वॉशिंग्टन : अमेरिकेने एच१ बी आणि एल १ व्हिसा संदर्भात काही निर्बंध शिथिल केले आहेत. यामुळे अमेरिकेत काम करत असलेल्या आयटी आणि आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ट्रम्प प्रशासनाने याबाबतची घोषणा केली आहे. अमेरिकेने एच१ बी व्हिसावर निर्बंध घातल्याने त्याचा फटका हजारो भारतीयांना बसला होता. पण आता या व्हिसावरील निर्बंध शिथिल केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एच १ बी व्हिसा नियमांत बदल केले आहेत.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत लागू असलेले व्हिसा निर्बंध अखेर काही प्रमाणात शिथिल झाले आहेत. ट्रम्प प्रशासनाने एच-1 बी व्हिसाच्या नियमावलीत सूट दिली आहे. या निर्णयाने हिंदुस्थानसह इतर देशांतील नागरिकांच्या अमेरिकेच्या आयटी क्षेत्रातील नोकऱ्या वाचणार आहेत.
त्यांना पुन्हा नोकरीवर रुजू होण्यासाठी अमेरिकेत प्रवेश दिला जाणार आहे. व्हिसाधारकाच्या पत्नी आणि मुलांनाही प्रवास करता येणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
व्हिसाधारकाने अमेरिकेतील आधीच्या नोकरीसाठी अर्ज केला तर त्याला नियमांतील सूटचा मोठा फायदा मिळणार आहे. तांत्रिक विभागातील तज्ञ, वरिष्ठ पातळीवरील व्यवस्थापक तसेच इतर कर्मचाऱयांनाही प्रवासाला मुभा दिली जाणार आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 22 जूनला एच-1 बी व्हिसा निलंबित केल्याची घोषणा केली होती. या निर्णयाचा हिंदुस्थानसह अन्य काही देशांना मोठा झटका बसला होता. आता अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी प्रशासनाने व्हिसा निर्बंध शिथिल केले आहेत.
ट्रम्प प्रशासनाने कोरोना योद्ध्यांनाही अमेरिकेचा दरवाजा खुला केला आहे. सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात काम करणारे, विशेषत: कोरोना महामारीचा प्रभाव कमी करण्यासाठी कार्यरत असलेल्या व्हिसाधारक आरोग्य सेवकांना अमेरिकेत प्रवेश मिळणार आहे. अमेरिकेत कोरोना फैलावाची परिस्थिती दिवसेंदिवस भीषण बनत चालली असतानाच ट्रम्प प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे.