नवी दिल्ली : स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी असलेला स्वामी नित्यानंद गेल्या काही वर्षांत विविध आरोपांमुळे चर्चेत राहिला आहे. आता माहिती मिळत आहे की, नित्यानंदने सांगितले आहे की, देश ‘कैलास’ मध्ये ‘रिझर्व्ह बँक ऑफ कैलास’ स्थापन केली जाणार आहे. यासाठी, विशेष चलन व्यवहारात आणण्याव्यतिरिक्त ते इतरत्र वैध ठरावे यासाठी, विविध देशांशी काही करार झाले आहेत. गणेश चतुर्थीनिमित्त २२ ऑगस्ट रोजी हिंदू रिझर्व्ह बँकेची स्थापना करून, त्याच दिवशी नवीन चलन बाजारात आणले जाणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यासंदर्भात सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या असून, धोरणात्मक कागदपत्रे तयार केली गेली आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. स्वामी नित्यानंद म्हणाला की, या संदर्भात अनेक देशांशी करार झाले आहेत आणि जगभरातील देणग्या म्हणून मिळालेली रक्कम ही निर्मिती आणि व्यवहार करण्यासाठी वापरली जाईल. या घोषणेनंतर, नित्यानंद याची छायाचित्रे असलेल्या नोटा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
नित्यानंद स्वामीने आपल्या संकेतस्थळाद्वारे इक्वाडोरहून एक छोटेसे बेट खरेदी करून, स्वतःचा नवा देश ‘कैलास’ स्थापन केल्याची घोषणा केली. त्यासाठी पासपोर्ट, ध्वज आणि राष्ट्रीय चिन्ह डिझाइन केले गेले आहे. वेबसाइटनुसार, फरार स्वयंभू बाबा नित्यानंद याने ‘हिंदू सार्वभौम राष्ट्रा’ची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर, त्याच्याकडे तथाकथित ‘कैलास; देशाचे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळही आहे.
वेबसाइटमध्ये म्हटले आहे की, नागरिकांना कैलासचा स्वतंत्र पासपोर्ट देण्यात येईल, आणि परमशिवाच्या आशीर्वादाने पासपोर्टधारक कैलाससह इतर 11 देशातील 14 देशांत जगात प्रवेश करू शकतात. या गणेश चतुर्थीला तो या बँकेचं चलनही घोषित करणार आहे. यासंदर्भात नित्यानंदचा स्वतः माहिती देणारा एक व्हिडिओ समोर आला आहे.
मिरर नाऊच्या वृत्तानुसार, स्वामी नित्यानंदवर लहान मुलांना आश्रमात डांबून ठेवण्यासह इतर बलात्कारप्रकरणी आरोप आहे. त्याने ५० न्यायालयीन सुनावण्याही चुकवल्या आहेत. भारतातून तो फरार झाला असून इंटरपोलनं त्याला ब्ल्यू कॉर्नर नोटीसही बाजवली आहे. मात्र, अद्यापही तो मुक्तपणे वावरत असून भविष्यातील विविध योजना आखत आहे. बलात्कार प्रकरणाची अहमदाबादमधील नित्यानंदबाबतची सुनावणी करोनाच्या संकटामुळं थांबवण्यात आली होती. मात्र, आता पुढील सुनावणी याच महिन्यांत कर्नाटकमध्ये होणार आहे.
नित्यानंदने अमेरिकेतील एका बेटावर स्थापन केलेल्या ‘कैलास’ या देशाच्या बँकेची स्थापना केली आहे. आपल्या व्हिडिओमध्ये तो सांगतो की, “बँक आणि तिची आर्थिक धोरणं तयार आहेत. येत्या गणेश चतुर्थीला आम्ही ‘रिझर्व्ह बँक ऑफ कैलास’ आणि त्याच्या चलनासंबंधी सर्व माहिती जाहीर करणार आहोत.”
* कायदेशीर प्रक्रियांचे केले पालन
नित्यानंद आपल्या व्हिडिओमध्ये हे देखील सांगतो की, “३०० पानांची आर्थिक धोरणांसंबंधीची कागदपत्रे, चलन आणि त्याचा वापर याबाबत सर्वकाही तयार आहे. यासंदर्भात कैलास या देशासोबत यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला असून आम्हाला ‘रिझर्व्ह बँक ऑफ कैलास’ स्थापन करण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे ही संस्था कायदेशीर असणार आहे.”
* नित्यानंदचा गुन्हेगारी इतिहास
कर्नाटक आणि गुजरातमध्ये आश्रमांची उभारणी करून अध्यात्माच्या नावाखाली महिलांचा लैंगिक छळ करणाऱ्या नित्यानंद स्वामीने, बलात्काराच्या घटनेपासून स्वत: ला वाचवण्यासाठी पासपोर्टविना भारतामधून पळ काढला होता. स्वामी नित्यानंद हा सन २०१० मधील बलात्कार प्रकरणातील आरोपी असून जामिनावर त्याची सुटका झाली होती. त्यानंतर तो देशातून पळून गेला. दरम्यान, फेब्रुवारी २०२० रोजी कर्नाटक हायकोर्टाने त्याचा जामीन रद्द केला. गुजरातमधील आश्रमात त्याने लहान मुलांना बेकायदेशीररित्या बंदिस्त केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.