विरवडे बु : एखाद्या पोलिसाची बदली टाळण्यासाठी लोक रस्त्यावर उतरतात हे अनेकदा पाहिले. मात्र बदली करा म्हणून रस्त्यावर उतरण्याचे क्वचित पाहवयास मिळते. मोहोळ तालुक्यातील कामती येथील एका सहायक पोलिस निरीक्षकाच्या बदलीचा विषय अनेक दिवसापासून चर्चिला जात होता. मात्र स्वातंत्र्य दिनी कामती येथील 28 गावांना स्वातंत्र्य द्या म्हणून शिवसेनेसह नागरिकांनी रस्तारोको केला. आता हे बदली प्रकरण खूपच चिघळू लागले आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कामती पोलीस ठाण्याचे स.पो.नि.किरण उंदरे यांचा गेल्या दोन वर्षात पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २८ गावांना उपद्रव झाला आहे. लॉकडॉउनमध्ये या उपद्रवचा अक्षरक्षः अतिरेक झाला आहे. यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन दिले. त्यानुसार पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार उंदरे यांची बदली झाली. मात्र त्यांनी अजून पदभार सोडला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी किरण उंदरे यांची हकालपट्टी करा, अशी मागणी करत चले जाव च्या घोषणा दिल्या.
पुणे-विजापूर व सोलापूर-रत्नागिरी महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले. किरण उंदरे यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या २ वर्षात कायद्याच्या धाक दाखवून गोरगरीब जनेतेला वेठीस धरले. लॉकडाउनमध्ये शेतकरी, मजुर,व गावक-यांना, सर्वसामान्य लोकांना नाहक त्रास दिला. एकाधिकारशाही करणाऱ्या जुलमी अधिकाऱ्यांच्या जाचातून २८ गावाच्या जनतेला स्वातंत्र्य मिळवून देण्याची मागणी निवेदनात केली.
यावेळी जिल्हा उपप्रमुख दादासाहेब पवार, शिवसेना तालुकाप्रमुख अशोक भोसले, उपतालुकाप्रमुख संतोष चव्हाण, विनोद आंबरे, प्रकाश पारवे, विनोद भोसले, दीपक पुजारी, आत्माराम राठोड, सरपंच भारत घोडके, सिद्धाराम म्हमाणे, पांडुरंग माळी, अमोल माळी, शरद गोरे, विजय पवार, समाधान भोसले यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.