नवी दिल्ली : पंजाबी गायक-अभिनेता दीप सिद्धूला अखेर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली. प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) दिल्लीत आंदोलक शेतकऱ्यांनी ‘ट्रॅक्टर रॅली’ काढली होती. यावेळी लाल किल्ल्यावर हिंसाचार झाला. हा हिंसाचार दीपने भडकवल्याचा आरोप आहे. यानंतर दीप फरार होता. फरार झाल्यानंतर तो सोशल मीडियावर आपल्या मित्राद्वारे व्हिडिओ पोस्ट करत होता. दरम्यान, आतापर्यंत 127 जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली.
केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलनाचा आज 76 वा दिवस आहे. दरम्यान, 26 जानेवारी रोजी झालेल्या दिल्ली हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार दीप सिद्धू याला दिल्ली पोलिसांनी आज अटक केली. दोन दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांनी दीप सिद्धूच्यावर एक लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दीप सिद्धूला अटक केली आहे. लाल किल्ल्यावर झेंडा फडकवण्यात आणि शेतकऱ्यांना भडकवण्यात दीप सिद्धू सहभागी होता.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* दीप सिद्धू फरार होता
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दीप सिद्धूला अटक केली आहे. मुख्य आरोपी दीप सिद्धू 26 जानेवारीपासून फरार होता. मात्र, दीप सोडून लाल किल्ल्यावर झेंडा फडकवणारे गँगस्टर लक्खा सिधाना आणि जुगराज अद्याप बेपत्ता आहेत. दिल्ली पोलिसांनी हिंसाचार करणाऱ्या सुमारे 50 जणांचे फोटोही जारी केले आहेत.
* देशद्रोह आणि यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल
दिल्ली पोलिसांनी धार्मिक झेंडा फडकवणे आणि लाल किल्ल्यावर हिंसाचार केल्याप्रकरणी देशद्रोह आणि युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दिल्ली पोलीस स्पेशल सेल या प्रकरणाचा तपास करत आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान हिंसाचार झाला होता. यावेळी आंदोलकांनी लाल किल्ल्यात प्रवेश केला आणि तेथे ध्वजस्तंभावर धार्मिक ध्वज फडकवला होता.