बैरुत : लेबननची राजधानी असललेल्या बेरुतमध्ये मंगळवारी संध्याकाळी दोन भीषण स्फोट झाले. या घटनेत 78 ठार तर 4 हजाराहून अधिक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या स्फोटांचा व्हिडिओही समाजमाध्यमांत जोरदार व्हायरल होत आहे. हे स्फोट इतके भीषण होते की आजूबाजूच्या इमारतींना मोठा हादरा बसला.
हे स्फोट नेमके कशामुळे झाले हे समजू शकलेले नाही. मात्र हे दोन इतके भयानक स्फोट होता की त्यामुळे बेरुत संपूर्ण हादरुन गेले. पंतप्रधान हसन दियाब यांनी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. लोकांना वाटले भूकंप झाला. मोठा हादरा आणि भूकंपाची शक्यता वाटून नागरिक भीतीने बाहेर पडले. प्रत्येकांच्या चेहऱ्यावर चिंतेचे सावट दिसून येत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शहरातल्या एका गोदामात गेल्या सहा वर्षांपासून स्फोटक पदार्थ ठेवले होते. त्याचाच स्फोट झाल्याचं सांगितलं जातंय. लेबेननचे अध्यक्ष माइकल इऑन यांनी या घटनेविषयी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, “तब्बल 2750 टन अमोनिअम नायट्रेट असुरक्षितपणे ठेवणं अजिबात ‘स्वीकारार्ह’ नाही.” स्फोट कसा झाला, याचा तपास सध्या सुरू आहे.
एएफपी या वृत्तसंस्थेने एका प्रत्यक्षदर्शीच्या हवाल्याने सांगितलं की परिसरातल्या सर्व इमारतींचं मोठं नुकसान झालं. इमारतींचे अवशेष सर्वत्र पसरले आहे. सर्व काचाही फुटल्या. भूमध्य समुद्रात 240 किमी दूर सायप्रसपर्यंत या स्फोटाचा आवाज ऐकू गेला. विशेष म्हणजे 2005 साली लेबननचे माजी पंतप्रधान रफिक हरीरी यांच्या हत्येचा तपास आणि न्यायालयाचा निकाल येणार होता आणि तेव्हाच हा स्फोट झाला आहे.
* पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय मदतीचं आवाहन
स्फोटानंतर लेबननच्या पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय मदतीचं आवाहन केलं आहे. पंतप्रधान हसन दाईब म्हणाले, “मी आमच्या मित्रराष्ट्रांना आवाहन करतो की लेबेननच्या पाठिशी उभे राहून या खोल जखमा भरून काढण्यासाठी मदत करावी.”
युकेचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी ट्वीट करत म्हटलं, “बैरुतचे फोटो आणि व्हिडियो हादरवून टाकणारे आहेत. माझ्या सहवेदना त्यांच्यासोबत आहेत. कुठल्याही प्रकारची मदत करायला आम्ही तयार आहोत.”
‘भयंकर हल्ला’ असं म्हणत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनीही लेबननला मदतीचं आश्वासन दिलं आहे. अमेरिकेचे गृहमंत्री माईक पॉम्पियो यांनी केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात, “आम्ही आढावा घेत आहोत आणि या भयंकर संकटातून बाहेर पडण्यासाठी लेबेनॉनच्या नागरिकांना सहकार्य करण्यासाठी आम्ही तयार आहोत.” लेबेननला मदत आणि संसाधनं पाठवत असल्याचं फ्रान्सनं म्हटलं आहे.