मुंबई / नवी दिल्ली : क्रिकेट प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्रिकेट सामन्यांवरही बंदी आहे. मात्र, भारत सरकारने आता आयपीएलला परवानगी दिली आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. इतकंच नाही तर आयपीएल सामन्यांचं शेड्युलही तयार झालं आहे. आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत यूएईमध्ये खेळवला जाणार आहे.
त्याशिवाय, महिलांचा आयपीएलही खेळवला जाणार आहे, असंही बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. आयपीएलचे सर्व स्पॉन्सर्स अबाधित आहेत, म्हणजे चिनी प्रायोजक विव्हो आयपीएलचे मुख्य स्पॉन्सर म्हणून कायम राहतील.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
आयपीएल स्पर्धा 19 सप्टेंबरला सुरु होणार आहे. आयपीएल 53 दिवस चालणार आहे. आयपीएलची फायनल 10 नोव्हेंबरला खेळवली जाणार आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की, यावेळी आपीएलमध्ये 10 डबल हेडर म्हणजे एका दिवसात दोन सामने खेळवले जाणार आहेत.
‘आयपीएलचे सामने सायंकाळी साडे सात वाजेपासून खेळवले जाणार आहेत. आम्ही आयपीएलच्या नियमित वेळेपेक्षा 30 मिनिटं आधी सामने खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. जे सामने आधी सायंकाळी 8 वाजता घेतले जात होते, ते सायंकाळी साडे सात वाजता खेळवले जाणार आहेत’, अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.
स्पर्धेच्या मुख्य स्पॉन्सर म्हणून VIVO या चिनी कंपनीला कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. काही महिन्यांपूर्वी गलवान खोऱ्यात भारत-चीन सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षात 20 भारतीय जवानांना हौतात्म्य पत्करावं लागलं होतं. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीसीआयने VIVO कंपनीसोबतचा करार मोडावा, अशी लोकांची भूमिका होती. सोशल मीडियावर यासाठी दबावही वाढवण्यात आला होता.
सुरुवातीला जनमताचा आदर करत बीसीसीआयने यावर विचार करण्याची तयारी दाखवली. परंतू करोनामुळे सध्या निर्माण झालेली आर्थिक परिस्थिती लक्षात सध्याच्या घडीला VIVO कंपनीची स्पॉन्सरशीप कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. VIVO आणि बीसीसीआय यांच्यात 5 वर्षांचा करार झाला असून प्रत्येक वर्षासाठी बीसीसीआयला VIVO कंपनीकडून 400 कोटींपेक्षा जास्त महसूल मिळतो. बीसीसीआयच्या या निर्णयावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून ट्विटरवर #BoycottIPL हा हॅशटॅग ट्रेंडिंग करत नेटकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.