● रोशनी शिंदे मारहाण प्रकरण : फडतूस गृहमंत्री : ठाकरे X सोडणार नाही : बावनकुळे
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ‘पुष्पा’ या चित्रपटातील डायलॉग फडणवीसांनी उद्धव ठाकरेंसाठी वापरला. ‘आज ते मला म्हणाले फडतूस गृहमंत्री…उद्धव ठाकरे, फडतूस नहीं काडतूस हुँ मैं… झुकेगा नहीं साला, घुसेगा…घुसेगा’, असा डायलॉग फडणवीसांनी मारला. त्यांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला असून त्यावर नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. Uddhav Thackeray, Fadtus Nahi, Kadtus Hoon Main, Zukega Nahi Sala, Ghusega; Dialogue by Devendra Fadnavis Thane Roshni Shinde beating case
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फडतूस नाही, काडतूस आहे, झुकेगा नही साला, घुसेगा, असे म्हणत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले. यावर “झुकेगा नहीं घुसेगा साला ” हा डायलॉग भारीच होता पण 2016 पासून तुमच्या घरात एक बाई घुसली व तुमच्याच पत्नीवर स्पायिंग करत होती. हे तुम्हाला 7 वर्षे कळले नाही व तुम्ही घुसायच्या बाता कराव्यात, हे काय पटत नाही राव!!’ असे ट्विट करुन सुषमा अंधारेंनी फडणवीसांवर निशाणा साधला.
ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना मारहाण करण्यात आली. शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मारहाण केली, असा आरोप आहे. त्याविरोधात आज ठाकरे गटाने ठाण्यात आयुक्तालयावर मोर्चा काढण्याची घोषणा केली. मात्र यासाठी पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. अखेर आता पोलिसांनी 17 अटींसह मोर्चा काढण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान नागपुरातही मविआच्या सभेला 20 अटींसह परवानगी मिळाली आहे.
सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा दावा करत शिंदे गटाच्या काही महिलांनी ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे यांना रविवारी समज देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी धक्काबुक्की झाल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून येत आहे. यानंतर रोशनी शिंदे यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथून त्यांना स्पंदन हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. या महिलेची मंगळवारी उद्धव ठाकरेंनी ठाण्याच्या रुग्णालयात जाऊन भेट घेतली.
ठाण्यातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिवसेनेच्या शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाण प्रकरणावरून पुन्हा एकदा ठाकरे विरुध्द एकनाथ शिंदे, ठाकरे विरुध्द फडणवीस व भाजप असा तिहेरी सामना रंगला आहे. ‘फडणवीस हा महाराष्ट्राला लाभलेला फडतूस गृहमंत्री आहे’, अशी टिका उध्दव ठाकरे यांनी करताच ‘यापुढे आमच्या नेत्यांविरोधात बोललात तर तुम्हाला सोडणार नाही’; असा धमकीवजा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. त्याचवेळी ‘दम असेल तर गृहमंत्र्यांनी ठाण्यातील पोलीस आयुक्तांसह अन्य अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबईबाहेर कराव्यात’, असे ओपन चॅलेंज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले आहे.
ठाण्यात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना ठाण्यात एकनाथ शिंदे गटाच्या काही महिलांनी मारहाण केल्याची घटना घडली. यानंतर रोशनी शिंदे यांना प्रथम ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि त्यानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर उध्दव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासमवेत ठाण्यात रुग्णालयात जाऊन रोशनी शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत उध्दव ठाकरेंनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत तिखट शब्दात टिका केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
Fadtus nahi Kartus..!#SavarkarGauravYatra pic.twitter.com/rpvLYSt2tW
— Devendra Fadnavis (Modi Ka Parivar) (@Dev_Fadnavis) April 4, 2023
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माजी गृहमंत्री जयंत पाटील म्हणाले, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. पण ठाणे जिल्हा आणि ठाणे शहर त्यांच्या अधिकारांतर्गत येत नाही. सध्या ठाणे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बघितली, तर माझे देवेंद्र फडणवीसांना आव्हान आहे, त्यांनी आज उद्यापर्यंत किंवा पुढील ४८ तासांत ठाणे शहरातल्या पोलीस आयुक्तांपासून सर्व पोलीस अधिकाऱ्यांची ठाणे शहराच्या बाहेर महाराष्ट्रात बदली करावी. असे केले तरच महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यामध्ये खरंच दम आहे, असे आम्ही समजू. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली पोलीस खाते वागत नाही, यावर आम्ही विश्वास ठेवू.
