□ जानेवारीत आरोग्य विभागातील नोकरभरतीची निघणार जाहिरात
सोलापूर : सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शीतलकुमार जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नवीन आरोग्य केंद्राचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास विलंब केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. याबाबत सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी त्यांच्या निलंबनाची घोषणा केली. यामुळे आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे. District Health Officer Suspension of Dr Sheetal Kumar Jadhav Solapur January Recruitment Advertisement
आरोग्य विभागामध्ये रिकाम्या जागा असल्याबाबत उपप्रश्नाला उत्तर देताना डॉ सावंत यांनी सांगितले की, आरोग्य विभागाची बिंदूनामावली तयार करण्याचे काम अंतिम टप्यात आहे. येत्या जानेवारी महिन्यात नोकरी भरतीची जाहिरात काढण्यात येणार आहे. कंत्राटी तत्वावरील एमबीबीएस वैद्यकीय अधिकारी यांना शासकीय सेवेत सामावून घेतले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील नवीन आरोग्य केंद्राचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास विलंब केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई केलीय. भारतीय जनता पक्षाचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील २२ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ६८ उपकेंद्र यांच्या नवीन प्रस्तावाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी सोलापूरच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे निलंबन केले.
सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र सरकार २०१९ पासून २०२२ पर्यंत सरकार प्रस्ताव मागवत आहे. मात्र, सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी त्याला उत्तर देत नाहीत. हा जनतेच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे विधान परिषदेत आज मी त्यांच्या निलंबनाची घोषणा करत आहे. तसेच, त्यांची चौकशीही करण्यात येईल, असेही तानाजी सावंत यांनी आपल्या उत्तरात सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
डॉ. सावंत यांनी सांगितले की, सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य आणि उपकेंद्राचा प्रस्ताव परिपूर्ण नसल्याने नामंजूर झाला आहे. पुन्हा प्रस्ताव सादर करण्यासाठी आरोग्य सेवा आयुक्तालयाने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना बऱ्याचवेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र परिपूर्ण प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाहीत, त्यामुळे सोलापूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जाधव यांच्या निलंबनाची घोषणा करत आहे.
शिवाय महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या दरात वाढ करण्यासाठी आरोग्य विभागाच्या सचिवांची समिती नेमून अहवाल आल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असेही एका उपप्रश्नाला उत्तर देताना डॉ. सावंत यांनी सांगितले. राज्यातील पीएचसीबाबत लोकप्रतिनिधीची बैठक घेऊन प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र मान्यतेबाबत निर्णय घेण्याचे निर्देश प्रभारी सभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.
सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गांवर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत, शिवाय खुलताबादसह दौलताबाद, वेरूळ, म्हैसमाळ, सुलीभंजन ही पर्यटन आणि धार्मिक स्थळे आहेत. यामुळे खुलताबाद येथे ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी सांगितले. याबाबत सदस्य सतीश चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य शशिकांत शिंदे, नरेंद्र दराडे, अभिजित वंजारी, गोपीचंद पडळकर, प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेतला.
》 कोरोना राज्यातून हद्दपार – आरोग्यमंत्री
जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातही चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, ‘महाराष्ट्रातून करोना हद्दपार झाला असून, राज्यात केवळ 132 कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे जनतेने घाबरण्याचे काहीच कारण नाही’, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटले होते. नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत धुमधडाक्यात करावे, असेही त्यांनी आवाहन केले.