मुंबई : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
राज्यातील 18 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि तीन दंत महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यानुसार कनिष्ठ निवासी आणि वरिष्ठ निवासी यांच्या सध्याच्या विद्यावेतनात 10 हजार रुपये वाढ याच महिन्यापासून करण्याचे ठरवण्यात आले. यामुळे 29 कोटी 67 लाख 60 हजार इतका वाढीव बोजा पडणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राज्यात कोरोनामुळे निवासी डॉक्टर अहोरात्र रुग्णसेवा देत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. सध्या महाराष्ट्रात डॉक्टरांना दरमहिन्याला 54 हजार, गुजरातमध्ये 63 हजार, बिहारमध्ये 65 हजार आणि उत्तर प्रदेशात 78 हजार एवढे विद्यावेतन देण्यात येते.
महाराष्ट्रात निवासी डॉक्टरांना विद्यावेतनात वाढ केल्याचा निर्णय झाल्यामुळे कनिष्ठ निवासी आणि वरिष्ठ निवासी यांचे सुधारित विद्यावेतन हे 64 हजार 551 पासून 71 हजार 247 रुपयांपर्यंत होईल. दंत पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे सुधारित विद्यावेतन 49 हजार 648 पासून 55 हजार 258 इतके होईल. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे डॉक्टरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.