नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे परीक्षा घेण्यावरून देशात वादंग सुरू आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने NEET आणि JEE परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी फेटाळली आहे. काही दिवसापूर्वी, कोरोनाच्या काळामध्ये परीक्षा घेणे धोकादायक होऊ शकते. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशा मागणीची याचिका विद्यार्थ्यांनी न्यायालयात दाखल केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.
ॲड. अलाख अलोक श्रीवास्तव यांनी ११ विद्यार्थ्यांच्या वतीने ६ ऑगस्ट रोजी दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात यासाठी याचिका दाखल केली होती. कोरोनाच्या काळात सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या असताना NEET आणि JEE घेणे धोक्याचे ठरू शकते, असे या याचिकेत म्हटले होते. मात्र, नॅशनल टेस्टिंग एजंन्सीने सुनावणीदरम्यान कोर्टात परीक्षा घेताना सर्व काळजी घेतली जाईल असा दावा केल्यानंतर ही मागणी फेटाळण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, ६ सप्टेंबर २०२० रोजी JEE परीक्षा होणार आहे. तर, NEET परीक्षा १३ सप्टेंबरला होणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
कोरोना संकट असले तरी देशाचा कारभार ठप्प झालेला नाही. आवश्यक ती खबरदारी घेऊन कारभार चालवला जात आहे. त्यामुळे नीट आणि जेईई मेन या दोन्ही परीक्षा पुरेश्या खबरदारीसह घेता येतील, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यांचे वर्ष वाया जाणार नाही हे स्पष्ट झाले आहे. यंदा नीट परीक्षेसाठी १५ लाख ९३ हजार ४५२ विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षेसाठी नेहमीच्या तुलनेत दुपटीपेक्षा जास्त परीक्षा केंद्र असतील. कोरोना संकट असल्यामुळे मास्क, सोशल डिस्टंसचे बंधन असेल. सर्व परीक्षा केंद्र निर्जंतूक केली जातील तसेच विद्यार्थी आणि परीक्षा केंद्रांवरील प्रशासकीय यंत्रणेसाठी सॅनिटायझर आणि आरोग्य तपासणी तसेच तब्येत बिघडल्यास तातडीने वैद्यकीय मदत देण्याची व्यवस्था केली जाणार आहे.
नीट आणि जेईई मेन परीक्षा देणार असलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही जणांचे पालक आखाती देशांमध्ये नोकऱ्या करत आहेत. अशा पालकांनी एकत्र येऊन परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात याचिका केली होती. याआधी केरळच्या उच्च न्यायालयात अशा स्वरुपाची याचिका दाखल झाली होती. मात्र केरळच्या उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली. त्यानंतर पालकांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयानेही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली.