□ कर्नाटक काबीज केल्याने कॉंग्रेसजन हवेत…
सोलापूर : कर्नाटकातील दणदणीत विजयामुळे कॉंग्रेसचा आत्मविश्वास वाढला असून आता कॉंग्रेसने सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा सुरू केली आहे. रविवारी झालेल्या कॉंग्रेसच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी तसे संकेतही दिले आहेत. In Solapur district, the Mahavikas Aghadi will have a fight, Karnataka captures the Congressman, and many factions are in the air in politics.
सोलापूर लोकसभेसह माढा लोकसभा ही जिंका आणि जिल्ह्यातील अकरा विधानसभेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकवा, असे आवाहन त्यांनी कॉंग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे. आता या नाना पटोले यांच्या वक्तव्यावर महाआघाडीत बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता दुसरे घटक पक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ठाकरे गट काय भूमिका घेणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
यात महाविकास आघाडीमध्ये चांगलेचे घमासान होणार असून कॉंग्रेसजन मात्र सध्या हवेत आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार सोलापूर दौर्यावर आले असता त्यादरम्यान सोलापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे सोडवून घ्यावा, अशी मागणी पदाधिकार्यांनी त्यांच्याकडे केली होती. त्यावेळी पवारांनी जरी हा विषय टाळला असला तरी मुंबईमध्ये सोलापुरातील प्रमुख पदाधिकार्यांना बोलावून लोकसभेची सविस्तर माहिती घेतली होती.
राष्ट्रवादी वारंवार सोलापूर लोकसभेवर दावा करत आहे, तिकडे सुशीलकुमार शिंदे हेही लोकसभा लढवणार नाही असे म्हणत होते. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. यादरम्यान कर्नाटक मधील विधानसभेच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत कॉंग्रेसला न भूतो न भविष्यती असे यश मिळाले. यामुळे संपूर्ण देशात कॉंग्रेसमध्ये उत्साह संचारला आहे. जो तो स्वबळाची भाषा करत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
नुकत्याच सोलापुरात झालेल्या कॉंग्रेसच्या मेळाव्यात नाना पटोले यांनीही स्वबळावर लढण्याचे संकेत दिले. सोलापूर लोकसभा तर जिंकाच, याउलट माढा लोकसभाही जिंका आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील अकरा विधानसभेवरही कॉंग्रेसचा झेंडा फडकवा, आपल्याला राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचे आहे असे सांगत एक प्रकारे राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाला आव्हानच दिले आहे.
वास्तविक पाहता सोलापूर लोकसभा मतदारसंघात कॉंग्रेसची ताकद मोठी आहे. अपवाद वगळता हा लोकसभा मतदारसंघ कायम कॉंग्रेसच्या ताब्यात राहिला आहे. मात्र दुसरीकडे माढा मतदारसंघात कॉंग्रेसची ताकद अगदी नगण्य आहे, असे असतानाही नाना पटोले यांनी माढा लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. हा दावा म्हणजे राष्ट्रवादीला डिवचण्याचा प्रकार आहे, असे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी सोलापूर लोकसभा मतदारसंघ मागत आहे. त्यामुळेच जाणून-बुजून नाना पटोले यांनी माढा मतदारसंघावर दावा केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
महाआघाडीमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता नाना पटोले यांच्या या वक्तव्यावरून महाआघाडीमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. महाआघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी म्हणजेच कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटांनी एकत्र लोकसभेसह विधानसभा निवडणुका लढाव्यात असे ठरले होते. मात्र नाना पटोले यांनी स्वबळाचे संकेत दिल्यामुळे आता याकडे राष्ट्रवादी आणि ठाकरे गट कशा पद्धतीने पाहतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.