सांगली : चांदोली धरण आणि कोयना धरण परिसरात सलग मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा जोर असाच सुरु राहिल्याने, कोयना व चांदोली धरणातून काल गुरुवार सायंकाळपासून 2 ते 5 हजार क्युसेकने विसर्ग केला जाईल, असे प्रशासनाने जाहिर केले होते. दरम्यान, चांदोली धरण परिसरात आज तिसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपले.
सकाळी आठ वाजेपर्यंत 165 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. सांगलीतील आयर्विन पुलाची पाणीपातळी गेल्या 24 तासात 10 फुटावरुन 22 फुटापर्यंत वाढली आहे. वारणा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले आहे. चांदोली धरणातून 4400 कुसेक्सने वारणा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. सांगली जिल्ह्यासाठी एनडीआरएफची दोन टीम दाखल झाल्या आहेत. त्यातील एक सांगलीत तर दुसरी टीम आष्टा येथे आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पावसाचा जोर वाढत असल्याने नदीकाठच्या गावांना जिल्हा प्रशासनाने सावधानतेचा इशारा दिला आहे. कोयना परिसरात गेल्या 24 तासात 202 मिलीमीटर पाऊस पडला. महाबळेश्वरला 183 आणि नवजाला 235 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या 24 तासात 81 हजार 64 क्युसेक पाणी गोळा झाले आहे.
जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून सुरू झालेला पाऊस आजही कायम राहिला. पावसाचा मंगळवारी जोर वाढला तो आजही कायम राहिला. जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस आहे. शिराळा तालुक्यात तिसऱ्या दिवशीही अतिवृष्टी झाली. वारणा नदीच्या पातळीत मोठी वाढ होत आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे.
* कोल्हापूरशी संपर्क तुटला
गेल्या 48 तासात मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मांगले-काखे हा वारणा नदीवरील पूल तसेच मांगले-सावर्डे, कोकरूड-रेठरे, शिराळे खुर्द-माणगाव, शिगाव, दुधगाव, समडोळी हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. चरण,आरला, पुलांवर पाणी आल्याने कोल्हापूर जिल्ह्याशी असलेला संपर्क तुटला आहे. मुसळधार पावसामुळे चांदोली धरणाचा पाणीसाठा वाढत होत आहे. पावसाचा जोर वाढला तर आठवड्यात चांदोली धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.
नद्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे –
कोयना कराड 24.09 फूट, कृष्णा 16.3, बहे 9.5, ताकारी 24.9, भिलवडी 23, आयर्विन सांगली 22, अंकली 24.8 आणि म्हैसाळ बंधारा 32 फूट.
धरण, पाणीसाठा ( टी. एम. सी)
वारणा, 28.72
कोयना, 68.81
अलमट्टी, 94.36