○ सुधा मूर्तींची हजेरी, 1 कोटी 80 लाखांचे दान देऊनही महाराजाने नाव ठेवले गुपीत
पंढरपूर : सनईचा सूर, फुलांची आकर्षक सजावट व भाविकांच्या अपार उत्साहात श्री विठ्ठल व रूक्मिणीचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. हा अनोखा उत्सव डोळ्यात साठविण्यासाठी हजारो भाविकांनी पंढरीत हजेरी लावली होती. Pandharpur | Shree Vitthal – Rukmini Mata’s royal marriage ceremony auspicious Vasant Panchami Sudha Murthy Infosys
वसंत पंचमीस विठोबा रखुमाईचा विवाह सोहळा साजरा करण्याची परंपरा आहे. या निमित्त श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पाच दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. दरम्यान यंदा देवाच्या विवाह सोहळ्यानिमित्त जालना येथील एका महाराजांनी श्री विठ्ठलास दिड किलो सोन्याचा मुकूट तर रूक्मिणीस देखील दिड किलो सोन्याच्या मुकुटासह सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याच्या पाटल्या, बिल्वर, तोडे, कोल्हापुरी साज आदी दागिने अर्पण केले.
तसेच देवाच्या दैनंदिन उपचारासाठी लागणारे चांदीचे भांडे यामध्ये समई, पळी, पेला, ताम्हण, तांब्या, दुधाची वाटी, ताट आदी वस्तू देखील भेट दिल्या. तर विठ्ठल व रखुमाईस चेन्नई येथून पोशाख, नऊवारी साडी देखील त्यांनी आणली होती. विशेष म्हणजे देवाचा विवाह सोहळा असल्याने सदर भक्तांनी संपूर्ण रूखवत देखील सभामंडप येथे सजवून ठेवला होता.
सोने व चांदीच्या दागिन्याची किंमत १ कोटी ८० लाख रूपये झाली आहे. ऐवढ्या मोठ्या प्रमाणात दान देऊन देखील सदर महाराजांनी तसेच त्यांच्या भक्तांनी आपले नाव प्रसिध्द करू नये अशी मंदिर समितीस विनंती केली होती. तसेच या बदल्यात त्यांनी समितीकडून सत्कार देखील स्वीकारला नाही.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दरम्यान विवाह सोहळा व प्रजासत्ताक दिन या दोन्ही दिनाचे औचित्य साधून संपूर्ण मंदिराला आकर्षक फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. संत नामदेव पायरी तिरंग्याच्या झेंड्याची फुल लावून सजवली होती. तर ज्या सभामंडपात विवाह सोहळा पार पडला, तेथे सर्वत्र झेंडू, शेवंती, अष्टर फुलांनी अतिशय आकर्षक सजावट करण्यात आली होती. याच्या मधोमध फुलांचा मंडप करून याच्या चारही बाजुला विठ्ठलाच्या कानातील मकर अर्थात फुलांच्या आकारातील मासे लक्ष वेधून घेत होते.
सभामंडपाच्या चारही बाजुला विष्णुच्या दशअवतारांची चित्र उभारण्यात आली होती. यासह विठ्ठल व रूक्मिणीचा गाभारा देखील फुलांनी सजविला होता. सकाळी दहा वाजता अनुराधा शेटे यांनी रूक्मिणी स्वयंवर कथा सुरू केले. साडे अकरा वाजता देवास शुभ पांढर्या रंगाचा पोशाख व पागोटे तर देवीस नऊवारी काठाची साडी परिधान करण्यात आली. दुपारी बाराच्या सुमारासास मंगलअष्टका सुरू झाल्या व सव्वा बारा वाजता देवाचे लग्न संपन्न झाले. यानंतर उपस्थित महिला भाविकांनी लगीन देवाच लागल या गाण्यावर नृत्य करून आनंद साजरा केला.
सायंकाळी पाच वाजता संत नामदेव पायरी येथून फुलांनी सजविलेल्या रथामधून मोठ्या थाटामाटात लग्नाची मिरवणूक निघाली होती. यामध्ये लेझीम, बँड व आकर्षक विद्युत रोषणाई डोळ्याचे पारणे ङ्गेडणारी होती. हजारो भाविक या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते.
मागील काही वर्षापासून विठ्ठल रूक्मिणी विवाह सोहळ्यामध्ये राज्यभरातून भाविक दाखल होत आहेत. यंदा देखील मोठी गर्दी झाल्याने अनेकांना मंदिरात प्रवेश मिळाला नाही. यामुळे हे भाविक मंदिराच्या चारही बाजुला बसून सोहळ्याचा आनंद घेत होते.
□ विठुरायाची महिनाभर रंचपंचमी
वसंत पंचमी पासून ते रंग पंचमी पर्यंत श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेस एक महिनाभर पांढर्या रंगाची वस्त्र परिधान केली जातात. तसेच देवावर रोज केशर पाणी व गुलाल उधळला जातो. तब्बल महिनाभर देवाची रंगपंचमी सुरू असते. वसंत पंचमी पासून थंडी कमी होऊन रंग पंचमी पासून उन्हाळा सुरू होतो. ऋतु मानातील बदला प्रमाणे देवाचे उपचार बदलतात. त्याचाच एकभाग म्हणून पांढरे वस्त्र व रंग उधळण्याची परंपरा आहे.
□ सुधा मूर्तींची ही हजेरी
देशातील प्रसिध्द इन्फोसिस कंपनीच्या माजी प्रमुख सुधा मूर्ती यांनी देखील वसंत पंचमी निमित्त पंढरीत हजेरी लावली होती. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला त्यांना भारत सरकार कडून पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाला होता. यामुळे त्यांनी पंढरीकडे धाव घेतली.
यावेळी त्यांना सध्या महाराष्ट्र व कर्नाटकातील सीमा वादा विषयी प्रश्न केला असता त्यांनी कानावर हात ठेवले व मी राजकीय लोकांना उत्तर देऊ शकत नाही असे स्पष्ट केले. परंतु विठोबा हा महाराष्ट्राचा व कर्नाटक दोघांचा असल्याचे सांगितले. पुरस्कार मिळाल्याचा आनंद असून माझ्यावर दाखविलेल्या विश्वासामुळे आणखी काम करण्याची उर्जा मिळाल्याची प्रतिक्रिया दिली.