● तवेरा कार धडकली थेट डिव्हायडरला ● पाचजण गंभीररित्या जखमी ● जुळे सोलापुरातील रहिवासी
सोलापूर : तिरुपती बालाजी येथे दर्शन घेऊन पुढे जात असताना आज बुधवारी (ता. २५) दुपारी तवेरा कार रस्ता दुभाजकाला धडकून झालेल्या अपघातात सोलापूरचे चार जण ठार झाले तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. Four died in Solapur while returning from Tirupati Balaji’s darshan jule Solapur
तिरुपती इथं बालाजीच्या दर्शनासाठी गेलेल्या सोलापुरातील तरुणांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून इतर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यात अंतर अनंत टेंबूकर, मयुर मुत्तन, ऋषिकेश जंगम व अजय लुट्टे या चौघांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. जुळे सोलापुरातील नऊ जण तिरुपती बालाजी येथे चार चाकी कारने गेले होते.
तिरुपती बालाजी येथील दर्शन घेतल्यानंतर सोलापूरला वापस परतत असताना त्यांची कार डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात आज बुधवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चंद्रगिरी मंडळातील नायडूपेठ-पूथलापट्टू या मुख्य रस्त्यावर घडला.
अपघात इतका भयानक होता की कारच्या समोरील भागाचा चुराडा झाला आहे. भरधाव वेगाने निघालेली चार चाकी (क्र.एम.एच.१२.पी.एच.९७०१) यातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर पाचजण गंभीररित्या जखमी झाले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून तिरुपती रुईया रुग्णालयात हलवण्यात आले.घटनेची माहिती मिळताच पश्चिम डीएसपी नरसप्पा रुया रुग्णालयात पोहोचले. चंद्रगिरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ उपळवाटे येथे शेतीच्या वादातून दोन गटात तलवार आणि रॉडने मारहाण ५ जखमी
सोलापूर – शेतातील रस्त्याच्या वादातून सपाटे आणि गरड यांच्या गटात तलवार लोखंडी गज आणि काठीने झालेल्या मारहाणीत ५ जण जखमी झाले. ही घटना उपळवाटे (ता.माढा) येथे बुधवारी सकाळच्या सुमारास घडली. त्यांना टेंभुर्णी येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शरद सुभाष सपाटे (वय३०) आणि त्यांचा भाऊ सागर सपाटे (वय ३२ रा. उपळवाटे) अशी पहिल्या गटातील जखमींची नावे आहेत. त्यांना शेतातील रस्त्याच्या वादातून नीलकंठ गरड, दत्तात्रय गरड आणि अन्य तिघांनी तलवार आणि लोखंडी गज यांनी मारहाण केली. दोघांच्या डोक्यात गंभीर जखमा आहेत.
तर दुसऱ्या गटातील भालचंद गरड (वय ३०) त्याचा भाऊ नीलकंठ दत्तात्रय गरड (वय ३५) आणि दत्तात्रय वासुदेव गरड (वय ५५ सर्व रा.उपळवाटे) असे तिघेजण जखमी झाले. आपल्या शेतातील वाटेवरून ट्रॅक्टर का आणला. असे विचारल्याच्या कारणावरून सागर सपाटे आणि सुरेश सपाटे यांनी रॉड आणि काठीने मारहाण केली अशी प्राथमिक नोंद तालुका पोलीसात झाली आहे.
□ पोलिसात तक्रार दिली म्हणून अंगावर टेंपो घातली; चिकुंद्रा येथे दोघे जखमी
सोलापूर – आपल्या विरुद्ध पोलिसात तक्रार का दिली? या कारणावरून वेगाने जाणारी पिकप अंगावर घातल्याने अंबादास विठोबा मोरे(वय ४९) आणि लक्ष्मण धनराज मोरे (वय ३२) हे दोघे जखमी झाले. ही घटना आज बुधवारी सकाळी चिकुंद्रा (ता. तुळजापूर) येथील चौकात घडली. त्यांना नळदुर्ग येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ज्ञानेश्वर सुरेश गायकवाड याने सकाळी १० वाजेच्या सुमारास हा प्रकार केला. अशी नोंद सिव्हील पोलिस चौकीत झाली आहे.
तर पिकपचा चालक ज्ञानेश्वर सुरेश गायकवाड (वय २३ रा. चिकुंद्रा) हा देखील मारहाणीत जखमी झाला. शेतीच्या वादातून त्याला अंबादास मोरे,लखन मोरे आणि अन्य सात ते आठ जणांनी दगड आणि लाथाबुक्क्याने मारहाण केली. त्याला देखील सोलापुरात दाखल करण्यात आले.
□ गड्डा यात्रेत पाळण्यातून पडल्याने ४ वर्षाचा मुलगा जखमी
सोलापूर – शहरातील गड्डा यात्रेत पाळण्यावरून खाली पडल्याने चार वर्षाचा मुलगा जखमी झाला. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली.
हर्ष किसन राठोड (वय ४ वर्षे रा. तेरा मैल, ता.दक्षिण सोलापूर) असे जखमीचे नाव आहे. त्याला उपचारासाठी काजल राठोड (आई) यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. हर्ष हा इतर मुलासोबत यात्रेतील लहान पाळण्यात बसला होता. त्यावेळी तोल जाऊन खाली पडल्याने त्याच्या डोकीस जखम झाली. अशी नोंद सदर बझार पोलिसात झाली आहे.