मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल मीडियावर पोस्ट केल्याने संतप्त शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेल्या माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी आज मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. भेटीनंतर त्यांनी मोठी घोषणाच केली आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर माजी अधिकारी मदन शर्मा यांनी आपण आत्तापासून भाजप-आरएसएससोबत असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे या विषयावर पुन्हा एकदा जोरदार प्रतिक्रिया येत आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
माजी नौदल अधिकारी मदन शर्मा म्हणाले, “आत्तापासून मी भाजप आणि आरएसएससोबत आहे. जेव्हा मला मारहाण झाली तेव्हा त्यांनी माझ्यावर मी भाजप-आरएसएससोबत असल्याचा आरोप केला. त्यामुळे आता मी घोषणा करतो की आजपासून मी भाजप आणि आरएसएससोबत आहे.”
माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण प्रकरणी पोलिसांनी रात्री दोन वाजता शिवसेनेच्या 6 कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा अटक केली आहे. या सर्वांना बोरिवली कोर्टात हजर करण्यात आलं. याआधीही या सर्वांना अटक करण्यात आली होती. मात्र, तेव्हा त्यांना जामीन मंजूर झाला होता. आता समता नगर पोलिसांनी शिवसेना कार्यकर्त्यांवर भारतीय दंड संहिता कलम 452 अंतर्गत देखील गुन्हा नोंद केला आहे.
संबंधित आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर आरोपींकडून जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. यावर न्यायालयाने सर्व आरोपींना प्रत्येकी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. त्यांना पोलीस तपासासाठी बोलावतील तेव्हा हजर राहण्याच्या अटीवर हा जामीन मंजूर करण्यात आला.