● महापालिका यंत्रणा झाली सुपर फ्लॉप : अधिकारी सुस्त, उपयोजनेचा अभाव
सोलापूर : सोलापूर शहरात पाण्याची कायम बोंब असून याकडे महापालिका प्रशासन गांभिर्याने पहात नसल्याने दिूसन येत आहे. रात्री-अपरात्री, पहाटे, कधी दुपारी तर सायंकाळी या पाणी सोडण्याच्या महापालिकेच्या तर्हा. Bomb in the name of drinking water supply in Solapur, Solapur Municipal Corporation on the wind of civic facilities प्रशासनाचे जलवाहिनी फुटल्या… वीजपुरवठा खंडीत झाल्याचा… पाण्याची पातळी कमी झाल्याचा… नेहमीचाच कांगवा. पाण्यासाठी बैठकाबैठका घेतल्या जातात पण त्यात पाण्यासारधीच चर्चा. अंमलबाजवणी मात्र शून्य, अशी प्रशासनाची स्थिती.
एकीकडे पाण्यासाठी नागरिकांची नेहमीच बोंब तर दुसरीकडे नागरी सुविधांची वाणवा, यामुळे सोलापूरकर जाम वैतागले आहेत. लोकप्रतिनिधी मंडळ असताना तिच स्थिती आणि प्रशासन असताना तिच स्थिती, अशी अवस्था महापालिकेची झाली आहे.
सोलापूर शहरात गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांमध्ये पाण्यासह नागरिक सोयीसुविधांसाठी ओरड होत आहेत. आंदोलन वाढली आहेत, पालिका प्रशासनाच्या विरोधात नाराजीचा सूर नागरिकांसह राजकीय नेत्यांमधून उमटत आहे.
भाजपच्या प्रदेशाध्यक्षांच्या दौर्यातही शहरातील विविध प्रश्न चव्हाट्यावर आणण्यात आले. हे प्रश्न सोडवण्यात महापालिका प्रशासन हतबल ठरल्याचे दिसून येत आहे. शासनाकडून आलेले अर्धा डझन अधिकारी हे प्रश्न सोडविण्यात कमी पडले की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तत्कालीन आयुक्त शिवशंकर यांची नागपूर येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी शीतल तेली उगले 21 नोव्हेंबर 2022 मध्ये सोलापूर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त झाल्या. त्यांनी पहिल्या दिवसापासून कामांचा धडाका सुरु केला. त्यांनी सुरुवातीला काही धोरणात्मक निर्णय घेतले असले तरी नंतर मात्र आयुक्तांची पकड अधिकार्यांवर ढिली झाल्याचे दिसून आल्याची चर्चा अनेक माजी लोकप्रतिनिधींमधून सुरू आहे.
सुरुवातीला पाणी पुरवठा सुरळीत होता. बहुतांश पाण्याच्या तक्रारी कमी होत्या. त्यातच महापालिका आयुक्तांनी तत्कालीन अनुभवी असलेल्या सार्वजनिक आरोग्य अभियंता संजय धनशेट्टी यांना शासनाकडे परत पाठविले. वास्तविक पाहता ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर अनुभवी अधिकार्यांना परत पाठविण्याचा निर्णय प्राप्त परिस्थितीत योग्य नसल्याचे बोलले जात आहे. नंतर पाणीपुरवठा विभागात अधिकार्यांची खांदेपालट केली ज्या अधिकार्यांनी तत्कालीन आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे मला पाणीपुरवठ्याची जबाबदारी जमत नाही, माझा अनुभव नाही असे स्पष्ट केले अशाच अधिकार्यांना या महत्त्वपूर्ण खात्याची जबाबदारी दिली.
त्यादिवसापासून शहरात पाणी प्रश्न ऐरणीवर आला. पाणीपुरवठा विस्कळीत होत असतानाच गढूळ आणि आळ्या युक्त पाणीपुरवठा अनेक ठिकाणी झाल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. विविध संघटना पक्ष तसेच आमदारांनाही पालिकेत धाव घेतली आणि या पाणी प्रश्नाची दाहकता अधिक निर्माण झाली.
