मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई अंकुशराव टोपे (वय ७४) यांचे शनिवारी रात्री निधन झाले. मार्च महिन्यापासून त्यांच्यावर मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज रविवारी संध्याकाळी ४ वाजता कर्मवीर अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना (अंकुशनगर, ता. अंबड, जि. जालना) येथे करण्यात येणार आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एकीकडे राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आरोग्य मंत्री म्हणून टोपे तीन महिन्यांपासून राज्यभर दौरे, बैठकांचे सत्र सुरू आहे. त्यात दुसरीकडे आई रुग्णालयात दाखल होत्या. जवळपास दीड महिन्यापासून पासून त्यांच्यावर बॉम्बे रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. एकीकडे आईची काळजी घेणे आणि दुसरीकडे कोरोनाची लढाई लढणे अशी दुहेरी कसरत गेल्या महिनाभरापासून टोपे यांची सुरू होती. कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे (मर्यादित उपस्थितीची) त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
आरोग्यमंञी राजेश टोपे यांच्या मातोश्रीच्या निधनाचे वृत्त कळताच अनेकांनी त्यांचे सांत्वन केले आहे.
राजेश टोपे यांच्या मातोश्री ७४ वर्षाच्या होत्या. तसेच त्या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, जावई, सुन, नातवंडे असा परिवार आहे.
कोरोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला हॉस्पीटलमध्ये जायचे. रोज सकाळी आईला भेटून दिवसाची सुरूवात ते करायचे.
राज्याचे आरोग्यमंत्री तथा राज्य मंत्रिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय राजेश टोपे यांच्या मातोश्री श्रीमती शारदाताई अंकुशराव टोपे यांचे निधन हा आमच्या सर्वांसाठी मोठा धक्का आहे. मी आदरणीय शारदाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. शारदाताईंनी ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार स्वर्गीय अंकुशराव टोपे साहेबांना जीवनाच्या प्रत्येक पावलावर समर्थ साथ दिली, असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.
“ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावले नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. ४ वर्षांपूर्वी वडील गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आशीर्वाद दिले. तो आशीर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील”
– राजेश टोपे, आरोग्यमंत्री