भोपाळ : प्रख्यात गझलकार आणि गीतकार राहत इंदौरी यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले असून त्यांना रविवारी मध्य प्रदेशातील इंदौरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना कोरोनाची देखील लागण झाली होती. त्यातच त्यांना आज दोनदा हृदयविकाराचे झटके आल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती अरविंदो रुग्णालयाचे डॉ. विनोद भंडारी यांनी दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राहत इंदौरी यांनी आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं आजच सोशल मीडियावरुन सांगितलं होतं.
“कोविडची प्राथमिक लक्षणे दिसू लागताच माझी कोरोना चाचणी करण्यात आली. तिचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. मी अरविंदो हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहे. या आजाराचा मी लवकरात लवकर पराभव करावा, अशी प्रार्थना करा. आणखी एक विनंती आहे, मला किंवा माझ्या कुटुंबीयांना फोन करु नका, आपणास माझ्या प्रकृतीची माहिती ट्विटर आणि फेसबुकवर मिळेल.” असे ट्वीट त्यांनी आज सकाळी केले होते.
राहत इंदौरी यांना इंदौरच्या अरविंदो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. हे कोव्हिड रुग्णालय आहे. राहत इंदौरी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या मुलाने सकाळी दिली होती. इंदौरी यांचे वय 70 वर्षे असल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
* थोडक्यात परिचय
राहत इंदौरी हे प्रसिद्ध शायर तर होतेच, याशिवाय त्यांनी बॉलिवूडसाठीही अनेक गाणी लिहिली होती. इश्क, मिशन काश्मीर, मुन्नाभाई एमबीबीएस, मर्डर अशा अनेक चित्रपटांची गाणी राहत इंदौरी यांनी लिहिली होती.
आज हमने दिल का हर किस्सा (सर), चोरी चोरी जब नजरे मिली (करीब), ये रिश्ता क्या कहलता है (मीनाक्षी), धुआ धुआ (मिशन काश्मीर), दिल को हजार बार (मर्डर) अशी अनेक अर्थपूर्ण गाणी त्यांच्या लेखणीतून उतरली. ऋत, मौजूद, नाराज अशा पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले होते.