरांचा ‘टाईमबॉम्ब’…
राजकीय व सहकार क्षेत्रात बारामतीकर शांत डोक्याने रणनीती आखत असतात. त्यालाच बारामतीकरांचा टाईमबॉम्ब असे म्हटले जाते. अलिकडच्या काही वर्षात करमाळ्याचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या भोवतीच फिरत आहे.
आदिनाथचा घास काढून घेतल्याने बारामतीकर स्वस्थ बसतील, असे कुणीच समजू नये. ते वचपा जरूर काढतील. आबांच्या पाठीआड प्रा. सावंत हे आदिनाथवर तसेच करमाळ्यावर वर्चस्व गाजवू पाहातील. तेव्हा आगामी काळात शिंदे गट आणि राष्ट्रवादी असा संघर्ष दिसेल आणि बारामतीकरांच्या वेळ साधून टाकल्या जाणाऱ्या ‘टाईमबॉम्ब’ मध्ये कोणता दारूगोळा असेल हेही पहायला मिळेल.
□ सावंतांची भक्कम साथ
दोन वर्षांत बारामती अँग्रोने कारखाना का सुरू केला नाही? याचे समाधानकारक उत्तर बारामती अॅग्रोने कधीही दिले नाही. बारामती अॅग्रो हा कारखाना ताब्यात घेण्यासाठी सर्व पातळ्यांवरून सर्व प्रकारची ताकद वापरत होता तर दुसऱ्या बाजूला तेवढ्याच ताकदीने पाटील यांच्या पाठीशी प्रा. तानाजी सावंत हे भक्कमपणे उभे राहिले.
हा कारखाना चार महिन्यांत सुरू करण्याचा शब्द सावंत यांनी दिला होता. नव्या सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यानंतर महिनाभरात आठ कोटी ७५ लाख रुपये राज्य सहकारी बँकेकडे भरले. त्यामुळे कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. अडीच वर्षाच्या कार्यकाळानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जात पुन्हा एकदा सावंत यांना मोठी जबाबदारी मिळाली. सावंत पुन्हा एकदा सक्रिय झाले.
पहिल्याच महिन्यात आदिनाथसाठी आपला शब्द दिलेला पूर्ण करत जयवंत शुगरच्या माध्यमातून ओटीएस प्रमाणे तीन कोटी चार लाख रक्कम तर बँकेत भरली. शिवाय काही दिवसांनी पाच कोटी ७१ लाख असे एकूण आठ कोटी ७५ लाख १७ हजार सावंत यांनी बँकेत भरल्याने आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा सहकारी तत्त्वावर सुरू करण्यास अडचणी दूर झाल्या.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 कारकान्यावर टपलेल्यांच्या तावडीतून कारखाना वाचविला, आता टेन्शन घेवू नका – मुख्यमंत्री शिंदे
□ आदिनाथ कारखान्याच्या 27 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ
□ रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसह
करमाळा तालुक्यातील सर्व प्रश्न मार्गी लावण्याचे मुख्यमंत्र्यांचे अश्वासन
सोलापूर – आदिनाथ सहकारी साखर कारखाना भाड्याने किंवा विकत घेण्यासाठी अनेक दिग्गज टपलेले होते. या टपलेल्यांच्या तावडीतून कारखाना वाचविला असून आता टेन्शन घेवू नका, असा टोला आमदार रोहित पवार यांचा नामोल्लेख न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापुरात लगावला.
करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या 27 व्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. सोलापूर जिल्हा साखरपट्टा असून या भागाच्या विकासासाठी रिटेवाडी पाणी उपसा सिंचन योजनेबाबत तात्काळ बैठक घेऊन ही योजना मार्गी लावण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
आदिनाथ कारखाना भाड्याने किंवा विकत घेण्यासाठी अनेक दिग्गज टपलेले होते. त्या दिग्गजांच्या तावडीतून हा कारखाना वाचवण्यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत, माजी आमदार नारायण पाटील, रश्मी बागल यांनी विशेष प्रयत्न केले. तानाजीराव सावंत यांनी या कारखान्यासाठी विशेष मदत केली आहे. हा कारखाना सुरळीतपणे चालणार आहे यावर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवावा. हा कारखाना सुरळीत चालवण्यासाठी सर्वतोपरी प्रकारची मदत केली जाईल. याचबरोबर करमाळा तालुक्यातील रखडलेले सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आपण तत्पर आहोत. ज्या पद्धतीने कारखान्यासाठी एकत्र आलेला आहात त्याच पद्धतीने निवडणुकीत एकत्रया, अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे – पाटील, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, माजी मंत्री प्रा. राम शिंदे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार राजेंद्र राऊत, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, भैरवनाथ शुगरचे शिवाजी सावंत, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे, शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, कार्यकारी संचालक अरुण बागनवर, हरिदास डांगे ,भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर, सभापती पृथ्वीराज पाटील उपाध्यक्ष रमेश कांबळे शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे आदीसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, लहान क्षमतेचे कारखाने जाणीवपूर्वक चालू द्यायचे नाहीत व मग ते कारखाने आर्थिक डबघाईला आले की भाडेपट्टा तत्वावर अथवा कमी पैशात विकत घ्यायचे असा प्रकार अनेक वर्षांपासून विरोधी मंडळी करत आहेत. यामुळे सहकार धोक्यात येऊ लागला होता व ठराविक मंडळीच आर्थिकदृष्ट्या मोठी होत चालली होती. आम्ही सहकार जपणारे आहोत. यामुळे आता शेतकऱ्याला न्याय देणारे मुख्यमंत्री असल्याने यापुढे असले कारखाना खरेदी विक्री करण्याचे प्रकार थांबतील, असा टोला त्यांनी पवारांचे नाव न घेता लगावला.