एकीकडे महापालिका आयुक्त चार दिवसाआडच पाणीपुरवठा होईल, असे सांगत असतानाच दुसरीकडे याच महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांनी तीन दिवसाआड पाणीपुरवठा 15 दिवसात करण्याचे ठणकावून सांगितले होते.
मात्र पाणीपुरवठा ना वार दिवसाआड राहिला ना तीन दिवसाआड झाला. यामुळे महापालिकेतील या वरिष्ठ अधिकार्यातील मतभिन्नता समोर आली. त्यानंतर महापालिका आयुक्तांनी सर्व अधिकार्यांची बैठक घेऊन पाणीपुरवठा चार दिवसाचा आड का होईना मात्र सुरळीत करण्यासाठी आराखडा तयार केला. त्याचे वेळापत्रक ही तयार करून प्रत्येक झोनला लावण्याची मोठी घोषणा केली.मात्र या संदर्भात कृती झाली नसल्याचा आरोप होत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दुसरीकडे अत्याधुनिक अशा स्काडा प्रणालीसाठी शट्डाऊन घण्यात आले. या कामामुळे तब्बल महिनाभर शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला. हे काम पूर्णत्वाकडे नेण्यात आले परंतु शहराचा पाणीपुरवठा तरीही सुरळीत झाला नाही. वरचेवर उन्हाळा वाढत असताना दुसरीकडे पाणी प्रश्न ज्वलंत आणि गंभीर बनल्याचे दिसत आहे. कॉंग्रेस, सत्ताधारी भाजप, उद्धव ठकारे गट, तसेच आनंद चंदनशिवे यांनी आंदोलने केली, निवेदने दिली तरी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे कोणतेच नियोजन झाले नाही.
याच पाण्यासाठी मोटारीला शॉक बसून दोघांचे बळी गेले तरी महापालिकेला अद्याप जाग आली नाही. महापालिका अधिकारी आयुक्तांची दिशाभूल करत आहेत.
अशा सूचनाही अनेक अनुभवी नेत्यांनी केल्या असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दुसरीकडे शास्त्री नगर येथे कुत्र्यांचा सुळसुळाट आहे, त्याच्या चाव्याने एका मुलाचाही बळी गेला आहे. मात्र तेथेही कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात महापालिका कमी पडली आहे. शहरातील परिवहन सेवा सुधारण्यात आली नाही, ऐन उन्हाळ्यात सुट्टीचे दिवस असतानाही महापालिकेची जलतरण तलावे बंद आहेत. या अशा अनेक असुविधेमुळे नागरिकांसह लोकप्रतिनिधीही महापालिकेच्या कामकाजावर नाराज असल्याचे दिसत आहे.
● पालिका वर्तुळात आयुक्तांच्या बदलीची चर्चा
एकूणच शहरातील अनेक सोयी सुविधांचा निपटरा महापालिका प्रशासन करू शकले नाही, त्यांच्यावर अंकुश ठेवण्यात वरिष्ठ कमी पडले अशी चर्चा आहे. स्थानिक नागरी सोयी सुविधांचा बोजवारा उडाल्याचे नुकताच दौर्यावर आले असलेले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर मांडण्यात आले.
भाजप आणि शिंदे गटाच्या पदाधिकार्यांची, कार्यकर्त्यांची कोणतेच कामे होत नसल्याने त्यांच्यात ही नाराजी आहे. या असुविधा आणि न होणार्या कामाचा फटका सत्ताधारी भाजपला महापालिका निवडणुकीत बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे नवा अधिकारी आणण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपच्या नेत्याकडून होत असल्याचेही बोलले जात आहे.
● पोचमपाडला वर्क ऑर्डर लवकर द्यावी
समांतर जलवाहिनीचे काम आता पोचमपाड कंपनीकडे देण्यात आले आहे. लवादाने निकाल दिला असला तरी अद्याप कामास विलंब होत आहे. वास्तविक पाहता काम सुरू होणे आवश्यक होते. पावसाळ्यापूर्वी जॅकवेलच्या कामास विलंब धोकादायक मानला जात आहे. पावसाळ्यानंतर धरणातील पाणी वाढल्यानंतर जॅकवेलचे काम होणे अवघड आहे. यासाठी कंपनीला वर्कऑर्डर देऊन काम सुरू करण्यास सांगण्याची आवश्यकता आहे. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनीही लक्ष देणे गरजेचे आहे.