● उध्दव ठाकरे म्हणतात…
एक फडतूस गृहमंत्री आपल्याला लाभला आहे. अत्यंत लाचार, लाळघोटेपणा करणारा. उपमुख्यमंत्रिपद मिळालं म्हणून नुसती फडणविसी करणारा एक माणूस गृहमंत्री म्हणून मिरवतोय. पण त्यांच्याच कार्यकर्त्यांवर मिंधे गटाच्या आमदारांनी हल्ला केला, तरी कुठे काही हलायला तयार नाही. यांची गुंडगिरी वाढायला लागली आहे. ठाण्यात एका पत्रकाराला धमकी देण्यात आली. महिलांना मारहाण केली जातेय. त्या महिलेला आम्ही भेटलो. त्या म्हणतायत की त्यांनी अशी कोणतीही कमेंट केली नाही. त्यांच्याकडून माफी मागण्याचा व्हिडिओ करून घेण्यात आला. तोही त्यांनी दिला. तरी आणखीन महिलांना बोलवून मारहाण करण्यात आली.
मला वाटतं फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, फडणवीसांच्या घरावर काही आलं तर लगेच एसआयटी नेमली जाते. बाजूच्या राज्यात जाऊन अटक केल्या जातात. त्यांच्या पक्षातल्या लोकांवर मिंधे गटाकडून हल्ले झाले, तर तिथे ही फडणविसी दाखवण्याची त्यांची हिंमत नाहीये. एकूणच गुंडगिरीचं राज्य आहे. यांना मुख्यमंत्री म्हणायचं का गुंडमंत्री म्हणायचं हे लोक ठरवतील. त्यांनी जाहीर करावं, मंत्रिमंडळाच्या विस्तारात एक खातं निर्माण करावं आणि गुंडमंत्री असं पद निर्माण करून गुंड पोसण्याचं काम त्या मंत्र्याकडे द्यावं, असा खोचक सल्लाही उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारला दिला आहे.
● ही धमकी आहे, असं समजा : बावनकुळे
उद्धव ठाकरे यांचं बोलणं अशा पद्धतीचं राहिलं तर, महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी त्यांना सोडणार नाही. उद्धव ठाकरे जिथे जातील, तिथे भाजप रस्त्यावर उतरेल. यानंतर देवेंद्र फडणवीसांबद्दल काही अपशब्द बोलाल तर राज्याचा अध्यक्ष म्हणून मी उद्धव ठाकरेंना सांगतो की, आज तुम्हाला शेवटची संधी दिली आहे. यानंतर बोललात तर लक्षात ठेवा. ही धमकी आहे, असं समजा.
यानंतर तुम्ही आमच्या राज्याच्या नेत्याबद्दल बोलायचं नाही. तुम्हाला तो अधिकार नाही. तुम्ही नैराश्य आल्याप्रमाणे वागत आहात, उद्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसही तुम्हाला सोडेल. उद्धव ठाकरे हा शून्य कर्तृत्वाचा माणूस आहे. आज त्यांच्याकडील सगळंच गेलं आहे. धनुष्यबाण, शिवसेना हातातून गेली तरीही ते सुधारत नाहीयेत. मी आणि माझा मुलगा, मी आणि माझं कुटुंब एवढाच त्यांचा पक्ष शिल्लक राहिला आहे. देवेंद्र फडणवीसांनी आपला स्वभाव बदलला आणि उद्धव ठाकरेंची कृत्यं बाहेर काढायला सुरुवात केली तर उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रात राहणं मुश्कील होईल. इतकी सामग्री देवेंद्र फडणवीसांजवळ आहे, असेही बावनकुळे म्हणाले.