यावेळी बोलताना आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले, आदिनाथसाठी लागणारी सर्व मदत केली जाईल. तिजोरीच्या चाव्या शिवाजी सावंत यांच्याकडे आहेत आणि ते तुमच्या बरोबर आहेत. त्यामुळे तुम्ही कसली ही काळजी करू नका. मुख्यमंत्र्यांनी अल्पावधीतच घेतलेल्या लोकहिताच्या निर्णयाची यादी कथन करुन आरोग्य विषयी व खास करून महिलांच्या सन्मान व आरोग्याविषयी सुरु केलेल्या नवीन योजनाविषयी माहिती दिली.
यावेळी बोलताना माजी आमदार नारायण पाटील यांनी कारखान्याचा उभारणीचा इतिहास सर्वासमोर मांडत कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांनी कारखाना उभारणीसाठी केलेला त्याग आपल्या भाषणातून सांगितला. तसेच आदिनाथ कारखान्याची स्थिती भक्कम व्हावी म्हणून खेळते भांडवल कर्जापोटी राज्य शासनाकडे 25 कोटीची तातडीची मदत आदिनाथला करावी अशी मागणी केली.
करमाळा तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी रिटेवाडी उपसा सिंचन योजनेमुळे मोठ्या प्रमाणात क्षेत्र ओलिताखाली येईल. त्यामुळे ही योजना मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी केली. कार्यक्रमासाठी आदिनाथ, मकाई चे संचालक, सर्व जि.प.व प.सं सदस्य व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक रश्मी बागल यांनी केले तर आभार चेअरमन डोंगरे यांनी मानले.
● सरपंचाचा विशेष सत्कार
नारायणआबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील 30 ग्रामपंचायतींपैकी 21 ग्रामपंचायतीवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा भगवा फडकवल्याबद्दल माजी आमदार नारायण पाटील यांचा निवडून आलेल्या सरपंचासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
□ मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील ठळक मुद्दे
– करमाळ्यात आरोग्य केंद्र उभारावे यासाठीचे निवेदन आले आहे
– आरोग्य मंत्र्यांकडे बघत मुख्यमंत्री म्हणाले, तानाजीराव हे तर तुमच्याकडे आहे. लगेच करुन टाका.
– स्वतः हीत, स्वतःच स्वार्थ बाजूला ठेवले की मागे वळून बघावे लागत नाहीत
– हा कारखाना ताब्यात घेण्यासाठी काही लोकांनी खूप प्रयत्न केले
– मात्र मी तानाजी सावंताना सांगितले सहकारी साखर कारखाने वाचले पाहिजे असे सांगितले त्यांनी लगेच ते केले.
– तानाजीरावांचे काम खूप फास्ट असते
– कारखान्याच्या माध्यमातून आपण एकत्र आलात पण भविष्यात तालुक्याच्या विकासासाठी एकत्र राहा
– आदिनाथ कारखाना फीनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेईल
– महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचा मोठा वाटा आहे
– आपण ऊस गाळपात उत्तर भारतापेक्षा गाळपात पुढे आहोत
– वेळेत एफआरपी देणारे राज्य म्हणून महाराष्ट्रची ओळख आहे
– निर्यात बंदी उठवण्यासाठी मी आणि देवेंद्रजीनी पंतप्रधान मोदींकडे विनंती केली आहे
– सत्तेत आल्यापासून मंत्रीमंडळ बैठकीत, जे सिंचन प्रकल्प थांबले होते ते सुरु केले.
– जवळपास १८ प्रकल्प पुन्हा सुरु केले
– भुविकास बॅंकेचे 964 कोटीचे कर्ज माफ केले
– ६ लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात अडीच हजार कोटी खात्यात दिले
– अल्पावधीत लोकप्रिय झालेले सरकार आहे
– लोकांना न्याय देणारे निर्णय आम्ही घेतले. प्रत्येक घटकाला न्याय देणारे सरकार आहे