सोलापूर : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे 22 मार्चपासून जिल्ह्याच्या बाहेर एसटी वाहतूक बंद करण्यात आली होती. राज्य सरकारने जिल्ह्याच्या बाहेर आज गुरुवारपासून एसटी वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार आज सोलापूर आगारातून लालपरी धावली.
आगारातून सकाळी लालपरी बाहेर निघताना प्रवाशांच्या मुखातून आपसूक ग्रामदैवत सिद्धरामेश्वर आणि नुकतेच येऊ घातलेल्या गणरायाचा जयघोष झाला. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मागणी पूर्ण झाल्याने फटाके फोडून मिठाई वाटून आनंद साजरा केला.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट, ‘टेलिग्राम’ वरही उपलब्ध
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर आगारातून आजपासून दर दोन तासाला पुण्यासाठी बस सोडण्यात येणार असल्याची माहिती सोलापूरचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासूनच महामंडळाच्या वतीने खबरदारीच्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. प्रत्येक फेरीनंतर बसचे निर्जंतुकीकरण, वाहक, चालक यांना मास्क व सॅनिटायझर वापराला प्राधान्य देण्यात आले आहे.
सोलापूर विभागातून इतर जिल्ह्यांसाठी पूर्वी ज्याप्रमाणे बस सोडण्यात येत होत्या. त्याप्रमाणेच बस सोडल्या जातील. सोलापुरातून कोल्हापूर, औरंगाबाद यासह महत्त्वाच्या शहरांत आजपासून बस सोडल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील शटल सेवेमध्ये प्रवासी गरज बघून प्रत्येक तासाला बस सोडण्याचेही नियोजन सोलापूर विभागाने केले आहे.
* अकलूज आगारातूनही सुरु
महामंडळाच्या अकलूज आगाराने देखील आंतरजिल्हा प्रवास वाहतूक सेवेचे नियोजन केले आहे. आगार अकलूज येथून चिपळूण, स्वारगेट-पुणे, याबरोबरच सोलापूर, सांगोला, पंढरपूर, टेंभुर्णी, नातेपुते, बारामती येथे प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यात येणार आहे. अकलूज-चिपळूण दररोज 11 वाजता, अकलूज-कोल्हापूर दररोज 10.45 वाजता, अकलूज ते स्वारगेट- पुणे, सोलापूर, सांगोला व पंढरपूर येथे प्रत्येक दोन तासाला बस सोडण्यात येणार आहे. टेंभुर्णी आणि नातेपुते येथे प्रत्येक एक तासाला तर नातेपुते-बारामती प्रत्येक दोन तासाला एसटी बससेवा असणार आहे.