बेळगाव : शववाहिका किंवा अन्य वाहन न मिळाल्याने अंत्यसंस्कारासाठी मृतदेह सायकलवरुन स्मशानात नेला. बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर तालुक्यातील एम. के. हुबळी या गावात ही घटना घडली आहे. काही दिवसापूर्वी मृत पतीच्या पत्नीने स्मशानात मृतदेह नेण्यासाठी हातगाडीची व्यवस्था केली होती. ही विदारक घटना स्वातंत्र्य दिनाच्या दुसऱ्या दिवशी घडली. कोरोनाच्या भीतीने गावकऱ्यांनी वाहन देण्यास नकार दिल्याने मुलांनी वडिलांचा मृतदेह सायकलवरुन स्मशानात नेला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
एम के हुबळी गावातील सत्तर वर्षाच्या वृद्ध व्यक्तीची शनिवारी स्वातंत्र्य दिनी रात्री तब्येत बिघडली. पण वृद्धाला उपचारांसाठी दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही. त्यामुळे वृद्धावर उपचार होऊ शकले नाहीत आणि घरातच त्याचा रात्री मृत्यू झाला. काल रविवारी सकाळी वृद्ध व्यक्तीचा मृतदेह स्मशानात नेण्यासाठी शववाहिका किंवा अन्य वाहन देखील मिळाले नाही. त्यामुळे मृत वृद्धाच्या कुटुंबीयांनी सायकलवरुन मृतदेह स्मशानात नेण्याचा निर्णय घेतला.
सायकलवरुन स्मशानात मृतदेह नेण्यात येत असलेले पाहून ग्रामस्थ अवाक झाले. जिल्ह्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला रुग्णवाहिका, शववाहिका उपलब्ध होणे देखील अवघड झाले आहे.
* मागे नेला होता हातगाडीवरुन मृतदेह
काही दिवसांपूर्वी बेळगाव जिल्ह्यातील अथणी गावात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यावेळी देखील त्याचा मृत्यू झाल्यावर शेजारी आणि नातेवाईक मृतदेहाच्या जवळ देखील आले नाहीत. कोरोनाने मृत्यू झाला असावा अशी भीती त्यांना वाटत होती. शेवटी मृत पतीच्या पत्नीने स्मशानात मृतदेह नेण्यासाठी हातगाडीची व्यवस्था केली. नंतर हातगाडीवर मृतदेह ठेवून मृतदेह स्मशानात नेण्यात आला.