बार्शी : जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे उपशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांची पदोन्नतीने पुणे स्थित राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) सहाय्यक संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या पदावर नियुक्त होणारे ते बार्शी तालुक्यातील पहिलेच अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी बार्शी येथे गटशिक्षणाधिकारी, उस्मानाबाद येथे उपशिक्षणाधिकारी आदी पदांवर सेवा बजावली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एससीईआरटी ही राज्याच्या शैक्षणिक नियोजनातील महत्वपूर्ण संस्था असून राज्याच्या प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचावणे, शिक्षकांमध्ये संशोधन अभिवृत्ती विकसित करणे, सेवापूर्व व सेवांतर्गत शिक्षक प्रशिक्षणाची सोय करणे, शिक्षण विभाग व राज्य शासन यांना त्यांची धोरणे व उपक्रम प्राथमिक शिक्षणात राबविण्यात मदत करणे, शैक्षणिक साहित्य प्रकाशित करणे, शिक्षणातील नवोपक्रम व नवप्रवाह यांचा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रसार करणे,
जिल्हास्तरीय विस्तार सेवा केंद्र व राज्यस्तरीय विषय शिक्षक संघटना व उपक्रमशील शिक्षक संघटना यांची चर्चासत्रे आयोजित करणे, शालांतर्गत शैक्षणिक मूल्यमापन प्रक्रियेतील समस्यांचा अभ्यास करून त्यात सुधारणा सुचविणे, प्राथमिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमाची पुनर्रचना व नूतनीकरण करणे, त्यानुसार प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे व शैक्षिणिक साहित्य विकसित करणे, आदी कामे या संस्थेकडून केली जातात.