सोलापूर : गॅसची वाहतूक करणार्या ट्रकच्या धडकेने दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले. हा अपघात आज सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हैदराबाद रस्त्यावरील पर्ल गार्डनजवळ झाला. यात बापलेकीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
नागनाथ लिंगप्पा गगनहळ्ळी (वय 66, रा. दमाणी शाळेजवळ, बुधवार पेठ, सोलापूर), सपना शितल विभूते (वय 36, रा. सांगली, सध्या रा. बुधवार पेठ) अशी मृत झालेल्या बापलेकीचे नाव आहे. अपघातानंतर नागरिकांनी ट्रक चालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. गॅस वाहतूक करणारा (एम.एच. 25 बी. 9977) हा ट्रक पाकणीवरून उस्मानाबादच्या दिशेने जात होता, त्याचवेळी गगनहळ्ळी एका महिलेसह (एम.एच.13 के. 0490) या दुचाकीवरून नागनाथ आणि त्यांची मुलगी सपना ही रूपाभवानी मंदिराकडून सोलापूरच्या दिशेने येत होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पर्ल गार्डनजवळच्या दुभाजकासमोर ट्रकने गगनहळ्ळी यांच्या दुचाकीस धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाले. अपघातानंतर रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. ट्रक चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र जवळपासच्या नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याला जोडभावी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सपना ही सांगलीची राहणारी असून ती कामानिमित्त माहेरी सोलापूरला आली होती.