सांगली : दोन महिन्यापासून पगार थकल्याने एका एसटी कर्मचाऱ्याने आर्थिक विवंचनेतून गळफास घेऊन आत्महत्या केली. अमोल धोंडीराम माळी ( वय-३३) (रा.गोळेवाडी,पेठ, ता.वाळवा जि. सांगली) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून तो इस्लामपूर एसटी आगारात मेकॅनिक म्हणून कामाला होता. याबाबत राजेंद्र हंबीरराव माळी ( वय-२२) यांनी इस्लामपूर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अमोल माळी हा इस्लामपूर एसटी आगारात मेकॅनिक म्हणून काम करत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन मुळे एसटी सेवा सध्या बंद आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगारही थकित आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अमोल याच्या पगारावरच त्याच्या कुटुंबाचा घरखर्च चालत होता. काही दिवसांपासून अमोल व त्याची पत्नी दोघेही शेतात मजुरी करून घरखर्च चालवत होते. त्यामुळे अमोल काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होता. त्यातच त्याने आत्महत्याचे पाऊल उचलले. अमोल माळी यांच्या पश्चात आई, पत्नी आणि ५ वर्षाचा मुलगा व ३ वर्षाची मुलगी असे कुटुंब आहे. हे कुटुंब आता उघड्यावर पडले आहे. एसटी महामंडळाने आणि सर्व कर्मचारी, अधिकारी यांनी माळी याच्या कुटुंबाला मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.
मार्च महिन्यातील पगार सात एप्रिलला होणे अपेक्षित होते मात्र तो 28 एप्रिल रोजी पगार झाला. यामध्ये वर्ग तीन आणि चार च्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के पगार तर वर्ग एक आणि दोन च्या कर्मचाऱ्यांना 50 टक्के पगार देण्यात आला. एप्रिल महिन्याचा पगार या कर्मचाऱ्यांना 22 मे रोजी शंभर टक्के पगार देण्यात आला. मे महिन्याचा पगार सर्वांना 50 टक्के याप्रमाणे देण्यात आला. मात्र संपूर्ण जून आणि आता पूर्ण झालेल्या जुलै महिन्याचा पगार शासनाकडून येणे बाकी आहे.
* थकित पगारामुळे प्रचंड नैराश्य
एसटीमध्ये कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरुवातीला दहा ते बारा हजार पगार आहे. त्यातच हे कर्मचारी राज्यभरातील अन्य विभागातून कामाला आलेले असतात. अशावेळी तीन तीन महिन्याचा पगार हातात येत नसल्याने या कर्मचाऱ्यांवर बेकारीची संकट कोसळले आहे. अनेक बस चालक खासगी वाहनांवर चालक म्हणून जात आहेत. लाॅकडाऊनमुळे हे काम देखील त्यांना मिळत नाही. दोन -तीन महिने पगार न मिळाल्यामुळे या कर्मचाऱ्यांना प्रचंड नैराश्य आले आहे. यामधूनच एसटी कर्मचारी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. त्यामुळे शासनाने एसटी आगारातील कर्मचाऱ्यांचे पगार तातडीने द्यावेत, अशी मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे.
* कामकागारांवर बेकारीचे संकट
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडे राज्यभरात 1 लाख 10 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र लाॅकडाऊनच्या चार महिन्यात कर्मचार्यांवर बेकारीचे संकट कोसळले आहे. एसटीची चाके थांबल्यामुळे या कर्मचाऱ्यांचे पगार देखील थांबवण्यात आले आहेत. राज्यातील एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांना महिन्याला 270 कोटी रुपये पगारासाठी खर्च करावे लागतात. मात्र एसटीचे उत्पन्न बंद झाल्यामुळे गेल्या चार महिने पैकी तीन महिने कर्मचाऱ्यांना पगारच नाही.