सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी पुन्हा एकदा आपण निवडणूक लढणार नसल्याचे सांगितले आहे. मात्र आ. प्रणिती शिंदे यांच्या कर्तृत्वाला लोकसभेत वाव आहे असे म्हणत त्याच उमेदवार असल्याचे संकेत दिले आहेत. आता यावर आ. शिंदे यांची काय भूमिका असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Sushilkumar’s daughter Praniti Shinde’s name for Solapur Lok Sabha is political
२०१४ आणि २०१९ मध्ये सुशीलकुमार शिंदे यांचा भाजपकडून सलग दोनवेळा पराभव झाला. त्यानंतर २०१७ मध्ये महापालिकेतही काँग्रेसचा दारुण पराभव झाला. तसेच अक्कलकोट विधानसभाही काँग्रेसच्या ताब्यातून गेली. या सर्व पार्श्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे यांनी आगामी २०२४ ची लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे घोषित केले होते. त्यानंतरही त्यांनी दोन- तीनवेळा याचा पुनरुच्चारही केला होता.
दुसरीकडे आ. प्रणिती शिंदे या लोकसभेसाठी इच्छुक दिसत नव्हत्या. त्यामुळे शेवटच्या क्षणी पुन्हा शिंदे साहेबच निवडणुकीत उतरतील असे काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना वाटत होते. मध्यंतरी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मेळाव्यात कार्यकर्त्यांनी साथ दिली तर पुन्हा शिंदे लढतील असे जाहीरपणे सांगितले होते.
त्यामुळे शिंदे साहेबच लढतील असे कार्यकर्त्यांना वाटत असतानाच आता परत शिंदे साहेबांनी आपण लोकसभा लढवणार नसल्याचे जाहीर करत आ. शिंदे यांचे नाव पुढे केले आहे. सुशीलकुमार शिंदे हे गुरुवारी सायंकाळी अक्कलकोट रोडवरील एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
सुशीलकुमार शिंदे पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षाने आपल्याला अपेक्षेपेक्षा जास्त दिले आहे. आपण स्वतः निवडणूक लढविणार नाही. आ. प्रणिती यांचे चौफेर ज्ञान, वाढता जनसंपर्क, पक्षाचे कार्य, विधानसभेचा अनुभव, अनेक भाषांवरील प्रभुत्व आदी बाबींचा विचार करता त्यांच्या कर्तृत्वाला लोकसभेत वाव आहे व तेथे त्यांचा अधिक उपयोग होईल, असे आपल्याला वाटते असेही शिंदे म्हणाले. शिंदे यांच्या या व्यक्तव्यानंतर आ. प्रणिती शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, सुशीलकुमार शिंदे आणि आ. प्रणिती शिंदे यांच्या व्यतिरिक्त काँग्रेसकडे दुसरा ताकदवान उमेदवारही नाही. त्यामुळे शिंदे कुटुंबातीलच उमेदवार असणार हे पक्के मानले जात आहे.
■ आ. प्रणिती शिंदेंची भूमिका महत्वाची
शहर मध्यमधून विधानसभेसाठी इंटरेस्ट दाखवणाऱ्या आ. प्रणिती शिंदे आता यावर काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. आ. शिंदे या सलग तिसऱ्यांदा शहरमध्यमधून दिग्गज नेत्यांचा पराभव करत निवडून आल्या आहेत. पुन्हा चौथ्यांदा संधी मिळाली आणि कदाचित काँग्रेस सरकार सत्तेत आल्यास शिंदे यांना मंत्रिपदही मिळू शकते, हे नक्की. त्यामुळे आ. शिंदेंची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे.
● – काँग्रेससाठी सोपी नसणार लढत
सध्या शहर उत्तर, दक्षिण, अक्कलकोट, मंगळवेढा-पंढरपूर या चार मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. अशातच आता अजितदादांची राष्ट्रवादी भाजपसोबत सत्तेत गेली आहे. त्यामुळे मोहोळचे आमदार यशवंत मानेही अजितदादांसोबत गेले आहेत. त्यामुळे मोहोळमधूनही काँग्रेसला अपेक्षित मतदान होण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे ही लोकसभा काँग्रेसासाठी वाटती तितकी सोपी नाही, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.