○ तो मला मारायला आला होता; मी त्यालाच मारले
सोलापूर : चेहऱ्यावर ना भीती ना अस्वस्थता, हात थरथर कापत नव्हते आणि आवाजही कुठे कापरा झालेला नव्हता. प्रत्येक हालचाल अगदी नेहमीचीच. कुठलाच गोंधळ नाही किंवा बडबड नाही. Niece slit uncle’s throat in crowded Asra Chowk Solapur Hotgi Road murder अत्यंत शांत बैठक. बोलताना उलट वाद नाही की विचारल्यानंतर वेडेवाकडे बोलणे नाही. ‘का मारलं?’ म्हणून विचारले… तर म्हणाला, ‘ तो मला मारायला आला होता; मी त्याला मारले’… ‘दुसरं कोणी होतं का?’… ‘नाही… मी एकट्यानेच मारले… दुसऱ्यांचा त्यात काय संबंध?’ अशी कबुली देतानासुध्दा तो अत्यंत शांत होता. जणू काही घडलेच नाही; अशा आविर्भावात.
ही कबुली देणारा आहे पोरगा. अवघ्या १७ वर्षांचा तरणाबांड. त्याने त्याच्या नात्याने दूरचा मामा असणाऱ्या तरुणाचा सदासर्वकाळ गजबजलेल्या आसरा चौकात गुरुवारी (ता. 6) भरदुपारी धारदार चाकूने वार करून खून केला. त्यानंतर सिव्हिल पोलीस चौकीमधील पोलिसांनी विचारल्यावर त्याने थेट कबुली देऊन शांत बसणे पसंत केले.
अजित मल्लिकार्जुन कोलार (वय २४, रा. कर्णिक नगर, सोलापूर) असे या घटनेत खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मृत अजित आणि आरोपी हे नातेसंबंधातीलच असून मृत हा आरोपीचा दुरून मामा लागतो, असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● असा झाला खून
आसरा शॉपिंग सेंटरमधील एका गाळ्यात व्हिडिओ गेम सेंटरचे दुकान आहे. गुरूवारी दुपारी आरोपी हा त्या सेंटरमध्ये बसला होता. त्यावेळी मृत अजित कोल्हार त्याठिकाणी आला. पहिल्यांदा दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर शिवीगाळीमध्ये झाले. दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले. गच्चागच्ची झाली. त्यावेळी स्वत:ला सोडवून घेऊन आरोपी दुकानातून बाहेर पळाला. समोरच असलेल्या अंडाबुर्जीच्या गाडीवरचा कांदा कापायचा चाकू घेऊन तो परत आला.. आल्या आल्या त्याने अजितच्या गळ्यावर चाकूने वार केला. वार वर्मी लागल्यामुळे रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. क्षणार्धात तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. जेव्हा त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेले; तेव्हा तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
● मृतासोबतच आरोपी गेला सिव्हिल हॉस्पिटलला
व्हिडिओ गेमच्या गाळ्यात खून झाल्याची माहिती समजताच त्याठिकाणी बघ्यांची गर्दी झाली. गर्दीतील काहींनी एक रिक्षा बोलावली. रक्तबंबाळ अवस्थेतील अजितला त्या रिक्षात घातले. त्याच्या शेजारीच आरोपीसुध्दा बसला. तेव्हाही आरोपी अत्यंत शांत होता. पुढे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अजितला दाखल केले; तेव्हाही आरोपी तिथेच थांबलेला होता. रिक्षाचालकाने आरोपीला सिव्हिल पोलीस चौकीत नेऊन बसवले. तेव्हा तेथील पोलिसांना तो आरोपी असल्याचे समजले.
● अजित होता फुल्ल नशेत
आरोपी आणि मृत अजित यांच्यात बुधवारी रात्री भांडण झाले होते. त्यावेळीसुध्दा प्रकरण मारामारीपर्यंत गेले होते. सोडवासोडवी झाल्यामुळे प्रकरण तिथेच थांबले होते. गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास आरोपी व्हिडिओ सेंटरमध्ये बसलेला असताना मृत अजित त्याठिकाणी गेला. त्यावेळी अजित नशेतच होता.
व्हिडिओसेंटरमध्ये पुन्हा रात्रीच्या भांडणावरून वादावादी सुरू झाली. ही वादावादी वाढत जाऊन प्रकरण हाणामारीपर्यंत पोहचले. तेव्हा आरोपीने पळत जाऊन समोरच्या अंडाबुर्जीच्या गाडीवरून कांदा कापण्याचा चाकू आणला आणि अजितवर वार केले, अशी माहिती प्रत्यक्ष घटनास्थळावरून ऐकायला मिळाली.
● दोघांच्याही खिशात सापडला गांजा
मृत आणि आरोपी दोघेही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असल्याचे समजताच विजापूर नाका पोलीस त्याठिकाणी पोहचले. तिथे पहिल्यांदा आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पँटच्या खिशात गांजाच्या पुड्या सापडल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मृत अजितच्या अंगावरील पँटच्या खिशातही गांजाच्या पुड्या सापडल्याचेही सांगण्यात आले.